Aurangabad: मुख्यमंत्र्यांविरोधातील तक्रारीवरून शिंदे गट आणि पोलिसात वाद; समर्थकांची ठाण्याबाहेर गर्दी
Aurangabad News: शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांच्यासह जवळपास 100 शिंदे समर्थक पोलीस ठाण्यात जमले असल्याचे पाहायला मिळाले.
Aurangabad News: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या औरंगाबाद दौऱ्यात रात्री लाऊडस्पीकरचा वापर केल्याप्रकरणी पोलिसात करण्यात आलेल्या तक्रारीनंतर शिंदे गट आक्रमक होतांना पाहायला मिळत आहे. शिंदे यांच्याविरुद्ध झालेल्या तक्रारीवरून शिंदे गट जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ आणि पोलीस निरिक्षकात आज वाद पाहायला मिळाले. जंजाळ यांच्यासह जवळपास 100 शिंदे समर्थक पोलीस ठाण्यात जमले असल्याचे पाहायला मिळाले.
मुख्यमंत्र्यांची शहरातील क्रांती चौकात रात्री दहानंतर झालेल्या सभेवरून पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यावरून पोलिसांनी जंजाळ यांना बोलावून घेतले होते. यावेळी जंजाळ आणि पोलीस अधिकाऱ्यांमध्ये वाद झाला आहे. तर पोलिसांनी बोलावून अपशब्द वापरले असल्याचा आरोप जंजाळ यांनी केला आहे. तर पोलिसांची बाजू मात्र अजून समजू शकली नाही.
Aurangabad: मुख्यमंत्र्यांच्या विरोधात पोलिसात तक्रार; रात्री दहानंतर स्पीकर लावल्याचा आरोप
काय आहे प्रकरण...
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गेल्या आठवड्यात दोन दिवसीय औरंगाबाद दौरा केला होता. यावेळी शहरात मुख्यमंत्री यांचे भरगच्च असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. त्यामुळे पहाटे तीन वाजेपर्यंत मुख्यमंत्री शिंदे यांनी वेगवेगळ्या कार्यक्रमांना हजेरी लावली. तर याच कार्यक्रमात रात्री दहा वाजेनंतर लाऊडस्पीकरचा वापर करण्यात आल्याचा दावा करत आक्षेप घेण्यात आला आहे. सोबतच याप्रकरणी मुख्यमंत्री आणि आयोजक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी करत दोन वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात तक्रार सुद्धा दाखल करण्यात आली आहे.
तक्रारीबाबत चौकशीसाठी पोलिसांनी बोलावले आणि वाद...
पोलिसात आलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने क्रांती चौक पोलिसांनी शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांना पोलीस ठाण्यात बोलावून घेतले होते. यावेळी जंजाळ यांच्यासोबत आणखी शंभर समर्थकही पोलीस ठाण्यात आले. यावेळी पोलीस आणि जंजाळ यांच्यात सुरु असलेल्या चर्चेतून शब्दिक चकमक उडाली. त्यांनतर पोलीस ठाण्यातून बाहेर आलेल्या जंजाळ यांनी पोलिसांकडून अपशब्द वापरले गेल्याचा आरोप केला आहे.