Ahmednagar : राम शिंदेंची रोहित पवारांवर टीका; म्हणाले, बारामतीकरांनी भानामती केली, पण कर्जतच्या लोकांनी जागा दाखवली
Ram Shinde On Rohit Pawar : राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांना ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत धक्का बसला आहे. त्यानंतर भापजचे आमदार राम शिंदे यांनी पवारांवर टीका केली.
अहमदनगर: कर्जत-जामखेड मतदारसंघात ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांना (Rohit Pawar) धक्का देत भाजप आमदार राम शिंदे (Ram Shinde) यांनी वर्चस्व कायम ठेवलं आहे. अहमदनगरच्या कर्जत-जामखेडमधील 9 ग्रामपंचायतींपैकी भाजपकडे 5, शरद पवार गटाकडे 2, अजित पवार गटाकडे एक आणि स्थानिक आघाडीकडे एक ग्रामपंचायत आली आहे. त्यामुळे आमदार रोहित पवार यांना धक्का बसला आहे तर भाजप आमदार राम शिंदे यांचं वर्चस्व कायम राहिल्याचं चित्र आहे.
भाजपला मिळालेल्या विजयानंतर आमदार राम शिंदे यांनी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, महाराष्ट्राच्या जनतेने ग्रामपंचायत निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश दिलं आहे. कर्जत जामखेड मतदारसंघात गेल्या पाच वर्षात टप्प्याटप्प्याने सर्वाधिक ग्रामपंचायत भाजपकडे आल्या आहेत. मी गेल्या दहा वर्षात जो विकासाचा रथ या मतदारसंघात आणला त्यामुळे नागरिकांनी घवघवीत यश दिलं. बारामतीकर आले, बारामती करू म्हणाले आणि निवडणुकीच्या कालखंडात भानामती केली, भानामती करून मतदान घेतलं. मात्र गेल्या पाच वर्षाच्या कालखंडात लोकांच्या लक्षात आलं आणि त्यांनी जागा दाखवली.
पुण्यात अजित पवार गटाचा करिश्मा
पुणे जिल्ह्यातील 231 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा निकाल जाहीर (gram panchayat election) झाला आहे. पुणे जिल्ह्यात अजित पवार गटानं यंदा बाजी मारली आहे. अजित पवार गटाने 109 जागेवर विजय मिळवून वर्चस्व प्रस्थापित केलं आहे. तर त्यानंतर 34 जागांवर भाजपने विजय मिळवला आहे. कॉंग्रेसने 25, शिंदे गट 10, ठाकरे गट 13, शरद पवार गट 27, इतर 11 अशा एकूण 229 जागांवर विजय मिळवला आहे. 231 पैकी दोन जागा रिक्त आहे. एक मुळशीमध्ये तर एक भोरमधील जागेचा समावेश आहे.
काटेवाडीत अजित पवारांचं वर्चस्व, पण भाजपचा पहिल्यांदाच शिरकाव
बारामती तालुक्यातील अजित पवारांच्या काटेवाडी ग्रामपंचायतीत अजित पवार गटाला घवघवीत यश प्राप्त झालं आहे. काटेवाडीत 16 पैकी 14 जागांवर अजित पवार गटाने बाजी मारली आहे. तर भाजपनं (BJP) पहिल्यांदाच काटेवाडीत शिरकाव केला आहे. भाजपने काटेवाडीत 2 जागा जिंकल्या आहे.
दिलीप वळसे पाटील यांना मोठा धक्का (Dilip Walse Patil)
पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल पाहता सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांना त्यांच्या मतदारसंघात अनेक ठिकाणी धक्के बसलेत. त्यांच्या स्वतःच्या गावात दिलीप वळसे पाटील यांनी स्वतः प्रचार करूनही त्यांचा संतोष टावरे हा सरपंच पदाचा उमेदवार पराभूत झाला आहे. तर रवींद्र वळसे पाटील हा शिंदे गटाचा उमेदवार सरपंच म्हणून निवडून आला आहे. तसेच दिलीप वळसे पाटील यांच्या राजकारणाचे केंद्रस्थान असलेला भीमाशंकर सहकारी साखर कारखाना ज्या पारगाव गावामध्ये आहेय त्या पारगावमधे दिलीप वळसे यांच्या बाजूच्या सरपंच पदाच्या उमेदवार अर्चना ढोबळे पराभूत झाल्यात तर शरद पवार गटाच्या श्वेता ढोबळे या सरपंच झाल्या आहेत.
ही बातमी वाचा: