(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Aurangabad: पोलिसाच्या मदतीने चालतो भोंदूगिरीचा बाजार; एबीपी माझाच्या बातमीनंतर उडाली खळबळ
Aurangabad Bhondubaba : ग्रामीण भागातील अनेक लोकं त्याच्यावर विश्वास ठेवून याठिकाणी येत असतात.
Aurangabad News: औरंगाबादच्या पैठण तालुक्यातील पारुंडी गावात गेल्या काही दिवसांपासून भरत असलेल्या आरोग्य सभा सद्या चर्चेचा विषय बनला आहे. कारण या आरोग्य सभेत चक्क डोक्यावर हात ठेवल्याने तुमचे दुर्धर आजार बरे होत असल्याचा दावा केला जात आहे. विशेष म्हणजे याठिकाणी एबीपी माझ्याच्या टीमने जाऊन सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता धक्कादायक माहिती समोर आली आहे.
काय आहे बाबाचा दावा...
बाबासाहेब शिंदे नावाचा हा बाबा गेली दीड-दोन वर्षे या गावात अशी आरोग्य सभा भरवतो. विशेष म्हणजे डोक्यावर हात ठेवल्याने कर्करोग, शुगर यासह सर्वच आजार भरे होत असल्याचा दावा शिंदे करतो. यासाठी दर शुक्रवारी या गावात आरोग्य सभा भरवली जाते. या सभेत शिंदे वेगवेगळे दावे करत असतो. डॉक्टर ज्या आजारांवर उपचार करू शकत नाही, त्या आजारांवर आपण उपचार करत असल्याचा दावा हा बाबा करतो. त्यामुळे ग्रामीण भागातील अनेक लोकं त्याच्यावर विश्वास ठेवून याठिकाणी येत असतात.
असा आहे आर्थिक गणित...
बाबा याठिकाणी आपण पैसे घेत नसल्याचा दावा करतो. पण याचवेळी इथेचं खरं आर्थिक गणित दडलेलं आहे. या गावात दोन अडीचशे चारचाकी ,पन्नास शंभर तीनचाकी, दोन तीनशे दुचाकी घेऊन लोकं उपचारासाठी येतात. इथे आलेल्या चारचाकी वाहनांसाठी पन्नास रुपये,तीन चाकी वाहनासाठी पन्नास रुपये आणि टू व्हीलर साठी 20 रुपये आकारले जातात. त्यामुळे हा पैसा कुणाला जातो असा प्रश्न उपस्थित होतो.
व्हिडिओ शुटींग करण्यास मनाई...
बाबासाहेब शिंदे याच्या आरोग्य सभेच्या ठिकाणी किमान शंभर महिला आणि पुरुष बाउन्सर प्रमाणे लोकं उभे करण्यात आले आहेत. जे येथे येणाऱ्या लोकांवर लक्ष ठेवून असतात. तसेच कुणीही मोबाईलमध्ये शूट केल्यास त्याचा मोबाईल जप्त करून व्हिडिओ डिलीट केले जातात. या सभेतील व्हिडिओ कोणत्याही प्रकारे बाहेर जाणार नाही याची काळजी घेतली जाते. त्यामुळे या बाबाला एवढी भीती कशाची असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
पोलिसांचा सहभाग?
ज्या ठिकाणी हा सर्व दरबार भरतो ती जागा गावातील एका राजकीय नेत्याची आहे. तसेच याच नेत्याच्या नात्यातील एक जण पोलीस खात्यातील आहे. विशेष म्हणजे तो स्वतः याठिकाणी सभेत उपस्थित असतो. लोकांना माईकवरून मार्गदर्शन सुद्धा करतो. तर याठिकाणी अनेक पोलीस अधिकारी सुद्धा उपचार घेण्यासाठी येत असल्याचा दावा येथील लोकांनी केला आहे. मात्र गेल्या वर्षभरापासून एवढ सर्व असतांना प्रशासनाला याची माहिती मिळत नाही याबाबत आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
झटपट आजार बरे करण्याच्या नावाखाली लुट...
मी थेट येशूशी बोलतो, आजार बरे करतो, केवळ येशूची पूजा करा असा दावा करणाऱ्या औरंगाबादच्या भोंदू बाबाचा एबीपी माझाने पर्दाफाश केल्यावर, या बातमीवर वसईचे जेष्ठ धर्मगुरु तथा जेष्ठ साहित्यिक आणि ९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी आचार्य अञे यांच्या वाक्याचं संदर्भ देवून, भारतीय लोक भोल भाबडे आहेत. ते सहज कोणावर आणि कशावर ही विश्वास ठेवतात. असाच एक हा महाराष्ट्रातील बाबा आहे. महाराष्ट्रात बाबा का होतात, त्यांची पूजा अर्चा होते. तेथे गर्दी होते, ते लोकांना आधार देतात. त्याच कारण म्हणजे सध्या लोकांचे आजार वाढलेले आहेत. औषोधोउपचार ही महाग झाले आहेत, त्यामुळे झटपट आजार बरे करण्याच्या नावाखाली हेच बाबा फायदा घेत असतात. लवकर आजार बरे करण्याच सांगून सामान्य लोकांना आपल्या जाळ्यात ओढतात. त्यामुळे लोकांनी अशा बाबांच्या मागे जावू नये. असे फादर दिब्रिटो यांनी म्हटले आहे. तर अशा बाबांना कुणीही प्रोत्साहान देवू नये असे आवहान फादर दिब्रिटो यांनी यावेळी केले आहे.