धक्कादायक! चक्क निलंबित पोलीस कर्मचारीच चालवायचा जुगार अड्डा, महिलेसह 32 जण ताब्यात
Aurangabad Crime News: निलंबित पोलीस कर्मचारी एका महिलेच्या मदतीने हा जुगार अड्डा चालवत होता.
Aurangabad Crime News: औरंगाबाद शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने केलेल्या एका कारवाईत धक्कादायक माहिती समोर आली असून, चक्क एक निलंबित पोलीस कर्मचारीच जुगार अड्डा चालवत असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे हा निलंबित पोलीस कर्मचारी एका महिलेच्या मदतीने हा जुगार अड्डा चालवत होता. त्यामुळे पोलिसांनी या कारवाईत त्या महिलेला सुद्धा ताब्यात घेतले आहे. जय एस. इंगळे असे या निलंबित पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून, सीमा सुनील दाभाडे असे त्याच्या सहकारी महिलेचे नाव आहे. सोबतच ज्या हॉटेलच्या खाली जुगार अड्डा सुरु होता त्याचा व्यवस्थापक संजय किसनराव शेजूळ यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोपणीय बातमीदारामार्फत गुन्हे शाखेच्या पथकाला माहिती मिळाली होती की, मध्यवर्ती बसस्थानकाच्या समोरील हॉटेल मिझाच्या तळमजल्यावर काही लोक पत्त्यावर पैसे लावून तीर्रट नावाचा जुगार खेळत आहेत. त्यावरुन गुन्हे शाखेच्या पथकाने हॉटेल मिझाच्या तळमजल्यावर टाकलेल्या छाप्याच्यावेळी दोन मोठया हॉलमध्ये तीन टेबलच्या समोर गोलाकार बसलेले लोकं जुगार खेळताना आढळून आले. तसेच काही लोकं जमीनीवर बसून जुगार खेळत होते. त्यामुळे पोलिसांनी जुगार साहित्यासह एकूण 32 लोकांना ताब्यात घेतले. तर एकूण 3 लाख 10 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
निलंबित पोलिसच चालवायचा जुगार अड्डा...
पोलिसांनी केलेल्या कारवाईत जय एस. इंगळे नावाचा निलंबित पोलीस कर्मचारी हा जुगार अड्डा चालवत होता. विशेष म्हणजे दोन महिन्यांपूर्वी पोलीस आयुक्त कार्यालयाच्या भीतीला लागून असलेल्या ईमारतीत जुगार अड्डा चालवताना इंगळे याला गुन्हे शाखेने पकडले होते. त्यामुळे त्याला पोलीस आयुक्तांनी निलंबित सुद्धा केले होते. मात्र निलंबित झाल्यावर सुद्धा त्याने पुन्हा जुगार अड्डा थाटला होता. पण याची गुन्हे शाखेला कुणकुण लागताच त्याच्यावर पुन्हा एकदा कारवाई करण्यात आली आहे.
ग्रामीण पोलीसांकडूनही कारवाई...
शहरात झालेल्या कारवाईप्रमाणेच औरंगाबाद ग्रामीण पोलिसांनी सुद्धा वैजापूर तालुक्यातील मांडकी गावात जुगार खेळणाऱ्यांवर कारवाई केली आहे. पत्त्यावर पैसे लावून झन्ना मन्ना नावाचा जुगार खेळणाऱ्या आठ जणांविरोधात शिऊर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मांडकी शिवारात जुगाराचा अड्डा सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या आधारे छापा मारून ही कारवाई करण्यात आली आहे. तर पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातून रोख रक्कम व जुगाराचे साहित्य असे एकूण 47 हजार 50 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी शिऊर पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.