एक्स्प्लोर
घडलं बिघडलं | 2018 मध्ये घडलेल्या औरंगाबादमधील 10 घटना
औरंगाबादसाठी 2018 हे वर्ष गाजलं ते कचरा प्रश्न, कोरेगाव भीमाचे पडसाद आणि औरंगाबादच्या दंगलीने. तसेच मराठा मोर्चाचे केंद्र असलेल्या औरंगाबादमध्ये वर्षभर मराठा आरक्षणासाठी वेगवेगळ्या आंदोलनांनी. वर्षभरात औरंगाबादमध्ये घडलेल्या 10 घटनांचा आढावा.
औरंगाबाद : औरंगाबादसाठी 2018 हे वर्ष गाजलं ते कचरा प्रश्न, कोरेगाव भीमाचे पडसाद आणि औरंगाबादच्या दंगलीने. तसेच मराठा मोर्चाचे केंद्र असलेल्या औरंगाबादमध्ये वर्षभर मराठा आरक्षणासाठी वेगवेगळ्या आंदोलनांनी. वर्षभरात औरंगाबादमध्ये घडलेल्या 10 घटनांचा आढावा.
1 - कोरेगाव भीमाचे पडसाद
वर्षाच्या सुरुवातीलाच कोरेगाव भीमाच्या घटनेनंतर औरंगाबाद शहरात या घटनेचे पडसाद सलग तीन दिवस उमटत होते. शहरातील वेगवेगळ्या भागांमध्ये दगडफेक जाळपोळीचे प्रकार सुरू होते.
2- औरंगाबाद की कचराबाद ?
औरंगाबाद शहरालगत असलेल्या नारेगावच्या लोकांनी त्यांच्या परिसरात शहरातील कचरा टाकण्यास विरोध केला. त्यामुळे शहरात कचर्याचे मोठमोठे ढीग लागायला सुरुवात झाली. म्हणून औरंगाबादचा कचरा प्रश्न इतका गाजला की, औरंगाबादला कचराबाद असं म्हणायला सुरुवात झाली.
3- कचरा प्रश्नावरून दंगल
औरंगाबाद शहरातील कचरा प्रश्न ऐरणीवर आला होता. कचरा कुठे डंप करायचा याचा काही तोडगा निघत नव्हता. काही दिवसात शहरालगत असलेल्या पडेगावात कचरा टाकण्याचं ठरलं गेलं. महापालिकेच्या कचऱ्याच्या गाड्या जेव्हा पडेगावात गेल्या तेव्हा कचरा प्रश्नावरून पडेगावात दंगल झाली. दगडफेक, जाळपोळीच्या घटना घडल्या. या घटनेत काही आंदोलक आणि पोलीस कर्मचारी जखमी झाले. पोलिसांनी आंदोलकांवर केलेली अमानुष मारहाण सीसीटीव्हीत कैद झाली. प्रकरण थेट अधिवेशनात गाजलं. याच प्रकरणात औरंगाबादचे पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं आणि नंतर त्यांची बदली करण्यात आली. याच कचरा प्रश्नाला कंटाळून औरंगाबादचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी पुण्याला बदली मागून घेतली. तसेच महानगरपालिकेचे आयुक्त प्रकाश महाजन यांचीही बदली झाली. वर्ष सरलं तरी औरंगाबादचा कचरा प्रश्न अद्यापही कायम आहे.
4- दंगलीत दोन जणांनी गमावले जीव
औरंगाबादमधील जुन्या शहरात 12 मेच्या रात्री दोन समाजात दंगल उसळली होती. किरकोळ कारणावरून सुरुवात झालेली दंगल पाहता-पाहता जुन्या शहरातील काही भागात पसरली. या दंगलीत काही दुकाने जाळली गेली, दगडफेक झाली. या दंगलीत दोन लोकांना आपले प्राण गमवावे लागले. अनेक पोलिसांसह नागरिकही जखमी झाले होते.
