आदित्य ठाकरेंनी सत्तारांचे चॅलेंज स्वीकारले; सिल्लोड, पैठणमध्ये 'ठाकरे' तोफ धडाडणार
Maharashtra Aurangabad News : आदित्य ठाकरेंनी अब्दुल सत्तारांचं चॅलेंज स्विकारलं असून आता ठाकरेंची शिवसंवाद यात्रा सिल्लोड आणि पैठणमध्ये निघणार आहे.
Aurangabad News : गेल्या काही दिवसांपासून कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) आणि आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्यातील आरोप-प्रत्यारोप काही थांबता थांबत नसल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे, गेल्यावेळी औरंगाबादमध्ये (Aurangabad News) शिवसंवाद यात्रा (Shiv Samwad Yatra) काढणाऱ्या आदित्य ठाकरेंना सिल्लोडमधून शिवसंवाद यात्रा काढून दाखवावी असे चॅलेंज अब्दुल सत्तार यांनी केले होते. त्यामुळे सत्तार यांचे चॅलेंज स्वीकारत आदित्य ठाकरे 7 नोव्हेंबरला सिल्लोडमध्ये शिवसंवाद यात्रा काढत मेळावा घेणार असल्याची माहिती विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी माध्यमांना दिली आहे. सोबतच आदित्य ठाकरे हे औरंगाबादचे पालकमंत्री संदिपान भुमरे यांच्या मतदारसंघात देखील शेतकरी मेळावा घेणार आहे.
गेली अडीच वर्षे ठाकरे कुटुंबीय केवळ मातोश्रीवर बसून असल्याचा आरोप सतत विरोधकांकडून केला जात आहे. याच आरोपाला प्रत्युत्तर देण्यासाठी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करतांना पाहायला मिळाले. गेल्या महिन्यात उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादच्या गंगापूर तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. दरम्यान आदित्य ठाकरे यांनी देखील पुण्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. त्यात आता पून्हा एकदा उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे शेतकरी मेळावे घेत आहे. त्याचाच एक भाग म्हणजे सिल्लोड आणि पैठण मतदारसंघात आदित्य ठाकरे हजेरी लावणार आहे.
आदित्य ठाकरेंचा दोन दिवसीय दौरा...
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आदित्य ठाकरे यांचा दोन दिवसीय औरंगाबाद दौरा असणार आहे. ज्यात 7 नोव्हेंबरला आदित्य ठाकरे सिल्लोड मतदारसंघाचा दौरा करणार आहे. यावेळी ते सिल्लोडमध्ये शिवसंवाद मेळाव्याला हजेरी लावणार आहे. त्यानंतर मुक्कामी असणारे आदित्य ठाकरे दुसऱ्या दिवशी औरंगाबादचे पालकमंत्री संदिपान भुमरे यांच्या मतदारसंघात शेतकरी मेळाव्याला हजेरी लावणार आहे. त्यामुळे आता सत्तार, भुमरे यांच्या मतदारसंघात आदित्य ठाकरेंची तोफ गडाडणार असून, ते काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
भुमरे-सत्तार ठाकरेंच्या निशाण्यावर...
शिवसेनेत झालेल्या बंडखोरीत शिंदे गटात औरंगाबादचे पाच आमदार सहभागी झाले. ज्यात संदिपान भुमरे आणि अब्दुल सत्तार यांची भूमिका महत्त्वाची समजली जाते. पुढे या दोघांना मंत्रीपद सुद्धा मिळाले. त्यामुळे औरंगाबाद मधील हे दोन्ही नेते ठाकरेंच्या निशाण्यावर पाहायला मिळतात. यापूर्वी देखील शिवसंवाद यात्रा भूमरेंच्या मतदार संघातून काढण्यात आली होती. आता पुन्हा भुमरे यांच्याच मतदारसंघात आदित्य ठाकरेंचा शेतकरी मेळावा होतोय. तसेच सत्तार यांच्या मतदारसंघात सुद्धा आदित्य ठाकरे मेळावा घेणार आहे. त्यामुळे सद्यातरी भुमरे आणि सत्तार हे दोन्ही नेते ठाकरेंच्या निशाण्यावर असल्याचं बोललं जात आहे.