Aurangabad: व्हॉटस्ॲपवर आक्षेपार्ह स्टेट्स ठेवणाऱ्या तरुणाला मारहाण; गुन्हा दाखल
सोबतच आक्षेपार्ह स्टेटस ठेवणाऱ्या व एका विशीष्ट धर्मीयांच्या भावना दुखावण्यास कारणीभुत ठरलेल्या तरुणाविरुद्ध सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Aurangabad Crime News: औरंगाबादच्या गंगापूर तालुक्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. व्हॉटस्ॲप वर आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्यामुळे एका तरुणास 12 ते 15 लोकांनी घेरावा घालून मारहाण केली आहे. तर मारहाण करणाऱ्या अकरा आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून, आक्षेपार्ह स्टेटस ठेवणाऱ्या तरुणाविरुद्ध सुद्धा धार्मीक भावना दुखावल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 10 जून 2022 रोजी रात्री 11 वाजेच्या सुमारास एका तरुणाने त्याचे आक्षेपार्ह मजकुराचे व्हॉटस्ॲप स्टेटस ठेवल्याने वाद झाला. झालेल्या वादातून इतर धर्माच्या 12 ते 15 तरुणांनी स्टेटस ठेवणाऱ्या तरुणास धमकावून शिवीगाळ करून घेराव घालून मारहाण करून गंभीर दुखापत केली. तसेच धारदार शस्त्राने तरूणाच्या गळ्यावर मारून त्यास जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या व तरूणाची मोटार सायकलची तोडफोड करून नुकसान केल्याच्या घटनेवरून पोलीस ठाणे गंगापुर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची घटना घडताच पोलीस अधीक्षक मनिष कलवाणीया यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी प्रकाश बेले यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होवून, परिस्थिती नियंत्रणात आणली. तर मारहाण करणाऱ्या आरोपींपैकी 11 आरोपींना रात्रीतून शिताफीने शोध घेवून अटक केली. तसेच उर्वरित फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी वेगवेगळे पथक रवाना करण्यात आली आहे.
मारहाण झालेल्या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल...
आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्यामुळे मारहाण करणाऱ्या आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाच आहे. सोबतच आक्षेपार्ह स्टेटस ठेवणाऱ्या व एका विशीष्ट धर्मीयांच्या भावना दुखावण्यास कारणीभुत ठरलेल्या तरुणाविरुद्ध कलम 295 अ भा.दं.वि. प्रमाणे गुन्हा दाखल करून त्यालाही पोलीसांनी ताब्यात घेतलेले आहे.
ठिकठिकाणी कडक बंदोबस्त
गंगापूर येथील घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक डॉ. पवन बनसोड गंगापुरात दाखल झाले आहे. सद्या गंगापुर शहरात व संपुर्ण औरंगाबाद जिल्ह्यात दंगा काबु पथके व ठिकठिकाणी कडक बंदोबस्त ठेवण्यात आला असून, परिस्थिती पुर्णपणे नियंत्रणात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. सोबतच व्हॉटस्अॅप, फेसबुक, इन्स्टाग्राम, प्रसारमाध्यमाव्दारे किंवा कोणत्याही प्रकारे आक्षेपार्ह वक्तव्य, मजकुर प्रसारीत करणाऱ्यांविरुद्ध कठोरात कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा औरंगाबाद ग्रामीणचे पोलीस अधीक्षक मनिष कलवानीया यांनी दिला आहे.