5- मराठा मोर्चाला गालबोट
मराठा समाजाला 2018 साली आरक्षण मिळालं. या आरक्षणाचं मुख्य केंद्र होतं औरंगाबाद. याच औरंगाबाद शहरातून पहिला मराठा क्रांती मूक मोर्चा निघाला. या आदर्शवादी मोर्चाची मुहूर्तमेढ औरंगाबादमध्ये रोवली गेली होती. मात्र याच औरंगाबाद शहरामध्ये ऑगस्ट महिन्यात मराठा क्रांती ठोक मोर्चा दरम्यान शहरालगत असलेल्या वाळूज एमआयडीसीमध्ये मोठ्या प्रमाणावर कंपन्यांची तोडफोड करण्यात आली. ही तोडफोड सीसीटीव्हीमध्ये कैदही झाली .या तोडफोडीने मराठा क्रांती मूक मोर्चाला गालबोट लागलं. ते याच 2018 सालमध्ये, हे प्रकरण राज्यभर गाजले.
6-जायकवाडीला 12 टीएमसी पाणी
पावसाने दडी दिल्यामुळे मराठवाड्याच्या नशिबी यावर्षी देखील दुष्काळ आला आणि याचा सर्वाधिक फटका औरंगाबाद शहराला बसला. औरंगाबाद जालना या दोन जिल्ह्यासह तीनशे गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या जायकवाडी धरणाचा पाणी प्रश्न पुन्हा उभा ठाकला. जायकवाडी धरणात पाणी सोडण्यावरून नगर विरुद्ध नाशिक असा संघर्ष याही वर्षी पाहायला मिळाला. अखेर जायकवाडी धरणात 12 टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय झाला. या निर्णयाला नगर नाशिकचा मोठ्या प्रमाणावरती आंदोलनातून विरोध पाहायला मिळाला.
7- महापालिकेत गोंधळ
औरंगाबाद महानगर पालिकेची सर्वसाधारण सभा आणि गोंधळ हे गणित जणू नित्याचाच. 2018 या वर्षभरात महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत अनेक गोंधळ पाहायला मिळाले. मात्र वंदे मातरमला एमआयएमने विरोध केला आणि त्यावरून भाजपा शिवसेनेच्या नगरसेवकांना एमआयएमच्या नगरसेवकांना भर सभेत चोप दिला. काही दिवसानंतर एमआयएमचे नगरसेवक सय्यद मतीन यांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली देण्यास विरोध केला यावरून देखील महापालिकेत राडा पाहायला मिळाला.
8-वंचित बहुजन आघाडीच्या युतीची मुहूर्तमेढ
राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणाऱ्या घटना औरंगाबादेत पाहायला मिळाली .एमआयएम आणि प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीच्या युतीची मुहूर्तमेढ देखील औरंगाबादेत रोवली गेली. दोन ऑक्टोबर, गांधी जयंतीला या नव्या युतीची सभा झाली. या सभेकडे राज्याचं लक्ष लागलं होतं.
9- घाटी रुग्णालयातील भोंगळ कारभार
मराठवाड्यासह खानदेश आणि विदर्भातील काही जिल्ह्याचे रुग्ण औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात उपचारासाठी येतात. मात्र 2018 यावर्षी औरंगाबादेतल्या या घाटी रुग्णालयातील जवळपास सर्व औषधे संपली. त्यामुळे ऑपरेशन थांबवण्यात आले. सर्वसामान्य रुग्णांना कित्येक दिवस औषधे मिळाली नाही. याच घाटी रुग्णालयाच्या प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे एका चिमुकलीला आपल्या वडिलांच्या उपचारादरम्यान सलाईन स्टॅन्ड घेऊन तासभर पायाच्या टाचा उंचावून उभा रहावं लागलं. हे प्रकरण देखील महाराष्ट्रभर गाजलं होतं.
10- वसतिगृहात घुसून विद्यार्थीनीची हत्या
वर्षाकाठी मराठवाड्यातील नामांकित महाविद्यालय असलेल्या एमजीएमच्या विद्यार्थिनी वसतिगृहामध्ये वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या आकांक्षा देशमुख या विद्यार्थिनीचा खून झाला. हत्या की आत्महत्या या गोंधळात असलेल्या पोलिसांनी अखेर आकांक्षाचा खून झाला हे मान्य करून उत्तर प्रदेशातील एका कामगाराला बेड्या ठोकल्या. हा कामगार विद्यार्थिनीच्या वसतिगृहा शेजारी काम करत होता. चोरीच्या उद्देशाने तो आकांक्षाच्या रूममधे शिरला आणि आकांक्षाने विरोध करताच गळा दाबून तिचा निर्घुण खून केला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
महाराष्ट्र
क्राईम
क्रीडा
Advertisement