Aurangabad Crime: सख्या बहिणीच्या अंगावर डिझेल टाकून पेटविण्याचा प्रयत्न; जमिनीच्या वादातून घडला प्रकार
Aurangabad Crime News: बहिणीने कसाबसा जीव वाचवून पळ काढल्याने मोठा अनर्थ टळला आहे. तर याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Aurangabad Crime News: औरंगाबादच्या वैजापूर तालुक्यातील माळी घोगरगाव येथे नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आला आहे. जमिनीच्या वादातून एका भावाने आपल्या सख्या बहिणीच्या अंगावर डीझेल टाकून तिला पेटवून देण्याचा प्रयत्न केला. मात्र बहिणीने कसाबसा आपला जीव वाचवत पळ काढल्याने मोठा अनर्थ टळला. याप्रकरणी वीरगाव पोलीस ठाण्यात बहिणीच्या तक्रारीवरून भावासह सहाजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सलमा अनिसोद्दीन सय्यद (वय 66 वर्षे) असे तक्रारदार बहिणीचे नाव असून, सिकंदर सय्यद लाल तांबोळी असे हल्ला करणाऱ्या भावाचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सलमा सय्यद या सेवानिवृत्त नर्स असून, त्यांची वैजापूर तालुक्यातील माळी घोगरगाव शिवारातील गट नंबर 178 मध्ये शेतीजमीन आहे. मात्र याच जमिनीवरून त्यांचा व त्यांचे भाऊ सिकंदर सय्यद लाल तांबोळी यांच्यात गेल्या अनेक दिवसांपासून जुना वाद आहे. दरम्यान सलमा या गुरुवारी शेतात ट्रॅक्टर लावून कपाशीची लागवडीसाठी मशागत करत होत्या. त्यावेळी त्यांचा भाऊ सिकंदर हा कुटुंबीयांसह तेथे आला. हे शेत आमचे आहे, असे म्हणत त्यांनी शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
कसाबसा वाचवला जीव...
त्यांनतर संतापेल्या सिकंदरने कॅनमधील डिझेल ट्रॅक्टरवर तसेच सलमा सय्यद यांच्या अंगावर टाकून त्यांना पेटविण्याचा प्रयत्न केला. पण सलमा यांनी कसाबसा आपला जीव वाचवून तेथून पळ काढला. या प्रकरणी सलमा सय्यद यांच्या फिर्यादीवरून सिकंदर तांबोळी, रियाज तांबोळी, उमरा बेगम सिकंदर तांबोळी, इलियास सय्यद लाल शेख, नाजीम सिकंदर तांबोळी व सजमा तांबोळी या सहाजणांविरुद्ध वीरगाव ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मध्यस्थी करणाऱ्या तरुणावर चाकू हल्ला...
दुसऱ्या एका प्रकरणात एका तरुणाला भांडणात मध्यस्थी करणे चांगलेच महागात पडले आहे. कारण दोन मित्रांमध्ये झालेल्या भांडणं सोडवण्यासाठी गेलेल्या 18 वर्षीय तरुणावर चाकू हल्ला केल्याची घटना वाळूज परिसरातील बजाजनगरमध्ये समोर आली आहे. बारावीत शिक्षण घेणाऱ्या सुमित सुभाष रुपेकर याचे मित्र सतीश आडे व गणेश म्हस्के या दोघात बुधवारी दुपारी महाविद्यालयाच्या मैदानावर भांडण झाले.
यावेळी सुमितने मध्यस्थी करून वाद दोघांचा वाद मिटवला. मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजता सुमित हा महाविद्यालयात गेल्यानंतर गणेश म्हस्केचा भाऊ किशोर म्हस्के याने त्याला बाहेर बोलावून घेतले. त्यांनतर 'तू काल माझा भाऊ गणेशसोबत भांडण का केले,' असे म्हणून सुमुतसोबत वाद घालण्यास सुरुवात केली. सुमित समजावून सांगत असताना किशोरने चाकू काढून सुमितच्या छातीवर व पोटावर वार करून जखमी केले व घटनास्थळावरून पसार झाला.