Aurangabad: भाजप युवा मोर्च्याच्या जिल्हाध्यक्षावर 'सीबीआय'ची रेड, मात्र प्रत्यक्षात....
Aurangabad News: मी सीबीआय अधिकारी असून तुमच्या दुकानात रेड पडल्याच या अधिकाऱ्याने सांगितले.
Aurangabad Crime News: औरंगाबादच्या पैठण येथील माजी नगराध्यक्ष तथा भाजपच्या युवा मोर्च्याचे जिल्हाध्यक्ष सुरज लोळगे यांच्या दुकानावर एका 'सीबीआय'च्या अधिकाऱ्यांने रेड केल्याचे समोर आले आहे. मात्र त्याच्या हालचालींवर संशय आल्याने लोळगे यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन चौकशी केली असता, हा तोतया 'सीबीआय'च्या अधिकारी असल्याचे समोर आले. त्यांनतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सुरज लोळगे आपल्या ज्वेलरी शॉपमध्ये असताना विट्ठल हरगुडे नावाचा व्यक्ती दुकानात आला. त्याच्या हातात एक फाईल आणि डायरी होती. त्यांनतर त्याने लोळगे यांना आपण सीबीआय ऑफिसर असून , तुमच्या दुकानावर रेड पडली असल्याच सांगितले. पण त्याच्या बोलण्यावरून सुरज यांना संशय आला. त्यामुळे त्यांनी पैठण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना फोन करून माहिती दिली. त्यांनतर या तोतया 'सीबीआय' अधिकाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, गुन्हा दाखल करण्याची प्रकिया सुरु आहे.
असा अडकला...
अधिकाऱ्यांसारख राहणीमान करून आलेल्या या तोतया 'सीबीआय' अधिकाऱ्याला सुरज यांनी सुरवातीला खरोखरचा अधिकारी समजलं. त्याच्या ओळखपत्रावर पोलीस आयुक्त सीबीआय असा उल्लेख होता. पण त्यांनतर ओळखपत्र निरखून पाहिल्यावर सुरज यांना संशय आला. त्यामुळे त्यानी पोलिसांना बोलावून घेतलं. पोलिसांनी आधी या तोतया 'सीबीआय' अधिकाऱ्याची विचारपूस करत चौकशी केली. त्यांनतर ओळखपत्र आणि अधिकारी दोन्ही बनावट असल्याची पोलिसांची खात्री झाली. त्यामुळे त्याला पैठण पोलिसांनी ताब्यात घेतले असून, सुरज लोळगे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल होत आहे.