मोठी बातमी! औरंगाबादच्या पिशोर भागात ढगफुटी सदृश पाऊस; सात गावांचा संपर्क तुटला
Aurangabad Rain: पिशोर येथील अंजना पळशी प्रकल्प ओव्हर फ्लो झाला आहे.
Aurangabad Rain News: औरंगाबाद जिल्ह्यात रविवारी अनेक भागात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. तर कन्नड तालुक्यातील पिशोर परिसरात ढगफुटी सदृश पाऊस झाल्याने नदी नाल्यांना पूर आले आहे. यामुळे या परिसरातील सात गावांचा संपर्क तुटला असून, गावकऱ्यांची दळणवळण व्यवस्था बंद पडली आहे. सोबतच पिशोर येथील अंजना पळशी प्रकल्प ओव्हर फ्लो झाला आहे.
रात्रीच्या सुमारास कन्नड तालुक्यातील पिशोर भागात ढगफुटी सदृश पाऊस झाला. त्यामुळे परिसरातील कोळंबी तांडा-भारंबा, भारंबा वाडी, माळेगाव ठोकळ, माळेगाव लोखंडी, जैतखेडा, साळेगाव यासह अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. त्यामुळे शेतात गुरांना चारा पाणी करण्यासाठी व दुग्धव्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना जीव मुठीत धरून पाण्यातून प्रवास करावा लागत आहे.
मोठी बातमी! औरंगाबादच्या पिशोर भागात ढगफुटी सदृश पाऊस; सात गावांचा संपर्क तुटला #Aurangabad #rain pic.twitter.com/zuKXLUEQcE
— ABP माझा (@abpmajhatv) September 19, 2022
पिकांच नुकसान...
पिशोर भागात झालेल्या ढगफुटी सदृश पाऊसामुळे नदी नाले ओसंडून वाहत आहे. तर अनेक भागात शेतात पाणी तुंबले आहे. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. आधीच पावसामुळे पिकं पिवळी पडत असतांना आता रविवारी झालेल्या ढगफुटी सदृश पाऊसामुळे आता पिकं वाचण्याची शक्यता खूपच कमी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आता मोठ्या नुकसानीचा सामना करावा लागणार आहे. तर रविवारी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.