Aurangabad News: जोरदार होत असलेल्या पावसामुळे ग्रामीण भागातील रस्ते खचले असून, अनेक ठिकाणी नागरिकांना पायी चालणे अवघड झाले आहे. अशातच औरंगाबादच्या गंगापूर तालुक्यातील लखमापूर येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आजारी मुलाला रस्त्याअभावी उपचारासाठी दवाखान्यात नेण्यासाठी उशीर झाल्याने दहा वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. कृष्णा बाबूलाल परदेशी असे मयत मुलाचे नाव आहे. 


लखमापूर शिवारात राहणारे बाबूलाल परदेशी यांचा मुलगा कृष्णाला सोमवारी पहाटे चार वाजता पोटदुखी आणि उलट्यांचा त्रास सुरू झाला. त्रास अधिक वाढल्याने बाबूलाल परदेशी हे आपल्या मुलाला दुचाकीवर बसून गंगापुरला रुग्णालयात घेऊन निघाले. परंतु रस्त्यात प्रचंड चिखल असल्याने अनेकदा त्यांची दुचाकी चिखलात फसली. अवघ्या 4 किलोमीटरचा रस्ता पार करण्यासाठी त्यांना एक तासांचा कालवधी लागला. त्यांनतर ते कसेबसे गंगापूर येथील एका खासगी रुग्णालयात पोहोचले. परंतु तोपर्यंत कृष्णाची प्रकृती खूपच खालावली होती.


रस्त्याअभावी चिमुकल्याचा बळी...


एका तासापूर्वी घरून निघालेले बाबूलाल परदेशी खराब रस्ता पार करून रुग्णालयात पोहचले खरे, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. कारण गंगापूर येथील रुग्णालयात पोहचल्यावर तेथील डॉक्टरांनी त्यास तातडीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला. मात्र उपजिल्हा रुग्णालयात उपचारकरण्यापूर्वीच कृष्णाची प्राणज्योत मालवली. त्यामुळे रस्त्याअभावी कृष्णाचा बळी गेला असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. तर वेळीच उपचार मिळाले असते तर कृष्णा वाचू शकला असता असेही गावकऱ्यांनी म्हंटले आहे.  


गावकऱ्यांना रस्त्याअभावी हाल...


लखमापूर हे जायकवाडी धरणासाठी पुनर्वसित झालेले गाव आहे. गावातील बहुतांश लोकं शेतातच राहतात. त्यामुळे शेतवस्तीवर जाण्यासाठी चांगले रस्ते नाहीच. अनकेदा मागणी करूनही प्रशासनाचे अधिकारी आणि लोकप्रतिनिधी लक्ष देत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना नरकयातना सहन कराव्या लागत आहे. 


महत्वाच्या बातम्या...


Maharashtra Rain : राज्यात 1 जून ते 26 जुलैपर्यंत सरासरीपेक्षा अधिक पाऊस, मराठवाड्यात 67 टक्के अधिक पावसाची नोंद 


Marathwada Rain : मराठवाड्यात पावसामुळं आत्तापर्यंत 45 जणांचा मृत्यू, तर 3 लाख 78 हजार 866 हेक्टरवरील पिकांचं नुकसान