औरंगजेबाने बांधलेल्या वास्तूंचं सुशोभीकरण करा; राष्ट्रवादीच्या नेत्याची प्रशासनाकडे मागणी
Aurangabad News: यावरून आता नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
Aurangabad News: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (NCP) राज्य उपाध्यक्ष इलियास किरमाणी यांनी औरंगाबादचे जिल्हाधिकारी यांना लिहिलेल्या एका पत्रावरून आता नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. कारण औरंगजेबाने (Aurangzeb) बांधलेल्या औरंगाबादमधील (Aurangabad) वास्तूंची दुरवस्था झाली असून, त्याची जीर्णोद्धार करण्याची मागणी किरमाणी यांनी औरंगाबादचे जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांना पत्र लिहून केली आहे. तर त्यांच्या याच मागणीवर मराठा क्रांती मोर्चाने आक्षेप घेतला आहे. त्यामुळे यावरून आता नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
काय आहे पत्रात...
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राज्य उपाध्यक्ष इलियास किरमाणी यांनी औरंगाबादचे जिल्हाधिकारी यांना लिहलेल्या पत्रात म्हटले आहे की, शहरातील किले-ए-अर्क हा मुघल शासक 'सम्राट औरंगजेब' ने सण 1960 मध्ये बांधला होता. आज तो महाल-राजवाडा जीर्ण अवस्थेत पडून आहे. या महालाचे कालांतराने नुकसान झाले असून, शासनाच्या निष्काळजीपणामुळे त्याने गतवैभव गमावले आहे. या परिसरात शाही मस्जिद, आदिल दरवाजा, झेबुन्निसा महाल, पाल्मार कोठी, जनाना महाल, जनाना मस्जिद व मर्दाना महालचा समावेश आहे. किले-ए-अर्कमध्ये आजही आलिशान महाल, सुंदर मोगल गार्डनचे अवशेष, राज सिंहासनची जागा, दिवान ए-आम, दिवानची खास जागा, मंत्र्यांचे दालन, शयनकक्ष व हमाम खानेचे अवशेष आज देखील उपलब्ध आहे.
त्यामुळे जिल्हाधिकारी यांना विनंती आहे की, जी-20अंतर्गत शहराच्या सुशोभीकरणामध्ये व स्मार्ट सिटीच्या बजेटमध्ये या किले-ए-अर्कचा समावेश करावा. देखभालीचा अभाव असल्याने या महालाची स्थिती बिघडली आहे. एके काळी हे अतिशय सुंदर स्मारक होते. त्याचे संवर्धन व्हावे, त्यांची दुरुस्ती आणि जीर्णोद्धार करण्याची आज अत्यंत गरज आहे. या महालाला पुनर्संचयित केल्यास, ते आपल्या ऐतिहासिक शहराचे आणखी एक पर्यटन स्थळ बनू शकते. अशा संरचना अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने शासनास लाभधारक ठरू शकते, असे इलियास किरमाणी यांनी औरंगाबादचे जिल्हाधिकारी यांना लिहलेल्या पत्रात म्हटले आहे.
विनोद पाटील यांची टीका...
दरम्यान यावर प्रतिक्रिया देताना मराठा क्रांती मोर्च्याचे समन्वयक तथा मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील म्हणाले की, अशा मागणीचे आम्ही निषेध व्यक्त करतो. औरंगजेब प्रचंड क्रूर राजा होता. ज्याने आपल्या वडीलांना कैद केलं, आपल्या भावांचा खून केला तोच ईतिहास आता आपल्या तरुणांना द्यायचा आहे का? असा प्रश्न विनोद पाटील यांनी उपस्थित केला. तसेच राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांचे वादग्रस्त विधान आणि आता राष्ट्रवादीच्या नेत्याची अशी मागणी पाहता राष्ट्रवादी पक्षाने आता आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याचे विनोद पाटील म्हणाले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
आदित्य ठाकरेंच्या कार्यक्रमातील गोंधळानंतर अंबादास दानवेंचं पोलिस महासंचालकांना पत्र