Ahmednagar Voilence : शेवगावमधील व्यापाऱ्यांचा दगडफेकीविरोधात बेमुदत बंद; मुख्य आरोपीचा शोध लागेपर्यंत बंदचा निर्णय
Shevgaon: अहमदनगरच्या शेवगावमध्ये झालेल्या दगडफेकीनंतर ग्रामस्थ आणि दुकानदार आक्रमक झाले आहेत. मुख्य आरोपीला अटक होत नाही तोपर्यंत शेवगाव बंदचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे.
Ahmednagar Voilence: अहमदनगर जिल्ह्यातील शेवगावमध्ये (Shevgaon) छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीच्या दिवशी झालेल्या राड्यानंतर व्यापारी संघटनांनी बेमुदत बंद पुकारला आहे. पोलिसांसोबत झालेली बैठक निष्फळ ठरली असून व्यापारी आणि ग्रामस्थ बेमुदत बंदवर ठाम आहेत. जोपर्यंत गुन्हेगारांवर कठोर कारवाई करून त्यांना अटक होत नाही, तोपर्यंत दुकानं बंद ठेवण्याचा निर्णय व्यापाऱ्यांनी घेतला आहे.
पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील (Radhakrushna Vikhe-Patil) यांनी ग्रामस्थांना आरोपींवर कारवाई करू, असे आश्वासन दिले. मात्र त्यानंतरही व्यापारी आपल्या मागणीवर ठाम आहेत आणि त्यामुळे शेवगाव शहरात शांतता पसरली आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीच्या दिवशी 14 मे रोजी शेवगाव येथे दोन गटात तुफान दगडफेक झाली. त्यानंतर अनेक दुकानांची तोडफोड करण्यात आली, वाहनांचेही मोठे नुकसान करण्यात आले. या घटनेत अनेकजण जखमी झाले, प्रकरणानंतर शेवगाव येथे तणावपूर्ण वातावरण असून शहरात राज्य राखीव दलासह मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
शेवगाव ग्रामस्थ बेमुदत बंदवर ठाम
मंगळवारी (16 मे) व्यापारी आणि ग्रामस्थांनी संताजी महाराज मंदिरात निषेध सभा घेत दंगेखोरांना अटक करण्याची मागणी केली आहे. निषेध सभेनंतर जमाव पोलीस स्टेशनवर मोर्चा घेऊन जाणार होता, मात्र पोलिसांनी आंदोलकांची भेट घेऊन त्यांचे निवेदन स्विकारले. पोलिसांशी झालेल्या चर्चेनंतरही ग्रामस्थ बेमुदत बंदवर ठाम असून शेवगाव येथील सर्व व्यवहार बंद ठेवण्याचा निर्धार ग्रामस्थांनी केला आहे.
मुस्लिम बांधवांकडूनही कारवाईची मागणी
दुसरीकडे, मुस्लिम समाजातील नागरिकांनीही निषेध करत या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून समाजकंटकांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. छत्रपती संभाजी महाराजांची मिरवणूक सुरू असताना जातीवाचक शिवीगाळ करत मश्जिदवर दगडफेक झाल्याचा आरोप, मुस्लिम बांधवांनी केला आहे.
पालकमंत्र्यांकडून बंद मागे घेण्याचे आवाहन
दरम्यान, या घटनेनंतर पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी शेवगावमध्ये जाऊन ग्रामस्थांची आणि व्यापाऱ्यांची भेट घेतली. यावेळी पाटील यांनी व्यापाऱ्यांना बेमुदत बंद मागे घेण्याचे आवाहन देखील केले. मात्र जोपर्यंत गुन्हेगारांना अटक होत नाही, तोपर्यंत दुकानं उघडणार नाही, अशी भूमिका व्यापाऱ्यांनी घेतली आहे.
पालकमंत्र्यांना संपूर्ण नुकसान दाखवले नसल्याची खंत
महसूलमंत्री आणि अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सोमवारी (15 मे) घटनास्थळी भेट दिली, मात्र त्यांच्या कार्यकर्त्यांनी मश्जिद आणि क्रांती चौकात झालेले नुकसान पालकमंत्र्यांना दाखवले नाही, अशी खंत नागरिकांनी व्यक्त केली आहे. तर, दोषींवर कारवाई करण्याच्या मागणीवर ग्रामस्थ ठाम आहेत.
शेवगावमध्ये शांतता राखण्याचे आवाहन
शेवगाव येथे सध्या तणावपूर्ण शांतता असून शहरातील प्रमुख ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलीस या घटनेतील दोषींवर कडक कारवाई करणार असून शहरातील सामाजिक शांतता कायम राखावी, असे आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.
घटनेनंतर पोलिसांनी दोन्ही गटातील दिडशेहून अधिक जणांवर गुन्हा दाखल केला असून 31 जणांना ताब्यात घेतले आहे.
शेवगावमधील राड्याचा घटनाक्रम थोडक्यात
- छत्रपती संभाजी महाराजांची जयंती मिरवणुक सुरू असताना दगडफेक झाल्याची अफवा पसरली
- त्यानंतर दोन गटात तुफान दगडफेक सुरू झाल्याची माहिती
- दोन्ही गटाकडून एकमेकांवर आरोप
- हिंसाचाराला जुन्या वादाची किनार
- शेवगाव येथील मुख्य चौकात एक महिन्यांपूर्वी ध्वज लावण्यावरून झाले होते दोन गटात वाद
- पहिल्या गटाकडून प्रार्थना स्थळातून दगडफेक झाल्याचा आरोप
- दुसऱ्या गटाकडून प्रार्थनास्थळावर दगडफेक केल्याचा आरोप
- राज्य राखीव दल आणि पोलिसांकडून दंगेखोरांची धरपकड
- 153 जणांवर गुन्हा दाखल, तर 31 जणांना अटक
हेही वाचा: