'आता कुठंय तुमचा भोंगा, हनुमान चालीसाचं काय झालं'; अंबादास दानवेंचा राज ठाकरेंच्या टीकेला उत्तर
Ambadas Danve On Raj Thackeray: शिवसेनेला हिंदुत्ववादी शिकवण्याची गरज नसल्याचं अंबादास दानवे म्हणाले.
Ambadas Danve On Raj Thackeray: मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी रविवारी मुंबईतील नेस्को ग्राउंडवर गटाध्यक्षांचा मेळावा घेतला. यावेळी बोलतांना राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर जोरदार टीका केली. राज यांच्या याच टीकेला ठाकरे गटाच्या नेत्यांकडून उत्तर दिले जात आहे. दरम्यान विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी देखील राज ठाकरेंच्या टीकेला उत्तर देत 'आता कुठंय तुमचा भोंगा, हनुमान चालीसाचं काय झालं' असा खोचक टोला लगावला आहे.
औरंगाबाद येथे माध्यमांशी बोलतांना अंबादास दानवे म्हणाले की, यांचा झेंडा आत्ता भगवा झाला तो आधी कोणत्या रंगाचा होता, तो का केला होता, त्यावेळी काय भूमिका मांडली होती, त्यामुळे काय केलं तुम्ही असा प्रश्न दानवे यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका करतांना उपस्थित केले. सोबतच कुठ आहे तुमचा भोंगा, कोणता भोंगा बंद झाला, हनुमान चालीसा कुठे आहे आता, असे दानवे म्हणाले. तर भाजपची जी भूमिका आहे त्या पद्धतीने भूमिका मनसेकडून मांडली जात आहे. शिवसेनेला हिंदुत्ववादी शिकवण्याची गरज नाही. राममंदिर, प्रश्न असेल,अमरनाथ यात्रेचा प्रश्न असेल किंवा मुंबईतील दंगलीचा प्रश्न असू द्या किंवा आता देखील सरकार आल्यावर औरंगाबाद जिल्ह्याचे नाव संभाजीनगर करण्याचा निर्णय असेल, शिवसेनेला हिंदुत्ववादी शिकवण्याची गरज नसल्याचं दानवे म्हणाले.
उद्धव ठाकरेंनी योग्यवेळी धडा शिकवला...
एकनाथ शिंदे यांनी एक जादूची कांडी फिरवली आणि आता ते घरा बाहेर पडायला लागले असा टोला राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे. त्यांच्या याच टीकेला उत्तर देतांना अंबादास दानवे म्हणाले की, उद्धव ठाकरे यांना कोणतेही स्वार्थ असण्याचे कारण नाही. मात्र जे लोकं आपलाच पक्ष संपवण्यासाठी निघाले, आपलीच करंगळी पकडून आपल्याच छातीवर बसायला निघाले, त्यामुळे यांना योग्यवेळी धडा शिकवण्याची गरज होती आणि म्हणून उद्धव ठाकरे यांनी त्यांना धडा शिकवला असल्याचं दानवे म्हणाले.
उद्धव ठाकरेंच्या कामाची जगाने दखल घेतली...
आरोग्याचे कारण सांगून उद्धव ठाकरे घराबाहेर पडले नसल्याचं म्हणणे क्लेशदायक आहे. कारण त्यांची जी सर्जरी झाली त्यामुळे त्यांना बाहेर फिरणं शक्य नव्हते. आता त्यांना काही प्रमाणात फिरणं शक्य असल्याने ते जनतेमध्ये जात आहे. एका ठिकाणी बसून देखील महाराष्ट्र पुढे जाऊ शकतो असे अनेक उदाहरण उद्धव ठाकरे यांच्या कामाचे असल्याचे देखील दानवे म्हणाले. जेव्हा इतर राज्यात कोरोनाची परिस्थिती गंभीर होती त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी केलेल्या कामाची जगात नोंद झाली असल्याचे देखील दानवे म्हणाले.