Aurangabad News : धक्कादायक! उंची कमी असल्याने 23 वर्षीय तरुणीने उचललं टोकाचं पाऊल; औरंगाबादच्या सातारा परिसरातील घटना
Aurangabad News : औरंगाबादमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कमी उंचीचा सतत विचार करुन तणावाखाली गेलेल्या एका 23 वर्षीय तरुणीने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली आहे.
औरंगाबाद : परीक्षेचा तणाव, आर्थिक तणाव, घरगुती वाद अशा अनेक कारणांनी आत्महत्या (Suicide) केल्याच्या घटना रोज कुठे ना कुठे समोर येत असतात. मात्र औरंगाबादमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कमी उंचीचा सतत विचार करुन तणावाखाली गेलेल्या एका 23 वर्षीय तरुणीने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली आहे. सोमवारी (4 सप्टेंबर) रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला आहे. प्राथमिक चौकशीत,या तरुणीने उंचीच्या तणावातूनच हे पाऊल उचलल्याचा अंदाज कुटुंबाने पोलिसांकडे व्यक्त केला.अर्चना विजयकुमार यादव (वय 23 वर्षे) असे आत्महत्या करणाऱ्या मुलीचं नाव आहे
पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मूळ उत्तर प्रदेशचे असलेले यादव कुटुंब 20 वर्षांपासून औरंगाबाद शहरातील साताऱ्यात वास्तव्यास आहेत. तर, अर्चनाचे वडील विजयकुमार यांचा फरशीचा व्यवसाय असून आई गृहिणी आहे. सोमवारी अर्चना आईसोबत घरीच होती. रात्री आठ वाजता अर्चना खोलीत गेली. साडेआठ वाजण्याच्या सुमारास आईने हाका मारुनही खोलीतून प्रतिसाद येत नसल्याने आईने खोलीकडे धाव घेतली. तेव्हा अर्चना गळाफास घेतलेल्या अवस्थेत आढळली. घटनेची माहिती मिळताच सातारा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर पोलिस अंमलदार विष्णू जगदाळे आणि पृथ्वीराज चव्हाण यांनी अर्चनाचा मृतदेह घाटी रुग्णालयात पाठवला.
उंची कमी असल्याने केली आत्महत्या?
अर्चना आपल्या आई-वडिलांसह सातारा परिसरात राहत होती.तिला एक बहीण विवाहित आहे. तिला दोन भाऊ आहेत. पोलिसांनी विचारपूस केली, तेव्हा अर्चनाने कमी उंचीमुळे हे पाऊल उचलले असावे, असा अंदाज नातेवाईकांनी व्यक्त केला. तसेच आपली उंची कमी असल्याने अर्चना नेहमी तणावात असायची अशी माहिती तिच्या कुटुंबीयांनी दिल्याची पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान या प्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून,पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली विष्णू जगदाळे तपास करत आहेत.
महिलेसह कामगाराने सोबतच रेल्वेखाली उडी घेऊन केली आत्महत्या
दुसऱ्या एका घटनेत, कंपनीत सोबत काम करणाऱ्या विवाहित पुरुषासह महिलेने रेल्वेखाली उडी घेत आत्महत्या केली. कुंभेफळ शिवारातील लाडगाव उड्डाणपुलाजवळ मंगळवारी (5 सप्टेंबर) सकाळी सहा वाजता ही खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. विलास विष्णू गोजे (वय 35 वर्षे, रा. कुंभेफळ, ता. औरंगाबाद) व सीमा दिलीप मिसाळ (वय 29 वर्षे, रा. गवळीपुरा, औरंगाबाद, ह.मु. कुंभेफळ) अशी आत्महत्या करणाऱ्यांची नावे आहेत.
जालना रेल्वे लाईनवर लाडगाव उड्डाणपुलाजवळ कुंभेफळ शिवारात मंगळवारी सकाळी सहा वाजता एक पुरुष व महिला रेल्वेच्या धडकेत ठार झाल्याची माहिती करमाड पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता त्यांना एकाच ठिकाणी रेल्वे लाईनच्या विरुद्ध दिशेला महिला व पुरुष गंभीर जखमी अवस्थेत मिळून आले. पोलिसांनी त्यांना घाटीत दाखल केले असता डॉक्टरांनी दोघांनाही तपासून मयत घोषित केले. त्यानंतर पोलिसांनी त्यांची ओळख पटवली असता विलास गोजे आणि सीमा मिसाळ असे त्यांची नावं असल्याचं समोर आले.