Aurangabad:पत्नीने दारूसाठी पैसे न दिल्याने पठ्ठ्या विजेच्या खांबावर चढला
Aurangabad News: महावितरणाच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ वीज पुरवठा खंडीत केल्याने मोठा अनर्थ टळला.
Aurangabad Crime News: औरंगाबादच्या कन्नड तालुक्यातील हिवरखेडा येथे एक आगळीवेगळी घटना समोर आली आहे. मद्यपी नवऱ्याला बायकोने पाच हजार रुपये न दिल्याने हा नवरा चक्क विजेच्या खांबावर चढला असल्याने मोठी धावपळ उडाल्याच पाहायला मिळाले. त्यांनतर पोलिसांनी वेळीच धाव घेतल्याने मोठी दुर्घटना टळली.
याबाबत अधिक माहिती अशी की, हिवरखेडा येथील मच्छिंद्र बिबिसन चव्हाण (रा. हिवरखेडा-गौताळा ता. कन्नड) याने आपल्या पत्नीकडे दारूसाठी पाच हजार रुपयांची मागणी केली. मात्र बायकोने पैसे देण्यास नकार दिला. त्यांनतर त्याने पुन्हा पैसे मागितले, पण बायकोने पुन्हा पैसे नसल्याच म्हटलं. त्यामुळे हा मद्यपी नवरा बायकोने पैसे द्यावे म्हणून, चक्क विजेच्या खांबावर चढला. हे पाहताच गावातील काही लोकांनी तात्काळ याची माहिती महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिली. त्यामुळे काही वेळेतच वीज पुरवठा खंडीत करण्यात आला आणि मोठा अनर्थ टळला.
विजेच्या तारांचा झोका...
दारूच्या नशेत असलेल्या मच्छिंद्र हा फक्त खांबावर चढला नाही, तर वरती जाऊन विजेच्या तारांचा झोका केला. गावातील लोकं खाली उतरण्याची विनंती करत असताना त्याची पाच हजाराची मागणी सुरूच होती. शेवटी हतबल झालेल्या लोकांनी वायरमेनच्या हातांनी पाच हजार रुपये त्याच्याकडे पाठवले. पण पैसे बायकोच्याच हातानी घेईल म्हणून मच्छिंद्र पुन्हा अडून बसला. त्यामुळे त्याचा बायकोला खांबावर कसे पाठवायचं असा प्रश्न गावकऱ्यांना पडला.
पोलीसांच सायरन वाजताच...
मच्छिंद्रच्या आडमुठेपणामुळे गावकरी सुद्धा हतबल झाले. त्यामुळे अखेर पोलिसांना बोलवण्यात आले. काही वेळेतच कन्नड शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मात्र पोलिसांनी विनंती करूनही मच्छिंद्र खाली उतरण्यास तयार नव्हता. मग पोलिसांनी शक्कल लढवली आणि पोलीस वाहनाचं सायरन वाजवल. तेव्हा भानावर आलेला मच्छिंद्र खाली उतरला. त्यानंतर वायरमनच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मात्र मच्छिंद्रच्या या राड्यामुळे गावकऱ्यांची चांगलीच दमछाक झाली. तर तासभर गावकऱ्यांना अंधारात राहावे लागले.