मंत्री बच्चू कडूंवर दाखल गुन्ह्यांच्या प्रकरणात नवा ट्विस्ट; पोलीस अधिक्षकांचा अहवाल 'माझा'च्या हाती
Akola Big Breaking : 11 मार्च रोजी अकोला जिल्हा पोलीस अधिक्षक जी. श्रीधर यांनी राज्यपालांना दिलेल्या अहवालात पालकमंत्री बच्चू कडूंवर गुन्हे दाखल करण्याइतपत पुरावे नसल्याचं नमूद केलं होतं.
Akola Big Breaking : बच्चू कडू (Bacchu Kadu) यांच्यावर गुन्हे दाखल होण्याच्या प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. 11 मार्च रोजी अकोला जिल्हा पोलीस अधिक्षक जी. श्रीधर यांनी राज्यपालांना दिलेल्या अहवालात पालकमंत्री बच्चू कडूंवर गुन्हे दाखल करण्याइतपत पुरावे नसल्याचं नमूद केलं होतं. पालकमंत्र्यांनी पुराव्यांसोबत कोणतीही छेडछाड केली नसल्याचं अहवालात स्पष्ट केलं होतं. हाच पोलीस अधिक्षकांचा अहवाल 'एबीपी माझा'च्या हाती लागला आहे. या अहवालातून हा धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे.
राज्यपालांच्या आदेशानंतर पोलीस अधिक्षकांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे हे प्रकरण तपासासाठी वर्ग केलं होतं. वंचितनं बहुजन आघाडीनं बच्चू कडूंवर रस्त्यांच्या कामात गैरव्यवहार झाल्याचे आरोप केले होते. त्या आरोपांमध्ये तथ्य नसल्याचं या अहवालात नमूद केलं होतं. त्यामुळे आता हा अहवाल देणाऱ्या अकोला पोलिसांनीच बच्चू कडूंवर गुन्हे दाखल करताना तत्परता का दाखवली?, असा सवाल उपस्थित होत आहे. अकोला न्यायालयाच्या आदेशावरून पालकमंत्री बच्चू कडूंवर काल (बुधवारी) सिटी कोतवाली पोलिसांत विविध पाच कलमांतर्गत गुन्हे दाखल झाले आहेत.
अहवालातील महत्वाचे मुद्दे :
- पालकमंत्री बच्चू कडू यांनी रस्ते कामांत अर्थिक अपहार केल्याच्या अरोपावर गुन्हे दाखल करण्याइतपत पुरावे नाहीत.
- पालकमंत्र्यांनी खोटे दस्तावेज खरे भासवून जिल्हा परिषदेची कोणतीही दिशाभूल केल्याचे कोणतेही पुरावे नाहीत.
- वंचितच्या तक्ररीत लेखाशिर्ष 3054 आणि 5054 अंतर्गत नमूद केलेल्या कामाच्या मुद्द्यावरचं काम शासन निर्णयानुसार नियमातच झाल्याचं अहवालात म्हटलं आहे. याच दोन लेखाशिर्षाच्या मुद्द्यावर झाले होते पालकमंत्र्यांवर गैरव्यवहाराचे आरोप.
बच्चू कडूंवर दाखल झालेले गुन्हे :
सर्वच गुन्हे अजामीनपात्र, बहुतेक गुन्ह्यांमध्ये 7 वर्ष शिक्षा
1. 405 - सरकारी पैशांची अपव्याची व्याख्या, 3 वर्ष शिक्षा
2. 409 - सरकारी पैशांचा अपव्यय, 10 वर्ष, जन्मठेप
3. 420, - फसवणूक, 7 वर्ष शिक्षा
4. 468 - पुराव्याशी छेडछाड करणं
5. 471 - खोटं कागदपत्र खरे दाखवणे, 3 वर्ष शिक्षा.
काय आहे प्रकरण?
वंचित बहुजन आघाडीनं अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांच्यावर आर्थिक अपहाराचे गंभीर आरोप केले होते. पालकमंत्री बच्चू कडूंनी अस्तित्वात नसलेल्या रस्त्यांवर निधी वळता करीत 1 कोटी 95 लाखांचा अपहार केल्याचा आरोप वंचितनं केला होता. याची ठिणगी तीन रस्त्यांच्या कथित कामांवरून पडली. जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील शिफारस केलेली रस्त्यांची कामं पालकमंत्री कडूंनी डावलल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. पालकमंत्र्यांनी जिल्हा परिषदेला डावलत आपल्या मर्जीतील रस्त्यांची कामं नियमबाह्यपणे करवून घेतल्याचा आरोप वंचितनं केला. यातील दोन रस्ते अस्तित्वातच नसल्याचे पुरावे त्यांनी सादर केले होते. या तीन रस्त्यांच्या कामांत बच्चू कडूंनी १ कोटी ९५ लाखांचा अपहार केल्याचा आरोप वंचितनं केला होता. यात जिल्हा परिषदेच्या अधिकारावर पालकमंत्र्यांनी अतिक्रमण केल्याचं वंचितनं म्हटलं होतं. यात रस्त्यांचे 'ग्रामा (ग्रामीण मार्ग) क्रमांक' नसतांना कामांना प्रशासकीय मान्यता कशी मिळू शकते, असा सवाल वंचितनं केला होता. दरम्यान, वंचितच्या तक्रारीनंतर अकोल्याच्या जिल्हाधिकारी निमा अरोरांनी या तीन रस्त्यांसह 25 कामांना दिली स्थगिती दिली होती.