एक्स्प्लोर
औरंगाबादच्या हर्सूल कारागृहातील उपचार घेत असलेले दोन कोरोना पॉझिटिव्ह कैदी पळाले
औरंगाबादमधील हर्सूल कारागृह 100 टक्के लॉकडाऊन करण्याचा निर्णय गृहमंत्र्यांनी घेतला. मात्र तरीदेखील या जेलमधील 29 कैद्यांना कोरोनाची लागण झाली. आता त्यातच उपचार घेत असलेले कैदी पळाल्यानंतर पुन्हा एकदा प्रशासनाच्या व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
औरंगाबाद : औरंगाबादच्या हर्सूल कारागृहातील दोन कोरोना पॉझिटिव्ह कैदी पळाले आहेत. हर्सूल कारागृहातील 29 कैद्यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे शहरातील किल्लेअर्क कोविड सेंटरला उपचारासाठी हलवण्यात आले होते. या 29 कैद्यांना प्रत्येक रुममध्ये 2 कैदी असे 15 रूममध्ये उपचारासाठी ठेवण्यात आले होते. त्यातील एका रूममधील दोन कैद्यांनी आपल्या रुमच्या मागच्या खिडकीचे गज वाकवून काल रात्री उशिरा पळून गेले. अक्रम खान गयास खान आणि सय्यद कैफ सय्यद असद अशी कैद्यांची नाव आहेत.
हे दोन्ही कैदी कोरोना पॉझिटिव्ह आहेत. जेल प्रशासनानं रात्री उशिरा शहरातील बेगमपुरा पोलिस ठाण्यात तक्रार दिल्याची माहिती जेल अधिकारी हिरालाल जाधव यांनी दिली आहे. हे दोन्ही कैदी कोरोना पॉझिटिव्ह असल्यानं यांना शोधण्याचं आव्हान पोलिस आणि जेल प्रशासनासमोर आहे. खरं तर याठिकाणी कैदी उपचार घेत आहेत, त्यामुळे जेल प्रशासनाच्या वतीने एक जेलर आणि इतर कर्मचाऱ्यांचा मोठा फौजफाटा तैनात केला आहे. मात्र तरीदेखील हे कैदी कसे पळाले? हा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतो आहे.
औरंगाबाद शहरातल्या हर्सूल कारागृहात क्षमतेपेक्षा अधिक कैदी असल्यामुळे हे जेल शंभर टक्के लॉकडाऊन करण्याचा निर्णय गृहमंत्र्यांनी घेतला आहे. मात्र तरीदेखील या जेलमधील 29 कैद्यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं. आता त्यातच उपचार घेत असलेले कैदी पळाल्यानंतर पुन्हा एकदा प्रशासनाच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
माहितीनुसार, या कैद्यांनी पळून जाण्यासाठी दोन दिवस प्लान केला. मागच्या बाजूला रात्रीच्या वेळी सुरक्षा कमी असतात हे त्यांच्या लक्षात आलं. रात्री 10 नंतर त्यांनी मागच्या खिडकीचे गज वाकवले. या कोरोना पॉझिटिव्ह कैद्यांवर कोविड सेंटरच्या दुसऱ्या मजल्यावर उपचार सुरू होते. याच दुसऱ्या मजल्याच्या खिडकीतून खाली उतरण्यासाठी त्यांनी पांघरण्यासाठी आणि अंथरण्यासाठी दिलेले बेडशीट एकाला एक बांधले आणि त्याच्या साहाय्याने खाली उतरत धूम ठोकली.
रात्री कैदी पळून जात असताना काही लोकांनी त्यांना अडवलं आणि विचारलं देखील. मात्र आम्हाला लोक मारत आहेत म्हणून आम्ही पळत आहोत, असे उत्तर त्यांनी दिलं. तरीही संशय आल्याने काही तरुणांनी ही बाब सिटी चौक पोलिसांना कळवली होती मात्र पोलिसांनी याकडे दुर्लक्ष केलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
पुणे
महाराष्ट्र
बीड
Advertisement