आमचा राजीनामा मागणाऱ्या आदित्य ठाकरेंनीही राजीनामा द्यावा; अब्दुल सत्तारांची टीका
Aurangabad News: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोटो लावून तुम्ही निवडणूक लढवत जिंकले असल्याचा टोला आदित्य ठाकरे यांना सत्तार यांनी लगावला आहे.
Aurangabad News: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे औरंगाबाद दौऱ्यावर असून, त्यांच्या उपस्थितीत अनेक विकास कामांचे लोकार्पण सोहळ्याचे कार्यक्रम पार पडले. दरम्यान आमदार अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोड मतदारसंघात मुख्यमंत्री यांची जाहीर सभा पार पडली. यावेळी बोलतांना अब्दुल सत्तार यांनी युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. आमचे राजीनामे मागणाऱ्या आदित्य ठाकरेंनी आधी राजीनामा द्यावा अशी टीका सत्तार यांनी केली आहे.
शिंदे गटात गेलेल्या आमदारांनी हिम्मत असेल तर राजीनामे देऊन, पुन्हा निवडणुकीत जिंकून दाखवावे असा इशारा आदित्य ठाकरे यांनी दिला होता. त्यांच्या टीकेला उत्तर देतांना सत्तार म्हणाले की, आदित्य ठाकरे यांनी त्यांचा तिकडे राजीनामा द्यावा मी माझा इकडे राजीनामा देतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोटो लावून तुम्ही निवडणूक लढवत जिंकले असून, आमच्यावर अशी टीका करू नयेत असा टोला अब्दुल सत्तार यांनी यावेळी लगावला.
जोरदार शक्तिप्रदर्शन...
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्याच्या निमित्ताने अब्दुल सत्तार यांच्याकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले. सिल्लोड शहरातील प्रत्येक मुख्य चौकात होर्डिंगबाजी करण्यात आली होती. तसेच ठीक-ठिकाणी जोरदार आतिषबाजी करण्यात आली. तसेच मुख्यमंत्री यांच्यावर जोरदार पुष्पवृष्टी सुद्धा करण्यात आली आहे. आमदार सत्तार हे मंत्रीमंडळाच्या शर्यतीत असून, त्यामुळे त्यांच्याकडून मुख्यमंत्री यांच्यासमोर जोरदार शक्तिप्रदर्शन करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची चर्चा पाहायला मिळाली.
दानवे-खोतकरांची उपस्थिती...
अब्दुल सत्तार यांच्या मतदारसंघात आयोजित जाहीर सभेला रावसाहेब दानवे आणि अर्जुन खोतकर यांची उपस्थिती पाहायला मिळाली. तर याचवेळी खोतकर यांनी शिंदे गटात जाहीर प्रवेश केला. मराठवाड्यातील राजकारणात अब्दुल सत्तार, रावसाहेब दानवे आणि अर्जुन खोतकर यांच्या जोडीचे नेहमीच चर्चा असते. विशेष म्हणजे नेहमी एकमेकांवर टीका करणारे हे नेते एकाच व्यासपीठावर एकत्र आल्याने चर्चेचा विषय बनला होता.