औरंगाबादमधील रेमडेसिवीर चोरी प्रकरणी मनपा मुख्य फार्मासिस्टचं निलंबन, सहाय्यक फार्मासिस्टच्या सेवा समाप्तीचे आदेश
औरंगाबाद महापालिकेच्या मेल्ट्रॉन कोविड केअर सेंटरमधून 48 रेमडेसिवीर इंजेक्शन गायब झाले होते. या प्रकरणी मनपा मुख्य फार्मासिस्टचं निलंबन करण्यात आलं असून सहाय्यक फार्मासिस्टच्या सेवा समाप्तीचे आदेश देण्यात आले आहेत.
औरंगाबाद : औरंगाबादमधल्या रेमडेसिवीर इंजेक्शन चोरीप्रकरणी महापालिका मुख्य फार्मासिस्ट रगडे यांचं निलंबन करण्यात आलं आहे. तर कंत्राटी पद्धतीवरील सहाय्यक फार्मासिस्ट प्रणाली कोल्हे यांच्या सेवा समाप्तीचे आदेश देण्यात आले आहे. महापालिका मुख्य प्रशासक आस्तिक पांडे यांनी हे आदेश दिले आहेत. शिवाय गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. मनपाच्या मेल्ट्रॉन कोविड केअर सेंटरमधून 48 रेमडेसिवीर इंजेक्शन गायब झाले होते.
औरंगाबाद महापालिकेच्या मेल्ट्रॉन कोविड सेंटरमधून रेमडेसिवीर इंजेक्शनचा बॉक्स गायब झाल्याचं 27 एप्रिल रोजी निदर्शनास आलं होतं. या बॉक्समध्ये 48 इंजेक्शन होते. या प्रकरणी महापालिका आरोग्य विभागातील पाच जणांना नोटीस देण्यात आली होती. समाधानकारक उत्तर आलं नाही आणि बॉक्सचा शोध लागला नाही तर पुढची कारवाई करण्यात येणार असल्याचं महापालिकेच्या आरोग्य अधिकारी नीता पाडळकर यांनी सांगितलं होतं.
25 एप्रिल रोजी मेल्ट्रॉन कोविड सेंटरसाठी इंजेक्शनचे तीन बॉक्स देण्यात आले होते. त्याची रीतसर नोंद करुन आरोग्य कर्मचाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आले. पण त्यापैकी दोनच मेल्ट्रॉनला पोहोचले. 24 तासांनंतर झालेल्या तपासणीत एक बॉक्स गायब झाल्याचे उघड झाले. बॉक्स कुठे गेला याबाबत माहिती आली नाही तर गुन्हा दाखल करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.
अखेर महापालिका मुख्य प्रशासक आस्तिक पांडे यांनी कठोर कारवाई करत महापालिका मुख्य फार्मासिस्ट यांचं निलंबन आणि कंत्राटी पद्धतीवरील सहायक फार्मासिस्ट यांच्या सेवा समाप्तीचे आदेश दिले आहेत.