Shirdi : साईबाबांचे DNA पुरावे द्या, अरुण गायकडवाडांचे वादग्रस्त वक्तव्य अन् माफीनामा; साईबाबांनी दिलेल्या चांदीच्या 9 नाण्यांचा वाद नेमका काय?
Shirdi Saibaba Coin Dispute : साईभक्त असेलल्या लक्ष्मीबाई शिंदे यांना साईबाबांनी शेवटच्या काळात चांदीची नऊ नाणी दिली होती. त्यावरुन शिंदेंच्या वारसांमध्ये वाद सुरू आहे.

अहिल्यानगर : साईबाबांच्या 9 नाण्यांचा वाद पेटला असून साईभक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्टचे अध्यक्ष अरुण गायकवाड यांच्या वादग्रस्त वक्त्याव्यामुळे शिर्डी ग्रामस्थ आक्रमक झाल्याचं दिसून आलं. आपल्याकडे असलेली नाणीच खरे असणारा दावा करणाऱ्यांनी साईबाबांचा डीएनए आम्हाला दाखवावा असं वादग्रस्त वक्तव्य अरुण गायकवाड यांनी केलं होतं. त्यावरून आात ग्रामस्थांनी त्यांचा निषेध करत आंदोलन केलं.
साईबाबांनी दिलेली नाणी ही आपल्याकडेच असल्याचा दावा करत अरुण गायकवाड यांनी एक पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी बोलताना त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं. शिंदेंकडे असलेली नाणी ही खरी असल्याचे त्यांनी पुरावे द्यावेत, साईबाबांचा डीएनए आम्हाला दाखवावा असं ते म्हणाले. गायकवाड यांच्या या वक्तव्यानंतर वाद झाला.
वादग्रस्त वक्तव्य व्हायरल
डीएनए चाचणी कशी करावी हे पुरातत्व खात्यानं ठरवावं. साईबाबांच्या हातातलीच ही नाणी आहेत हे भारत सरकार आणि पुरातत्व खात्याने ठरवावं. अरुण गायकवाड यांनी केलेले हे वक्तव्य व्हायरल झाले आणि शिर्डीमध्ये त्यांच्याविरोधात ग्रामस्थ आक्रमक झाले. साई संस्थानने गायकवाड यांच्याकडील 9 नाणी ताब्यात घ्यावीत आणि प्रशासनाने त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली.
यावेळी एका महिलेने अरुण गायकवाड यांच्याबद्दल आलेला अनुभव सांगितला. हैदराबादची कोणती पार्टी असेल तर सांगा, ती नाणी आम्ही 25 हजारांना देऊ. तुम्हाला तुमचे कमिशनही देऊ असं अरुण गायकवाडांनी सांगितल्याचा दावा यावेळी एका महिलेने केला.
अनावधानाने ते वक्तव्य
शिर्डी ग्रामस्थ आक्रमक झाल्यानंतर अरुण गायकवाड यांनी दिलगिरी व्यक्त केली. साईबाबांसंबंधी ते वक्तव्य अनावधानाने झाल्याचं त्यांनी सांगितलं. त्या नाण्याचे डीएनएचे पुरावे द्या असं म्हणायचं होतं, पण बोलण्याच्या ओघात साईबाबांचे नाव आल्याचं त्यांनी सांगितलं.
लक्ष्मीबाई शिंदेंच्या वारसांमध्ये वाद
शिर्डी साईबाबांनी त्यांच्या अखेरच्या क्षणी त्यांच्या सेवेतील निस्सीम भक्त लक्ष्मीबाई शिंदे यांना चांदीचे 9 नाणे भेट दिले होते. साईचरित्रात देखील याचा उल्लेख आहे. मात्र आता त्यावरून लक्ष्मीबाई शिंदे यांच्या वंशजांमध्ये दावे - प्रतिदावे सुरू आहेत.
