Marathwada Water: मराठवाड्यातील धरणातील एकूण पाणीसाठा 26.8 टक्के शिल्लक
Water in Marathwada dam: राज्यातील धरणातील एकूण पाणीसाठा 22.32 टक्के इतका आहे.
Marathwada Water: जून महिना संपत आला असताना अजूनही बहुतांश ठिकाणी जोरदार असा पावसाने हजेरी लावली नाही. त्यामुळे आजघडीला राज्यात 527 टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. तर मराठवाड्यातील धरणातील एकूण पाणीसाठा 26.8 टक्के शिल्लक राहिला आहे. त्यामुळे यावर्षी दमदार पाऊस न झाल्यास परिस्थिती गंभीर होऊ शकते. तसेच शेतकऱ्यांची सुद्धा चिंता वाढली आहे.
राज्यातील पाणीसाठा
राज्यातील धरणातील एकूण पाणीसाठा 20 जूननुसार 22.32 टक्के इतका आहे. विभागानुसार धरणातील पाणीसाठ्याची आकडेवारी पहिली तर, अमरावती विभागातील प्रकल्पात 32.81 टक्के, मराठवाडा विभागात 26.8 टक्के, कोकण विभागात 35.12 टक्के, नागपूर विभागात 27.39 टक्के, नाशिक विभागात 21.21 टक्के, पुणे विभागात 13.28 टक्के पाणीसाठा उपलब्ध असल्याची माहिती मंत्रालयातून देण्यात आली आहे.
राज्यात 527 टँकर्सने पाणीपुरवठा
राज्यात २० जूननुसार 634 गावे आणि 1396 वाड्यांना 527 टँकर्सद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यामध्ये शासकीय टँकर्सची संख्या 88 तर खाजगी टँकर्सची संख्या 439 इतकी आहे. मागील आठवड्यात टँकर्सची संख्या 501 इतकी होती. पावसाला सुरुवात झालेली असल्यामुळे एक-दोन दिवसात टँकर्स कमी होतील अशी आशा व्यक्त केली जात आहे.
मराठवाड्यात जवळपास एक लाख हेक्टरवर पेरणी...
मराठवाड्यात जवळपास १ लाख ८ हजार ५९९ हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली आहे. ज्यात जालना जिल्ह्यात सर्वाधिक 29 हजार 93 हेक्टरवर पेरणी झाली आहे. तर त्यापाठोपाठ नांदेड जिल्ह्यात 27 हजार 831 हेक्टर, औरंगाबाद जिल्ह्यात 20 हजार 828 हेक्टर, बीड 16 हजार 436 हेक्टर, परभणी ११ हजार ६३ हेक्टर, उस्मानाबाद 3 हजार 258 हेक्टर तर लातूर जिल्ह्यात केवळ 90 हेक्टर क्षेत्रावर पेरणी उरकली आहे. मात्र पेरणी झालेल्या अनेक भागांत आता पेरणीनंतर पावसाने दांडी मारल्याने पिकांना पाण्याची नितांत गरज भासते आहे. तर पाऊस कधी पडणार याकडे बळीराजाचे लक्ष लागून आहे.