अहमदनगरच्या 'क्रांती'ची कमाल! 100 दिवसातच लिओग्राफीत लिहिली ज्ञानेश्वरी... कसा केला विक्रम, काय आहे लिओग्राफी...
100 दिवसात जिथे सरळ अक्षरात ज्ञानेश्वरी लिहिणं अवघड आहे, तीच ज्ञानेश्वरी अहमदनगरच्या क्रांती नाईक यांनी उलट्या अक्षरात लिहून पूर्ण केली आहे.
Ahmednagar Kranti Naik News: अहमदनगरच्या क्रांती नाईक यांनी लिओग्राफी (Leo graphy) अक्षरात ज्ञानेश्वरी लिहून एक विक्रम केला आहे. जिनियस वर्ल्ड रेकॉर्ड फॉर इंडिया बुकमध्ये त्यांच्या विक्रमाची नोंद झाली आहे. लिओग्राफी म्हणजे उलट्या अक्षरात मिरर इमेजमध्ये संपूर्ण ज्ञानेश्वरी लिहून त्यांनी हा विक्रम केला आहे.
100 दिवसात जिथे सरळ अक्षरात ज्ञानेश्वरी लिहिणं अवघड आहे, तीच ज्ञानेश्वरी अहमदनगरच्या क्रांती नाईक यांनी उलट्या अक्षरात लिहून पूर्ण केली आहे. आतापर्यंत कुणीही संपूर्ण ज्ञानेश्वरी उलट्या अक्षरात लिहिण्याचा विक्रम केलेला नाही. त्यामुळे त्यांची जिनियस वर्ल्ड रेकॉर्ड फॉर इंडिया बुक मध्ये नोंद करण्यात आली आहे.
लिओग्राफीचा इतिहास हा 1400 वर्षांपूर्वीचा आहे, एखादा गुप्त संदेश दुसऱ्याला द्यायचा असेल किंवा आपली एखादी गुप्त माहिती संकलित करून ठेवायची असेल तर या लिओग्राफीचा वापर केला जायचा मात्र, पुढे या लिओग्राफीवर जास्त काम झालं नाही
मात्र, अशा पद्धतीने ज्ञानेश्वरी लिहिणं तसं कठीण होतं. त्यातल्या त्यात शंभर दिवसात हे करणं जरा जास्तच कठीण होत मात्र त्यात क्रांती नाईक यांना त्यांच्या कुटुंबाने मोठी साथ दिली. आज जेंव्हा क्रांती नाईक यांनी हा विक्रम केला, त्यावेळी त्यांचा आपल्याला अभिमान वाटत असल्याचे त्यांची कन्या आकांशा सांगते.
क्रांती नाईक यांनी जेव्हा लिखाणाला सुरुवात केली तेंव्हा असा काही विक्रम होईल याची त्यांना कल्पना देखील नव्हती. मात्र प्रसिद्ध चित्र - शिल्पकार प्रमोद कांबळे यांना जेव्हा याबद्दल माहिती मिळाली तेव्हा त्यांनी हा एक जागतिक विक्रम होऊ शकतो याबद्दल त्यांना सांगितले. तेव्हा त्यांनी 100 दिवसातच लिओग्राफीत ज्ञानेश्वरी लिहून पूर्ण करण्याचा त्यांनी चंग बांधला. क्रांती नाईक या आर्मी स्कूलमध्ये अध्यापिका होत्या.
आपला हा अनोखा छंद जोपासताना अगोदर त्या उलट्या अक्षरात हाताला लागेल ते साहित्य लिहित होत्या. पण मग याचे मोठे काहीतरी करावे या उद्देशाने त्यांनी पुढाकार घेतला आणि सप्टेंबर महिन्याच्या 22 तारखेपासून त्यांनी भावार्थ दीपिका अर्थात ज्ञानेश्वरी हा ग्रंथ उलट्या अक्षरात लिहिण्यासाठी घेतला आणि तो अवघ्या 100 दिवसात संपूर्ण लिहून पूर्ण केला. श्न्यायडर इलेक्ट्रिक ऑफिसर्स रिक्रिएशन क्लबमध्ये नुकतेच त्यांनी हा विक्रम पूर्ण केल्याबद्दल प्रमाणपत्र देण्यात आले. भविष्यात देखील लिओग्राफीत आणखी बरंच काम करण्याचा त्यांचा मानस आहे.
ही बातमी देखील वाचा