Exclusive: माझ्याच पक्षातील नेत्यांचा माझ्याविरोधात कट; अब्दुल सत्तारांचा मोठा गौप्यस्फोट
Abdul Sattar: अब्दुल सत्तार यांनी 'एबीपी माझा'ला दिलेल्या विशेष मुलाखतीत अनेक गौप्यस्फोट केले आहे.
Abdul Sattar: गेल्या काही दिवसांपासून कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्याविरोधात अनेक गंभीर आरोप विरोधकांकडून करण्यात येत असतानाच, अब्दुल सत्तार यांनी याबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. माझ्याच पक्षातील नेते माझ्याविरोधात कट रचत असल्याचा गंभीर आरोप सत्तार यांनी केला आहे. अब्दुल सत्तार यांच्या या विधानाने राजकीय गोटात खळबळ उडाली आहे. त्यामुळे शिंदे गटात अंतर्गत कुरघोडी सुरु असल्याची चर्चा आता रंगताना पाहायला मिळत आहे. अब्दुल सत्तार यांनी 'एबीपी माझा'ला दिलेल्या विशेष मुलाखतीत अनेक गौप्यस्फोट केले आहे.
टीईटी घोटाळा, सिल्लोड येथील कृषीमहोत्सव आणि वाशीम येथील गायरान जमिनीवरून अब्दुल सत्तार यांच्यावर मोठ्याप्रमाणावर आरोप होत आहे. दरम्यान यावर पहिल्यांदाच अब्दुल सत्तार यांनी मौन सोडले आहेत. मला बदनाम करण्याचा प्रयत्न होत आहे. यात काही माझ्या पक्षातील असू शकतात तर काही माझे हितचिंतक आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरात होणारी चर्चा बाहेर येत आहे. त्यामुळे आमच्यातील कोणेतरी बाहेर बातम्या पुरवत असल्याचा आरोप सत्तार यांनी केला आहे. तर ज्यांना मंत्रिपद मिळाले नाही त्यांच्याकडून हे सर्व सुरु असल्याचं सत्तार म्हणाले.
माझ्या पक्षातील नेते माझ्याच विरोधात
यावेळी बोलतांना अब्दुल सत्तार म्हणाले की, माझ्यावर झालेल्या सर्व आरोपाचे खुलासे मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केला आहे. मी राज्यमंत्री नसतानाही त्या काळातील आरोप माझ्यावर करण्यात आले. मला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरु आहे. माझ्या पक्षातील देखील काही लोकं यात असू शकतात. तर विरोधी पक्षात देखील माझे अनेक हितचिंतक आहेत. माझ्यासारखा अल्पसंख्याक व्यक्ती कृषिमंत्री पदावर बसल्याने अनेकांना पाहिले जात नाही. त्यामुळे सतत माझ्याविरोधात कट कारस्थान रचले जात असल्याचा आरोप अब्दुल सत्तार यांनी केला आहे.
मुख्यमंत्री यांच्याकडे चौकशीची मागणी
तर याचवेळी मोठा खुलास करतांना अब्दुल सत्तार म्हणाले की, आमच्या पक्षाच्या बैठकीमधील बातम्या बाहेर येत आहे. मागे आमची मुख्यमंत्री यांच्यासोबत एक बैठक झाली होती. त्या बैठकीत काय झाले हे बाहेर आले. विशेष म्हणजे ज्या गोष्टी घडल्या नाहीत त्या देखील बाहेर सांगण्यात आले. त्यामुळे आपल्यातील कुणीतरी आपल्यातील खाजगी गोष्टी बाहेर पुरवत असल्याचं मी मुख्यमंत्री यांच्या कानावर घातले असून, याबाबत चौकशी करण्याची मागणी देखील केली असल्याचं अब्दुल सत्तार म्हणाले आहेत.
शिंदे गटात अंतर्गत कुरघोडी
अब्दुल सत्तार यांनी केलेल्या गौप्यस्फोटानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. कारण शिंदे गटातील काही लोकं आपल्याविरोधात कट रचत असल्याचा आरोप अब्दुल सत्तार यांनी केला आहे. त्यामुळे शिंदे गटात अंतर्गत कुरघोडी असल्याचे समोर आले आहे. तसेच शिंदे गटात सर्वकाही आलबेल नसल्याचं देखील यातून समोर येत आहे. त्यामुळे आता सत्तार यांच्या आरोपावर एकनाथ शिंदे यांची काय प्रतिक्रिया येणार हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.