Ahmednagar : अहमदनगरच्या नामांतराची घोषणा झाली, आता लोकसभेपूर्वी निर्णय होण्याची आशा: राम शिंदे
Lok Sabha Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याआधी अहमदनगर जिल्ह्याच्या नामांतरणाची घोषणा केली होती. आता त्याचा निर्णय होईल अशी आशा भाजपचे आमदार राम शिंदे यांनी व्यक्त केली आहे.
Ahmednagar : अहमदनगर जिल्ह्याचे नामांतर होऊन त्याचे नवीन नाव पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर (Ahilyabai Holkar) यांच्या नावावरून ठेवण्याची घोषणा चौंडी येथील कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केली होती. आता लोकसभा निवडणुकीपूर्वी (Lok Sabha Election) जिल्ह्याचे नामांतर होईल अशी आशा आहे असं भाजप आमदार राम शिंदे (BJP Ram Shinde) यांनी यांनी म्हटलं आहे. याबाबत पंधरा दिवसांपूर्वीच याबाबत राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे लक्ष याकडे वेधले असल्याचे त्यांनी सांगितलं. ते अहमदनगर येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.
महसूल प्रशासन इमारत भूमीपूजन म्हणजे जिल्हा विभाजनाकडे टाकलेले पाऊल
राज्यात अनेक जिल्ह्याच्या विभाजनाची मागणी होत आहे. पण अहमदनगर जिल्हा हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठा जिल्हा असल्याने या जिल्ह्याचे विभाजन होणे गरजेचे आहे. राज्याच्या मागील बजेटमध्ये अहमदनगर जिल्ह्यासाठी अतिरिक्त जिल्हाधिकारी पदनिर्मिती करून त्याचे मुख्यालय शिर्डी करण्यात आले आहे. त्यातच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अहमदनगर दौऱ्यावर येत असताना ते नवीन महसूल प्रशासन इमारतीचे भूमिपूजन करणार आहेत. त्यासाठी 61 कोटींचा निधी मंजूर झाला आहे. हे जिल्हा विभाजनाकडे टाकलेले पाऊल आहे असं भाजप आमदार राम शिंदे यांनी म्हटलंय.
राम शिंदेंवर मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या मतदारसंघाची जबाबदारी
मध्यप्रदेश विधानसभा निवडणूक अंतिम टप्प्यात आली असून महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांवर या राज्यातील विविध मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्या अनुषंगाने नगर जिल्ह्यातील आमदार राम शिंदे यांच्यावरही मध्यप्रदेश मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या सिहोर जिल्ह्यातील बुधानी मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली आहे. आ. राम शिंदे यांच्यावर नेहमीच विवध राज्यातील जबाबदारी देण्यात येत असते. यापूर्वीही त्यांच्यावर गोवा, कर्नाटक राज्यातील निवडणुकांची जबाबदारीही देण्यात आली होती. आता मध्यप्रदेशची जबाबदारी त्यांच्यावर देण्यात आली आहे.
शेळी-मेंढी संशोधन महामंडळाच्या कार्यालयाची जागा बदलणार
शेळी- मेंढी महामंडळाचे कार्यालय हे पारनेर तालुक्यातील ढवळपुरी येथे करण्याचा निर्णय झाला होता. मात्र हे महामंडळ राज्याचे असल्याने ढवळपुरी सारख्या छोट्याशा गावात त्याचे कार्यालय होणे सोयीचे नाही. ते काही जिल्ह्याचे किंवा तालुक्याचे कार्यालय नाही. त्यामुळे हे कार्यालय राज्यातील नागरिकांसाठी सोयीच्या ठिकाणी असावे असे मत आमदार राम शिंदे यांनी व्यक्त केले. त्या दृष्टीने संबंधित विभागाने या कार्यालयाची जागा बदलाची प्रक्रिया सुरू केली असल्याची माहिती राम शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.
ही बातमी वाचा: