अहमदनगरमध्ये निळवंडे कालवा फोडण्याचा प्रयत्न, आश्वासनानंतर ठिय्या आंदोलन
सिमेंट काँक्रीटचे काम प्रलंबित असताना हे पाणी सोडल्याने कालव्याला गळती होऊन अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी गेलय. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीने आज आंदोलन करण्यात आलं.
अहमदनगर: अकोले तालुक्यातील निळवंडे कालवा (Nilwande Dam) फोडण्याचा प्रयत्न आंदोलकांनी केला आहे. अकोले तालुक्यातील निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्यातून दुषकाळग्रस्त भागासाठी सध्या आवर्तन सुरू आहे. डाव्या कालव्याला अनेक ठिकाणी गळती असून यामुळे अकोले तालुक्यातील शेतकऱ्यांच शेतात पाणी जाऊन मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हे आवर्तन तातडीने बंद करावे आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई द्यावी अशी मागणी करत आज आंदोलन करण्यात आलं. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य सुनिता भांगरे यांच्या नेतृत्वाखाली कालवा फोडण्याचा सुद्धा प्रयत्न करण्यात आला.
52 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर निळवंडे धरणाच्या कालव्यांची काम पूर्ण झाली. कालव्यांची कामे पूर्ण होताच अहमदनगर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागाला पंतप्रधान मोदींच्या हस्ते लोकार्पण करत डाव्या कालव्याला पाणी सोडण्यात आलं. मात्र अकोले तालुक्यातील कालव्यांची कामं निकृष्ट दर्जाची झाली असल्याचा आरोप करत अस्तरीकरण व सिमेंट काँक्रीटचे काम प्रलंबित असताना हे पाणी सोडल्याने कालव्याला गळती होऊन अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी गेलय. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीने आज आंदोलन करण्यात आलं.
कालव्यांची काम पूर्ण करावी त्यानंतरच पाणी सोडावं, आंदोलकांची मागणी
अकोले तालुक्यातील खानापूर शिवारात कालव्याजवळ कालवा फोडण्याचा प्रयत्न देखील आंदोलकांनी केला. मात्र पोलिसांनी आंदोलकांना रोखल्याने आंदोलकांनी कालव्या शेजारीच आंदोलकांना ठिय्या आंदोलन केलं. यावेळी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी आंदोलन स्थळी भेट देत आंदोलकांची चर्चा केली. सध्या सुरू असलेल्या आवर्तनामुळे पाण्याची मोठ्या प्रमाणात गळती झाली असून शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्यांना नुकसान भरपाई मिळावी. कालव्यांची काम पूर्ण करावी त्यानंतरच पाणी सोडावं अशी मागणी आंदोलकांनी केली आहे.
मोठे आंदोलन करण्याचा आंदोलकांचा इशारा
दरम्यान यावेळी आंदोलकांनी राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार अजित पवार गटाचे डॉक्टर किरण लहामटे यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. तर सरकारच्या विरोधात घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनानंतर हे आंदोलन तात्पुरता स्थगित करण्यात आले असेल तरी पुढील काळात भरपाई मिळाली नाही आणि कामे झाली नाही तर यापेक्षा मोठे आंदोलन करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे.
हे ही वाचा :