Balasaheb Thorat on Sujay Vikhe : 'ते मोठ्याचं लाडकं लेकरू, त्याचा छंद पालकाने पुरवायला पाहिजे'; बाळासाहेब थोरातांनी सुजय विखेंची उडवली खिल्ली
Balasaheb Thorat vs Sujay Vikhe Patil : सुजय विखे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीसाठी शड्डू ठोकला आहे. यावरून बाळासाहेब थोरात यांनी सुजय विखेंची खिल्ली उडवली आहे.
संगमनेर : अहमदनगर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत (Ahmednagar Lok Sabha Constituency Election 2024) निलेश लंके (Nilesh Lanke) यांच्या यांच्या समोर पराभव झाल्यानंतर भाजप नेते सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांनी विधानसभा निवडणुकीसाठी (Vidhan Sabha Election) शड्डू ठोकला आहे. संगमनेर (Sangamner) किंवा राहुरी (Rahuri) विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा सुजय विखेंनी व्यक्त केली आहे. यावरून आता काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी सुजय विखे पाटील यांची खिल्ली उडवली आहे.
बाळासाहेब थोरात हे संगमनेर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. सुजय विखे यांनी जर संगमनेरमधून निवडणूक लढवली तर बाळासाहेब थोरात विरुद्ध सुजय विखे लढत होऊ शकते. तर प्राजक्त तनपुरे हे राहुरी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. सुजय विखेंनी जर राहुरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली तर प्राजक्त तनपुरे विरुद्ध सुजय विखे सामना रंगण्याची शक्यता आहे.
ते मोठ्याचं लाडकं लेकरू
याच पार्श्वभूमीवर बाळासाहेब थोरात यांनी सुजय विखेंची खिल्ली उडवली आहे. ते मोठ्याचं लाडकं लेकरू आहे. त्याचा छंदच असेल तर तो पुरवला पाहिजे या मताचा मी आहे. पक्षाने नाही तर तो पालकाने पुरवला पाहिजे. ते दोन ठिकाणी म्हटले आहेत. त्यांचा छंद पुरवण्यासाठी ते दोन्ही ठिकाणी उभे राहू शकतात. यामुळे बालकाचा छंद तर पुरा होईल, असे म्हणत त्यांनी सुजय विखे पाटलांची खिल्ली उडवली आहे. आता यावरून सुजय विखे पाटील काय पलटवार करणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
काय म्हणाले होते सुजय विखे पाटील?
शिर्डी विधानसभा ही राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखालीच लढली जाईल, अशी माझी अपेक्षा आहे. कारण पक्षाचा निर्णय होणे अद्याप बाकी आहे. तिकीट कोणाला मिळणार हा प्रक्रियेचा भाग आहे. पक्ष निर्णय घेईल, पक्ष त्यांना संधी देईल. आमच्या दृष्टिकोनातून आमच्या परिवारात साहेबच सर्वप्रथम असणार आहेत. राहिला मुद्दा माझा, आता मला बऱ्यापैकी वेळ आहे, त्यामुळे आजूबाजूंच्या मतदार संघाचा आढावा घेऊ, असे सुजय विखे पाटील यांनी म्हटले होते.
इतर महत्वाच्या बातम्या