(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra Politics: वडील एकटे पडताच लेक धावून गेला; गजाभाऊंच्या हकालपट्टीची मागणी करणाऱ्या शिशिर शिंदेंना अमोल कीर्तिकरांनी झापलं
Maharashtra Politics: शिशिर शिंदे यांच्या एका विधानावरुन महाविकास आघाडीचे उमेदवार आणि गजानन किर्तीकर यांचे पुत्र अमोल कीर्तिकर (Amol Kirtikar) यांनी खडेबोल सुनावले आहे.
Gajanan Kirtikar And Amol Kirtikar: मुंबई: गजानन कीर्तिकर (Gajanan Kirtikar) यांची पक्षातून त्वरीत हकालपट्टी करावी अशी मागणी शिवसेना उपनेते शिशिर शिंदे (Shishir Shinde) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना पत्र लिहून केली आहे. गजानन कीर्तिकर (Gajanan Kirtikar) यांची पक्ष विरोधी वक्तव्यं केल्याप्रकरणी त्वरीत शिवसेनेतून हकालपट्टी करून त्यांना निरोपाचा नारळ द्यावा असं शिशिर शिंदे यांनी म्हटलं आहे.
शिशिर शिंदे यांच्या या विधानावरुन उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार आणि गजानन कीर्तिकर यांचे पुत्र अमोल कीर्तिकर (Amol Kirtikar) यांनी खडेबोल सुनावले आहे. गजानन कीर्तिकर यांच्या हकालपट्टीची मागणी कोण करतोय?, शिशिर शिंदे कोण असे म्हणायची वेळ आली आहे. जो व्यक्ती शिवसेना पक्षात होते, मग मनसेमध्ये गेले, अशी टीका अमोल किर्तीकर यांनी केली.
अमोल कीर्तिकर काय म्हणाले?
राजकारणात कसे वागले पाहिजे, याबाबत बाबांचा सल्ला घेतला. आमचा उहापोह तिथेच असतो. गजानन कीर्तिकर यांनी जो निर्णय घेतला तो त्यांचा वैयक्तिक होता आता वेगळा निर्णय घेतला, तर तो त्यांचा वैयक्तिक असेल. माझे नाव हे अमोल गजानन कीर्तिकर हे नाव कायम असणार आहे. ते कोणी चोरू शकत नाही. 10 वर्ष माझ्या वडिलांनी केलेल्या कामाचा मला फायदा होईल, असं अमोल कीर्तिकर यांनी सांगितले. शिशिर शिंदे यांनी एवढा अभ्यास केला असता तर ते कधीच पडले नसते. मुलुंडकर देखील उद्धव ठाकरेंसोबत आहेत, असं अमोल कीर्तिकर यावेळी म्हणाले.
शिशिर शिंदेंनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात काय म्हटलंय?
लोकसभा निवडणुकीत राज्यातील पाचव्या टप्यातील मतदानाच्या दिवशी शिवसेना नेते आणि माजी खासदार गजानन कीर्तिकर यांनी आणि त्यांच्या पत्नी यांनी पक्ष विरोधी वक्तव्यं करून विरोधी पक्ष ठाकरे गटाचे बाजू घेतली. त्यामुळे मातोश्रीचे “लाचार श्री” होणाऱ्यांनी पक्षातून त्वरीत बाहेरचा रस्ता दाखवावा, अशी मागणी शिवसेना उपनेते शिशिर शिंदे यांनी शिवसेना पक्षाचे मुख्यनेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. गजानन कीर्तिकर यांचे चिरंजीव अमोल कीर्तिकर यांना ठाकरे गटाने उत्तर-पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली. त्यांनतर अमोल कीर्तिकर हे गजानन कीर्तिकर यांच्याच कार्यालयातून कारभार करत होते. तसेच गजानन कीर्तिकर शिवसेनेत असतानाही त्यांचा खासदार नीधी अमोल कीर्तिकर यांनी स्वत: च्या प्रचारासाठी विकासकामांसाठी वापरला. त्यामुळे त्याचा शिवसेना पक्षाला शून्य लाभ झाला. मात्र फायदा ठाकरे गटाला झाला. परवा मतदानाच्या दिवशी गजानन कीर्तिकर यांच्या पत्नीने मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख करत ठाकरे गटाची बाजू घेतली होती. गजानन कीर्तिकर यांना मातोश्रीवर लोटांगण घालण्याची घाई झालेली आहे. गजानन कीर्तिकर यांचे हे उद्योग पक्षाला बदनाम करत आहेत. त्यामुळे आता गजानन कीर्तिकर यांची पक्षातून त्वरीत हकालपट्टी करावी आणि त्यांना निरोपाचा नारळ द्यावा अशी मागणी शिवसेना उपनेते शिशिर शिंदे यांनी शिवसेना मुख्यनेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून केली आहे.
आणखी वाचा