(Source: ECI/ABP News/ABP Majha)
औरंगाबादेतील कोविड रुग्णालयाचं काम पूर्ण होण्याआधीच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
औरंगाबादेत महामंडळाच्यावतीने 256 खाटांचं कोविड केअर सेंटर उभारण्यात आलं आहे. मात्र या रुग्णालयांचं काम अद्याप अपूर्ण आहे. अनेक वॉर्डमध्ये खाटाही नाहीत. मात्र त्याआधीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या रुग्णालयाचं ई-लोकार्पण करण्यात आलं आहे.
औरंगाबाद : औरंगाबादेत एकीकडे रोज 100 पेक्षा अधिक रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह येत आहेत. जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 3 हजार पेक्षा अधिक आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता औरंगाबादमध्ये स्वतंत्र कोविड केअर सेंटरची उभारणी करण्याचा निर्णय घेतला. चिकलठाणा परिसरात 256 खाटांच्या रुग्णलयाचे 12 जूनला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ई-लोकार्पण झालं. मात्र अद्याप या रुग्णालयाचे काम पूर्ण झालेलं नाही. मग ही लोकार्पणाची घाई का? हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो आहे.
औरंगाबाद शहरात कोरोनाचा भयंकर उद्रेक झाला आहे. बाधित रुग्णांवर घाटी रुग्णालय, चिकलठाणा येथील कोविड रुग्णालय तसेच मनपाच्या वेगवेगळ्या कोविड केअर सेंटरमध्ये उपचार करण्यात येत आहेत. मात्र, कोरोनाबाधितांचा दररोज वाढणारा आकडा बघता आगामी काळात आरोग्य यंत्रणा कमी पडू नये, यासाठी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी एमआयडीसीच्या वतीने सुसज्ज कोविड रुग्णालय उभारण्याची घोषणा केली होती.
औरंगाबादेत महामंडळाच्यावतीने उभारलेल्या 256 खाटांच्या कोविड केअर सेंटरमध्ये 128 खाटांना ऑक्सिजन सुविधा उपलब्ध आहे. याबरोबरच आयसीयू, एक्स-रे आदी आवश्यक सुविधाही याठिकाणी आहेत. या रुग्णालयासाठी लागणारे 115 मनुष्यबळ राष्ट्रीय आरोग्य अभियानातून उपलब्ध करुन देण्यात येईल, असं आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांनी ऑनलाइन उद्घाटन केलेल्या या रुग्णालयाची काय स्थिती आहे हे पाहण्यासाठी आम्ही ही एअरपोर्ट समोरील हे रुग्णालय गाठलं. कोविड रुग्णालयाच्या दारातच 12 जूनला लोकार्पण केल्याची कोनशिला होती. दारावर उद्घाटनाच्या वेळी लावलेले हारही सुकलेले होते. दारात साफसफाईचे काम सुरू होतं. दोन महानगरपालिकेचे सिक्युरिटी गार्ड आणि इतर काही मंडळी काम करत होती. या दोन मजली इमारतीमध्ये आठ वॉर्ड आहेत. खालच्या मजल्यावर सहा तर वरच्या मजल्यावर दोन वॉर्ड आहेत. यातील खालच्या मजल्यावरील काही वॉर्डमध्ये खाटा टाकलेल्या आहेत. कुठे-कुठे इमारतीचा रंगरंगोटीचे काम सुरू आहे. तर काही वॉर्डमध्ये अद्याप खाटाही टाकलेल्या नाही.
वरच्या मजल्यावरील वॉर्ड क्रमांक सात आणि आठमध्ये एकही खाट टाकलेली नाही. अनेक रूम स्वच्छही नाहीत. रुग्णालयाची सद्यस्थिती पाहता आणखी दहा दिवस तरी काम पूर्ण होईल, अशी शक्यता वाटत नाही. मग या रुग्णालयाच्या उद्घाटनाचा घाट कशासाठी घातला, तोही ऑनलाईन हा प्रश्न हे रुग्णालय पाहिल्यानंतर पडतो. केवळ औरंगाबादकरांच्या समाधानासाठी सरकार काहीतरी करते आहे. यासाठी हा उद्घाटन सोहळा पार पडला का? हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो.
कोरोनाबाधित रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे रुग्णांना खाट मिळणे मुश्कील झालंय. हे रुग्णालय उभं राहिल्यानंतर 250 रुग्णांची सोय होऊ शकेल. मात्र केवळ या रुग्णालयाचे ऑनलाईन उद्घाटन झालं. मुख्यमंत्र्यांचा प्रोटोकॉल विभाग यावेळी नेमका काय करत होता? त्यांनी मुख्यमंत्र्यांना योग्य सूचना दिल्या नाहीत का? अधिकाऱ्यांनी रुग्णालय पूर्ण झालं नाही, याची माहिती मुख्यमंत्र्यांपर्यंत पुरवली नाही का? हे प्रश्न भाजपाचे नेते प्रमोद राठोड यांनी विचारले आहेत.
इम्तियाज जलील यांची टीका
मुख्यमंत्र्यांनी या रुग्णालयाचे उद्घाटन केलं त्यावेळी याचं केवळ 50 टक्के काम झालेलं होतं. आजही डॉक्टर नाहीत, नर्सेस नाहीत, इक्विपमेंट नाहीत, तरीदेखील उद्घाटन करण्यात आलं. मुख्यमंत्री यांना वाटलं असेल की असं केलं नाही, तर राष्ट्रवादीवाले किंवा काँग्रेसवाले या रुग्णालयाचं उद्घाटन करतील. म्हणूनच मुख्यमंत्र्यांनी या रुग्णालयाचं घाईघाईत उद्घाटन केलं. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना मुख्यमंत्र्यांनी असं करणं त्यांना शोभत नाही, असं खासदार इम्तियाज जलील यांनी म्हटलं.
MNS | मनसेनं मदत केलेल्या कोरोनाबाधित महिलेला कन्यारत्न, कन्येची जबाबदारी महिला पदाधिकाऱ्याकडे