Aurangabad: पाणी प्रश्न पेटला असताना अनधिकृत नळजोडणी विरुद्ध कारवाईसाठी पोलीस बंदोबस्त मिळेना
शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी महानगरपालिकेनी अनधिकृत नळजोडणी विरुद्ध कारवाई आखणी केली आहे.
Aurangabad Water Issue: गेल्या काही दिवसांपासून औरंगाबाद शहरात पाणी प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी औरंगाबाद महानगरपालिका प्रयत्न करत असून, मुख्य जलवाहिनीवरील अनधिकृत नळजोडणी विरुद्ध कारवाई करण्यात येत आहे. मात्र या कारवाईसाठी पोलीस बंदोबस्त मिळत नसल्याने कारवाई पुढे ढकलण्यात आली आहे.
औरंगाबाद शहरात अनेक भागात आठ-आठ दिवस पाणी येत नाही. त्यामुळे नागरिकांवर पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ अली आहे. जायकवाडी धरणात मुबलक पाणीसाठा असतानाही औरंगाबादकरांना पिण्याचे पाणी वेळेवर मिळत नाही. अशा परिस्थितीत प्रशासनकडून काही उपाययोजना करण्यात येत आहे. ज्यात प्रामुख्याने शहरातील पहाडसिंगपुरा भागातील 400 मीमीच्या मुख्य जलवाहिनीवरील 1200 अनधिकृत नळजोडणी विरुद्ध कारवाईचा निर्णय घेण्यात आला होता. त्यासाठी बुधवारी कारवाई करण्याचे ठरले होते.
मात्र नळाची संख्या अधिक असल्याने आणि विरोध होण्याची शक्यता असल्याने पोलिसांचा बंदोबस्त मागवण्यात आला होता. परंतु महानगरपालिकेला पोलीस बंदोबस्त मिळाला नसल्याने बुधवारी कारवाई होऊ शकली नाही. तर कारवाई पुढे ढकलण्यात आल्याची माहिती मनपाच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे. पोलिसांच्या बदल्यांमुळे पोलीस बंदोबस्त मिळाला नसल्याचे सांगितले जात आहे.
शनिवारी मिळणार बंदोबस्त...
या सर्व घडामोडीवर बोलताना मनपा मुख्य लेखाधिकारी तथा विशेष पथकाचे प्रमुख संतोष वाहुळे म्हणाले की, बेगमपुरा पोलीस ठाण्याकडे बंदोबस्ताची मागणी केली आहे. पोलीस बंदोबस्तात महिला पोलीस देण्याचीही विनंती केली आहे. बुधवारी कारवाई करण्याचे आमचे नियोजन होते, मात्र ऐनवेळी पोलिसांच्या बदल्या सुरू असल्याने बंदोबस्त पुरवणे शक्य होणार नसल्याचे पोलिसांनी सांगितले. आता शनिवारी बंदोबस्त मिळणार असून या दिवशी कारवाई करण्यात येणार असल्याचं वाहुळे म्हणाले.
पिण्याच्या पाण्याचा गैरवापर करणाऱ्यांवर कारवाई
काही नागरीक जाणीवपूर्वक पिण्याच्या पाण्याचा गैरवापर करत आहे. पिण्याचे पाणी बांधकामासाठी वापरणे,नळाला तोटी न लावणे, पाणी भरणे झाल्यावर रोडवर सोडून देणे, वाहने धुणे इ.प्रकारे पाण्याचा गैरवापर करताना नागरिक पाहायला मिळत आहे. त्यामुळे 14 ते 31 मे या कालावधीत एकूण 1246 नागरिकांची तपासणी करण्यात आली. ज्यात 290 नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.