Aurangabad Crime: आठवडी बाजारातून दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; पोलिसांकडून 11 मोटारसायकल जप्त
Aurangabad Crime News: याप्रकरणी पोलिसांनी एकूण 7 जणांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून तब्बल 11 मोटारसायकल जप्त करण्यात आल्या आहेत.
Aurangabad Crime News: आठवडी बाजारातून दुचाकी चोरणाऱ्या आणि विक्री करणाऱ्या टोळीचा औरंगाबाद ग्रामीण पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. औरंगाबाद ग्रामीणच्या शिल्लेगाव पोलिसांनी ही कारवाई करत तब्बल 11 चोरीच्या मोटारसायकल ताब्यात घेतल्या आहे. याप्रकरणी पोलिसांनी एकूण 7 जणांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गेल्या काही दिवसांपासून ग्रामीण भागातील आठवडी बाजारातून दुचाकी चोरीचे प्रमाण वाढले असल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान शिल्लेगाव पोलीस ठाणे अंतर्गत असलेल्या लासुन स्टेशन येथील रविवारचा बाजारातून मोटारसायकल चोरीचा चोरट्यांनी धडाकाच लावला होता. याप्रकरणी शिल्लेगाव पोलिसांकडून 7 मोटरसायकल चोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले होते. पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरु असतानाच वाळुज एम.आय.डी.सी. येथील राहणारा संशयित व्यक्ती प्रविण सुभाष राऊत याने या चोऱ्या केल्याची माहिती पोलीस निरीक्षक मच्छिंद्र सुरवसे यांना मिळाली होती.
माहिती मिळताच सुरवसे यांच्या पथकाने सापळा रचुन संशयीत प्रविण राऊत याला ताब्यात घेऊन विचारपुस केली असता त्याने सुरवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे पोलिसांचा संशय आणखी वाढला. पोलिसांनी त्यास विश्वासात घेऊन अधिक विचारपुस केली असता अखेर त्याने लासुन स्टेशन येथील आठवडी बाजारातून दुचाकी चोरल्याची कबुली दिली. सोबतच आपल्या इतर साथीदारांच्या मध्यस्तीने या दुचाकी विक्री केल्याचीही कबुली दिली.
Aurangabad Crime News: बाहेरून केळीची बाग आतमध्ये मात्र गांज्याची झाडं; पोलिसांची कारवाई
यांच्यावर गुन्हा दाखल...
प्रविण राऊत याने दिलेल्या कबुलीवरून शिल्लेगाव पोलीसांनी, चोरीचे वाहन विक्री करण्यासाठी मध्यस्ती करणारे नितीन साहेबराव मुळे, सुभाष साहेबराव मुळे ( दोघे रा. सावखेडा ता. सोयगाव) यांना ताब्यात घेतले आहे. तसेच चोरीचे वाहन खरेदी करणारे सुनिल गुलाबराव गायकवाड (रा. तिसगाव, औरंगाबाद), संतोष नंदु मोरे (रा, करोडी, औरंगाबाद), लहु रोहीदास पवार (रा. करोडी, औरंगाबाद), सुरेश प्रभाकर हाडे (रा. सावरखेडा, औरंगाबाद) यांना तब्यात घेऊन त्यांच्याकडून चोरीच्या 11 मोटरसायकली जप्त केल्या आहेत. या सर्व दुचाकींची किंमत 5 लाख 45 एवढी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तर ही कारवाई पोलीस निरीक्षक मच्छिद्र सुरवसे, पोलीस अंमलदार तात्यासाहेब बेदरे, रविकुमार किर्तीकर, उमेश गुडे, विनोद पवार, राजेंद्र निसर्गे, अर्जुन तायडे, दादाराव तिडके, यांनी केली आहे.