त्यात झालेल्या तक्रारीनंतर अहिल्यानगर सहाय्यक धर्मादाय आयुक्तांनी सुनावणी वेळी प्रतिवादी हजर राहिले नाहीत. त्यामुळे साईभक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्टचे अध्यक्ष अरुण गायकवाड यांचा दावा योग्य ठरवत सदरचे 9 नाणे हे ट्रस्टकडे असल्याचे चौकशी अहवालात नमुद केलं. त्यामुळे आपल्याकडील नाणे हेच खरे असल्याचा दावा पुन्हा एकदा अरुण गायकवाड यांनी केला. तर धर्मादाय आयुक्तांच्या निर्णयाविरोधात कायदेशीर मार्गाने अपील दाखल करणार असल्याचे तक्रारदार संजय शिंदे आणि चंद्रकांत शिंदे यांनी सांगितलं.
नेमकं प्रकरण काय?
सन 1918 साली विजयादशमीच्या दिवशी साईबाबांचे महानिर्वाण झाले. अखेरच्या समयी साईबाबांना नित्यनियमाने भोजन आणि सेवा देणाऱ्या तत्कालीन साईभक्त लक्ष्मीबाई शिंदे यांना साईबाबांनी चांदीची 9 नाणी भेट दिली होती. लक्ष्मीबाई शिंदे यांचे वंशज चंद्रकांत शिंदे आणि त्यांचे नातेवाईकांनी सदरची चांदीची नाणी त्यांच्याकडे असल्याचा दावा करत आहेत. तर लक्ष्मीबाई शिंदे यांची नात शैलेजा गायकवाड आणि त्यांचे कुटुंबीय ती 9 नाणी त्यांच्याकडे असल्याचा दावा करत आहेत.
या 9 नाण्यांचे 22 नाणे झाल्याने मोठा वाद निर्माण झाला होता. त्यानंतर संजय शिंदे , चंद्रकांत शिंदे यांनी 2022 साली साईबाबा संस्थान आणि पोलिस प्रशासनाकडे तक्रार दाखल केली होती. अरुण गायकवाड हे लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट आणि 9 नाणे भाविकांना दाखवून मोठ्या देणग्या जमा करत असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला होता.
धर्मादाय आयुक्तांच्या चौकशी अहवालात देणगीचा तपशील आणि विनीयोग तसेच 9 नाणी ही अरुण गायकवाड अध्यक्ष असलेल्या ट्रस्टकडे असल्याचं निरीक्षण नोंदवल्याचं अरुण गायकवाड यांनी म्हटलं.
लक्ष्मीबाई शिंदेंचे आम्ही वंशज आहोत. त्यामुळे वारसाहक्काने ती चांदीची नाणी आमच्याकडे असून ती लक्ष्मीबाईंच्या नात शैलेजा गायकवाड यांचेकडे कसे येतील? आजही साईबाबांनी लक्ष्मीबाई शिंदेंना दिलेली नाणी ही जुन्या घरी असलेल्या मंदिरातच आहेत आणि तीच खरी आहेत. धर्मादाय आयुक्तांनी सुनावणी घेताना आम्हाला तारखेला हजर राहाण्याची सूचना किंवा समन्स दिलेले नाहीत. त्यांनी दिलेल्या चौकशी अहवालाविरोधात दाद मागणार असल्याचं यावेळी तक्रारदार संजय शिंदे आणि चंद्रकांत शिंदे यांनी म्हटलं. सर्व नाण्यांची पुरातत्व विभागाकडून सत्यता तपासून दूध का दूध आणि पाणी का पाणी व्हावं अशी मागणी तक्रारदारांनी केली आहे.
साईबाबांनी दिलेली चांदीची नऊ नाणी ही एक ऐतिहासिक, भक्तिपर आणि भावनिक ठेवा आहेत. मात्र, सध्या या नाण्यांवरून शिर्डीत मोठा वाद सुरू आहे. साईभक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्टचे अध्यक्ष अरुण गायकवाड आणि त्यांच्या मातोश्री शैलजा गायकवाड यांनी सहाय्यक धर्मादाय आयुक्तांचा चौकशी अहवाल पत्रकार परिषदेत मांडला. त्यानंतर हा वाद पुन्हा चव्हाट्यावर आला. देश विदेशातील कोट्यवधी भाविकांच्या श्रद्धेचे प्रतिक असलेल्या 9 नाण्यांची सत्यता खरं तर जगासमोर येण गरजेच आहे.
ही बातमी वाचा:
























