(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ahmednagar : अहमदनगर जिल्ह्यात 85 ठिकाणी शाळा भरतात उघड्यावर, निधी असूनही प्रशासन ढिम्म
शिर्डीच्या साईबाबा संस्थानने 30 कोटींपैकी पहिल्या टप्प्यातील 10 कोटींचा निधी दिला आहे. पण प्रशासनाने मात्र कोणतीही कारवाई केली नाही.
अहमदनगर: जिल्ह्यात 85 शाळा या उघड्यावर भरत असल्याचं धक्कादायक चित्र अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यामध्ये दिसतंय. जिल्हा परिषदेच्या वेगवेगळ्या शाळांसाठी जवळपास 820 वर्ग खोल्यांची गरज आहे. सध्या या सर्व वर्गातील विद्यार्थी कुठे मंदिरात तर कुठे उघड्यावर धडे गिरवत आहेत. विशेष म्हणजे या वर्ग खोल्यांसाठी शिर्डी संस्थानने 30 कोटी रुपये देण्याचे मान्य केलं आहे. त्यापैकी 10 कोटी रुपये जिल्हा परिषदेला दिले देखील आहेत. मात्र संबंधित प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे अद्याप एकही वर्ग खोली बांधण्यात आलेली नाही. त्यामुळे पालकांमधून तीव्र संताप व्यक्त होतोय.
कुठे मंदिरात भरलेली शाळा, कुठे गावाच्या सभा मंडपात अभ्यासाचे धडे गिरवणारे विद्यार्थी, तर कुठे पहिली ते चौथीचे वर्ग एकाच ठिकाणी बसवून शिकवण्याची शिक्षकांची कसरत. हे सर्व होतंय अहमदनगर जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेत. जिल्ह्यातील विविध प्राथमिक शाळेसाठी मागील 4 ते 5 वर्षांपासून 820 वर्ग खोल्यांची आवश्यकता आहे. कुठे वर्ग खोल्या धोकादायक झाल्याने त्यांचे निर्लेखन करण्यात आले तर कुठे पटसंख्या जास्त असल्याने वर्ग खोल्याची कमतरता आहे. याबाबत जिल्हा परिषदेकडे मागणी होऊन त्यावर जिल्हा परिषदेचा तसेच शिर्डी संस्थानचा निधी देखील मिळाला. मात्र प्रशासनातील समन्वयाचा अभाव तसेच राजकीय इच्छाशक्तीची कमतरता यामुळे जिल्ह्यातील या चिमुकल्यांवर अशा पद्धतीने मिळेल तिथे बसून अभ्यास करण्याची वेळ आली आहे.
पाच वर्षापूर्वी शिर्डीच्या साईबाबा संस्थानने जिल्हा परिषदेला शाळा खोल्यांसाठी 30 कोटी रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार संस्थानने पहिल्या टप्प्यातील 10 कोटींचा निधी दिला देखील. मात्र या निधीतून वर्ग खोल्यांचे बांधकाम जिल्हा परिषद बांधकाम विभागाने करायाचे की राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने करायचे या वादात हा निधी सध्या जिल्हा परिषदेकडे तसाच पडून आहे.
या वर्ग खोल्यांच्या विषयावर विधानसभेत चर्चा झाली असून त्यावर ग्रामविकास मंत्री महाजन यांनी याबाबत स्वतंत्र बैठक घेणार असल्याचे स्पष्ट केलंय. मात्र निधी उपलब्ध असताना दोन विभागांच्या जबाबदारी झटकण्याच्या प्रयत्नात विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. याबाबत जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी आमच्याकडे निधी उपलब्ध झाला असून लवकरच वर्गखोल्यांचे काम हाती घेणार असल्याचं सांगितलं.
सध्या जिल्ह्यात सध्या 85 ठिकाणी उघड्यावर वर्ग भरत असून काही ठिकाणी समाज मंदिर अथवा अन्य ठिकाणी शाळा भरवण्याची वेळ आली आहे. यामध्ये अकोले 45 , संगमनेर 50 , श्रीरामपूर 35 , श्रीगोंदा 90, शेवगाव 60 , राहुरी 44 , राहाता 28 , पारनेर 34, पाथर्डी 80, नेवासा 110 , नगर 50 , जामखेड 89 , कोपरगाव 75 , कर्जत 30 इतक्या ठिकाणांचा समावेश आहे.
जर विद्यार्थ्यांना भौतिक सुविधाच मिळणार नसतील तर त्यांची शैक्षणिक प्रगती होणार कशी? आणि जिल्हा परिषद शाळांचा दर्जा सुधारणार तरी कसा असाच प्रश्न यामुळे पडतो.