Aurangabad News: औरंगाबाद-पैठण महामार्गाचे प्रचंड हाल झाले असून,गाडी चालवणे अवघड झाल आहे. दरम्यान काही वेळेपूर्वी पैठण औरंगाबाद रस्त्यावरील संत एकनाथ कारखान्यासमोर प्रवासी वाहतूक करणारी बस चिखलात फसली असल्याचे समोर आले आहे.  गेल्या एका तासापासून बसला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरु असून, रस्त्याच्या दोन्ही बाजूला लांबपर्यंत वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत. 


औरंगाबाद जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसामुळे रस्ते मोठ्याप्रमाणावर खराब झाले आहेत. विशेष म्हणजे याचा फटका आता राष्ट्रीय महामार्गांनाही बसना पाहायला मिळत आहे. औरंगाबाद-पैठण राष्ट्रीय महामार्गावर आज सकाळी एक बस चिखलात अडकली. पैठणच्या संत एकनाथ कारखान्यासमोर पाण्याच्या पाईपलाईनचे काम सुरु असल्याने रस्ताही खराब झाला आहे.


आता ट्रक अडकला...


औरंगाबाद-पैठण रस्त्यावरील संत एकनाथ कारखान्यासमोर बस अडकल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली. मात्र बस काढल्यानंतर आणखी काही वेळाने तिथे एक ट्रक अडकला आहे. आता त्या ट्रकला सुद्धा बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरु आहे. मात्र यामुळे औरंगाबाद-पैठण रस्त्यावरून प्रवास करणाऱ्यांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. 


बस काढण्यासाठी प्रयत्न आणि...


औरंगाबाद-पैठण या मुख्य रस्त्यावर बस फसल्याने दोन्ही बाजूने वाहतूक कोंडी झाली. त्यामुळे चिखलात फसलेल्या बसला बाहेर काढण्यासाठी जेसीबी आणि पोकलनची मदत घेण्यात आली. अथक परिश्रम घेतल्यानंतर कशीतरी बस बाहेर निघाली. मात्र तोपर्यंत लांबच-लांब गाड्यांची वाहतूक कोंडी झाल्याचे पाहायला मिळाले. त्यातच आता पुन्हा एक ट्रक फसल्याने त्याला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु आहे.