Maratha Reservation : 24 डिसेंबरचा आग्रह धरू नका, मराठा आरक्षण मिळणारच; गिरीश महाजनांची मनोज जरांगेंना ग्वाही
Girish Mahajan Meet Manoj Jarange : मराठा समाजाला टिकणारं आरक्षण द्यायचं असेल तर अजून थोडा वेळ लागेल असं राज्याचे मंत्री गिरीश महाजन म्हणाले.
औरंगाबाद: मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) विषयावर राज्य सरकार गंभीर असून त्यावर गतीने काम सुरू आहे, फक्त जरांगेंनी दिलेले 24 डिसेंबरचे अल्टिमेटम मागे घ्यावे, त्याचा आग्रह धरू नये असं आवाहन राज्याचे मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी केलं. मराठा समाजाला आरक्षण हे मिळणारच असं आश्वासनही त्यांनी दिलं. राज्य सरकारचे एक शिष्टमंडळ मनोज जरांगेंच्या (Manoj Jarange) भेटीला गेलं होतं. त्यावेळी गिरीश महाजनांनी जरांगेंना वेळ वाढवून देण्याचं आवाहन केलं.
मराठा आरक्षणाच्या विषयावर राज्य सरकारचं काम हे गतीने सुरू असून मनोज जरांगे यांनी जरा सबुरीनं घ्यावं असं राज्याचे मंत्री गिरीश महाजन म्हणाले. त्यावर बोलताना आतापर्यंत सरकारला भरपूर वेळ दिला, सरकारने ठरल्याप्रमाणे करावं अशी मागणी जरांगे यांनी केली. त्यानंतर बोलताना गिरीश महाजन म्हणाले की, मागासवर्गीय आयोगाच्या कामाला वेळ अजून लागेल. राज्यात आतापर्यंत 54 लाख नोंदी सापडल्या आहेत. त्यामुळे राज्य सरकार आरक्षणाच्या विषयावर काम करतंय हे नक्की.
मराठा आरक्षणासाठी थोडासा वेळ लागेल
गिरीश महाजन म्हणाले की, जरांगे यांनी 24 तारखेचा अल्टिमेटम आहे, पण अजून वेळ द्या. शेवटी समाजाचं हित महत्त्वाचं आहे. मराठा समाजाला टिकणारं आरक्षण द्यायचं असेल तर अजून थोडा वेळ लागेल. मराठा आरक्षणावर क्युरेटिव्ह पिटिशन आणि मागासवर्गीय आयोग हे दोन पर्याय आहेत.
भुजबळ आणि जरांगे यांनी शांतता राखावी
मराठा आरक्षणाच्या विषयावर मनोज जरांगे आणि राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांच्यात शाब्दिक वार सुरू आहेत. त्यावर बोलताना गिरीश महाजन म्हणाले, शब्दाला शब्द लागतो आणि वाद वाढतो. त्यामुळे छगन भुजबळ आणि मनोज जरांगे या दोघांनीही शांतता बाळगावी.
मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावरून शासनाची तयारी कुठपर्यंत आली आहे, शिंदे समितीच्या आतापर्यंतच्या अभ्यासाची माहिती या शिष्टमंडळाने मनोज जरांगे (Manoj Jarange) यांना दिली. तसेच शिष्टमंडळांने मनोज जरांगे यांच्या तब्येतीचीही चौकशी केली आणि त्यांना काळजी घेण्याचं आवाहन केलं. राज्य सरकारच्या शिष्टमंडळात राज्याचे मंत्री गिरीश महाजन आणि संदीपान भुमरे हे होते. त्यांनी जरांगे यांची रुग्णालयात भेट घेतली आणि मराठा आरक्षणाच्या विषयावर चर्चा केली.
ही बातमी वाचा: