Aurangabad Crime News: धक्कादायक! बापाला दारूचं व्यसन, मुलांनी कायमचं संपवलं; मृतदेहावर पेट्रोल टाकून आगही लावली
Aurangabad Crime News: या प्रकरणी दोन भावाविरोधात पोलिसात बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Aurangabad Crime News: मद्यपी बापाला कंटाळून दोघा मुलांनी आपल्याच जन्मदात्या बापाची हत्या केल्याची घटना औरंगाबादच्या (Aurangabad) वैजापूर तालुक्यात समोर आली आहे. रोजच्या त्रासाला कंटाळून दोन्ही मुलांनी दारुड्या बापाची आधी काठी व गजाने मारहाण करून हत्या (Murder) केली. त्यानंतर मृतदेहावर पेट्रोल टाकून पेटवून दिल्याचे समोर आले आहे. ही 7 फेब्रुवारी रोजी सायंकाळच्या सुमारास वैजापूरच्या धोंदलगाव शिवारात उघडकीस आली. या प्रकरणी दोन भावाविरोधात पोलिसात बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नारायण रुस्तुम वाघ (वय 50 वर्षे) असे या घटनेतील मृत वडिलांचे नाव आहे. तर शुभम नारायण वाघ (वय 22 वर्षे) व विकास नारायण वाघ (वय 20 वर्षे) असे हत्या करणाऱ्या दोन्ही आरोपी मुलांचे नावं आहेत.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मयत नारायण रुस्तुम वाघ यांना दारू पिण्याचे व्यसन होते. ते दररोज दारू पिऊन त्यांची पत्नी, दोन मुले, आजी, आजोबा यांना शिवीगाळ करत असत. तसेच काही वेळा मारहाणही करत असत. अनेकदा समजवून सांगून देखील नारायण यांची सवयीत बदल होत नव्हता. दरम्यान मंगळवारी दुपारी साडेतीन वाजता देखील ते दारू पिऊन घरी आल्यानंतर त्यांच्यात आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये वादावादी झाली.
मारहाण करून जीव घेतला आणि पेटवून दिले...
मंगळवारी नारायण वाघ हे दारू पिऊन घरी आले. तेव्हा शुभम आणि विकास यांच्यासोबत नारायण यांनी वाद घालायला सुरवात केली. त्यामुळे संतापलेल्या दोन्ही भावांनी काठी व गजाने मारहाण करून वडील नारायण यांना ठार मारले. त्यानंतर त्यांचा मृतदेहावर पेट्रोल टाकून पेटवून दिले. ही बाब बाजूच्या ग्रामस्थांच्या निदर्शनास येताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर दोघेही भाऊ तेथून पळून गेले.
पोलिसांची घटनास्थळी धाव...
दोन मुलांनी आपल्या वडिलांची हत्या करून, पेटवून दिल्याची माहिती ग्रामस्थांकडून वैजापूर पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळाल्यावर रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास वैजापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. रात्री उशिरा नारायण वाघ यांचा अर्धवट जळालेला मृतदेह वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला. बुधवारी सकाळी त्यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर दुपारी चार वाजेच्या सुमारास धोंदलगाव येथे मयत नारायण वाघ यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
इतर महत्वाच्या बातम्या:
कोल्हापुरी चप्पल जीवघेणे हत्यार होऊ शकत नाही; दखलपात्र गुन्ह्यासह फौजदारी खटला न्यायालयाकडून रद्द