Aurangabad: 'सीएनजी'चा शहरात तुटवडा; वाहनचालकांचा तीन दिवसांपासून पंपावरच मुक्काम
CNG गॅस अनेक पंपावर तीन दिवसांपासून उपलब्ध होत नसल्याने, वाहनधारकांच्या रांगा लागल्या आहेत.
Aurangabad News: औरंगाबाद शहारासह ग्रामीण भागात सीएनजीची टंचाई निर्माण झाली आहे. अनेक पंपावर गेल्या तीन दिवसांपासून सीएनजी उपलब्ध होऊ शकला नाही. त्यामुळे वाहन चालक तीन दिवसांपासून पंपावर गाडीसह मुक्काम करत असल्याचे चित्र आहे. यात सर्वाधिक फटका रिक्षा चालकांना बसत असून, रिक्षा जागेवरच उभा करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. विशेष म्हणजे अशीच परिस्थिती औरंगाबादसह मराठवाड्यातील अनेक भागात आहे.
वाढत्या पेट्रोलला पर्याय म्हणून अनेकजण CNG ला पर्याय देत आहे. त्यामुळे गेल्या एकही दिवसात CNG वाहनांची विक्री सुद्धा मोठ्याप्रमाणावर वाढली आहे. पण असं असलं तरीही शहरात अजूनही मुबलक CNG पंप उपलब्ध होऊ न शकल्याने वाहनधारकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. तर गेल्या तीन दिवसांपासून शहरात CNG मिळत नसल्याची माहिती रिक्षा चालकांनी दिली आहे.
रिक्षा चालक अडचणीत...
पेट्रोलचे दर गगनाला भिडले असल्याने दोन पैसे वाचावे म्हणून, रिक्षा चालक CNG वर चालणाऱ्या रिक्षांना अधिक पसंती देत आहे. छावणी परिसरात राहणारे किशोर अवचार यांनी 4 महिन्यांपूर्वी रिक्षा घेतली. मात्र वेळेवर CNG मिळत नसल्याने पेट्रोल टाकण्याची वेळ आली आहे. आता पेट्रोलवर रिक्षा चालवून हातात पैसे पडत नसल्याने त्यांनी फक्त CNG वापरण्याचा निर्णय घेतला. पण कधीच वेळेवर CNG मिळत नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. तसेच दिवसातील बराच वेळ नंबर लावण्यातच जात असल्याचे चित्र आहे. त्यातच आता तीन दिवसांपासून शहरात CNG नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे गेली तीन दिवस ते आपल्या रिक्षासह पंपावर नंबर लावून बसले आहेत.
पुन्हा गाडी विकण्याची वेळ...
अनेकांनी मोठ्या मोठ्या हौसेनी घेतलं CNG कार घेतल्या. मात्र आता वेळेवर CNG मिळत नसल्याने अडचण वाढली आहे. CNG भरायचं म्हणजे नंबर लावावा लागतोय. त्यात आपला नंबर येईपर्यंत कधी संपेल याचा कोणताही अंदाज नसतो. त्यामुळे अनेकांनी नवीन घेतलेल्या CNG चारचाकी विक्रीला काढल्याचे चित्र आहे.