Aurangabad: थेट न्यायालयातच 'भाऊ'ने सुरु केलं मोबाईल शूट; पोलिसात गुन्हा दाखल
याप्रकरणी वेदांतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीला अटक सुद्धा करण्यात आली आहे.
Aurangabad Crime News: कारागृहातून सुनावणीसाठी न्यायालयात आणलेल्या आरोपीचे मोबाईलमध्ये चित्रीकरण करणाच्या प्रयत्न करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे. तसेच मोबाईलवर चित्रीकरण करण्यासाठी मज्जाव करणाऱ्या पोलिसांसोबत या तरुणाने धक्काबुक्की सुद्धा केल्याच समोर आले आहे. त्यांनतर याप्रकरणी वेदांतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अफसर खान सत्तार खान (20, रा. इंदिरानगर, गारखेडा) असे आरोपीचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पोलीस मुख्यालयातील सहायक फौजदार सुभाष भोसले यांच्यावर न्यायालयात आरोपी घेऊन जाण्याची जबाबदारी असल्याने शुक्रवारी ते साईनाथ अटोळे, अनिल मराठे, दीपक राठोड यांच्यासोबत हर्सुल कारागृहात गेले. त्यांनतर सुनावणी असल्याने कारागृहातून आरोपी मुकेश सुखबीर लाहोट, संतोष प्रभाकर नरवडे आणि शेख अफरोज शेख गुलाब यांना ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केले.
थेट मोबाईल सुरु केला...
आरोपींना न्यायालयात हजर केल्यानंतर भोसले न्यायालयात इतर कामकाजानिमित्त बसले होते. या दरम्यान अफसर खान तिथे आला आणि आरोपींचे चित्रीकरण आणि फोटो मोबाईलमध्ये काढण्यास सुरुवात केली. यावेळी भोसले यांनी त्याला थांबवत फोटो कशासाठी काढत असून, त्याची परवानगी आहे का असे विचारले. येथे कोण कशाला परवानगी घेईल, असे उलट उत्तर देत वाद घालायला सुरवात केली . त्यानंतर पोलिसांची कॉलर पकडून हुज्जतही घातली.
गुन्हा दाखल...
या संपूर्ण गोंधळानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्याने मोबाईल आपल्या एका मित्राकडे देत त्याला पळवून लावले. त्यामुळे पोलिसांनी त्याला न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले. यानुसार अफसर खान विरोधात वेदांतनगर पोलिसात शासकीय कामकाजात हस्तक्षेप केल्याचा गुन्हा नोंदवत अटक करण्यात आली आहे.
न्यायालयात चित्रीकरणास बंदी...
न्यायालयात कोणत्याही चित्रीकरणास अथवा फोटो काढण्यास कायदेशीर बंदी असते. त्यामुळे नायालयाच्या परवानगी शिवाय कुणीही या परिसरात मोबाईलवरून चित्रीकरण केल्यास त्यावर गुन्हा दाखल करण्यात येतो. तसेच न्यायाधीशानच्या दालनात सुद्धा मोबाईल सायलेंट मोडवर ठेवावा लागतो. त्यामुळे तुम्ही नायालयात पहिल्यांदाच जात असेल तर काळजी घ्या,अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल.