Thirty Thirty Scam: न्यायालयीन कोठडीत असलेल्या तीस-तीस घोटाळ्यातील आरोपीच्या संभाषणाची ऑडिओ क्लिप व्हायरल
Thirty Thirty Scam : संतोष राठोड न्यायालयान कोठडीत असताना त्याला मोबाईल फोन कोण पुरवत आहे? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
Thirty Thirty Scam: राज्यभरात गाजलेल्या तीस-तीस घोटाळ्याची माहिती 'ईडी'ने (ED) मागवल्याने खळबळ उडाली आहे. त्यातच आता यात आणखी एक मोठा गौप्यस्फोट करणारी माहिती समोर आली आहे. तीस-तीस घोटाळ्याचा मुख्य आरोपी संतोष राठोड सध्या हर्सूल कारागृहात असून, त्याला फोन पुरवला जात असल्याचे समोर आले आहे. तर त्याने केलेल्या एका फोन कालच्या संभाषणाची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. ज्यात 'ईडी'ने माहिती मागवल्याबाबत चर्चा झाली आहे. त्यामुळे संतोष राठोड न्यायालयीन कोठडीत असताना त्याला मोबाईल फोन कोण पुरवत आहे? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
संभाषण कारागृहातून किंवा न्यायालयात हजर करताना झाल्याचा अंदाज
फोनवरील संभाषणाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यावर 'एबीपी माझा'च्या प्रतिनिधीनी हर्सूल कारागृहाच्या प्रशासनाशी संपर्क साधून, याबाबत मुख्य अधिकारी अरुणा मुगूटराव यांची प्रतिक्रिया जाणून घेतली. त्यावेळी त्यांनी कॅमेरावर बोलण्यास नकार दिला. मात्र 16 तारखेला संतोष राठोड याला सकाळी 11 ते 7 वाजेपर्यंत कोर्टात हजर करण्यासाठी नेण्यात आले होते. त्यावेळी हे संभाषण झाले असावे असे त्यांनी सांगितले आहे. विशेष म्हणजे 16 तारखेलाच 'एबीपी माझा'वर तीस-तीस घोटाळ्याची माहिती 'ईडी'ने मागवल्याची बातमी प्रसारित झाली होती. त्यामुळे हे संभाषण कारागृहातून झाले असेल किंवा न्यायालयात हजर करताना झाला असावे, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. तर संतोष राठोडला न्यायालयात घेऊन जात असताना औरंगाबाद शहर पोलिसांचा एक अधिकारी आणि चार कर्मचारी असतात त्यामुळे त्यांनी हे संभाषण करु दिले का? असाही प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे आता याचे उत्तर कारागृह प्रशासन किंवा औरंगाबाद शहर पोलीसच देऊ शकतात.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संतोष राठोड याने संभाषण केलेला व्यक्ती, त्यांचा नातेवाईक आहे. तसेच पैठण तालुक्यातील बिडकीन गावातील हा व्यक्ती आहे. विशेष म्हणजे या व्यक्तीची राजकीय पार्श्वभूमी असून, एका मंत्र्याचा जवळचा असल्याचे देखील बोलले जात आहे. त्यामुळे आता या सर्व प्रकारची पोलीस चौकशी करणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
तीस-तीस घोटाळ्यात 'ईडी'ची एन्ट्री ...
गेल्या वर्षी गाजलेल्या मराठवाड्यातील तीस-तीस घोटाळ्यात 'ईडी'ची एन्ट्री झाली आहे. औरंगाबाद ग्रामीण पोलिसांकडून ईडीच्या पथकाने घोटाळ्याची सर्व माहिती मागून घेतली आहे. त्यामुळे आगामी काळात याप्रकरणी ईडीकडून चौकशी केली जाऊ शकते. मात्र तीस-तीस घोटाळ्यात अचानकपणे ईडीची एन्ट्री झाल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहे. तर यात अनेक राजकीय नेत्यांची देखील नावं असल्याचे खळबळ उडाली आहे.
मोठी बातमी! राज्यभरात गाजलेल्या तीस-तीस घोटाळ्याची 'ईडी'ने मागवली माहिती