एक्स्प्लोर
भरघोस कमाई देणारं भरिताचं वांग, वेटर शेतकऱ्याची यशोगाथा !
कोल्हापूर: तब्बल 19 वर्षे मुंबईतील हॉटेलमध्ये वेटरची नोकरी केल्यानंतर, कोल्हापूरचे जोतीराव माळी गावाकडं परतले. अर्थार्जनासाठी हॉटेल व्यवसाय सुरु केला. मात्र मातीची ओढ पुन्हा शेतीकडं घेऊन आली. शेतीचा अभ्यास केला आणि भरीताच्या वांग्यांची लागवड केली. ज्यातून त्यांना लाखोंचा नफा होणार आहे.
शेतीत जीव ओतून काम केलं. बाजाराचा अभ्यास करुन पिकं घेतली तर शेतीसारखा फायद्याचा व्यवसाय कोणताच नाही, असं ठामपणे सांगणाऱ्या दुसरी पास कोल्हापूरच्या जोतीराव माळींची ही यशोगाथा.
भरताच्या वांग्याचे ही रास आहे कोल्हापूर जिल्ह्यातील भादवणचे शेतकरी ज्योतीराम माळी यांची...गडद जांभळा रंग...उत्कृष्ट गुणवत्ता..शिवाय प्रत्येक वांग्याचं वजन 300 ग्रॅमच्यावर .
ज्योतीराम माळी यांची आजरा तालुक्यातील भादवणमध्ये 6 एकर जमीन आहे. मात्र काही वर्षापूर्वी आर्थिक परिस्थिती हालाखिची असल्यानं त्यांनी मुंबईला वेटरची नोकरी केली. त्यानंतर गावाकडं हॉटेलही सुरु केलं. आर्थिक परिस्थिती थोडी सुधारली..मात्र शेतीचं वेड काही मनातून जात नव्हतं. यातूनच 2003 साली ते पूर्णवेळ शेतीकडं वळले. अजून 3 एकर जमीन विकत घेतली.
बंगाली, पंजाबी आणि गुजराती समाजाकडून भरिताच्या वांग्यांना मोठी मागणी आहे. हे पाहता यंदा मार्च महिन्यात त्यांनी भरिताच्या वांग्याच्या जनक जातीच्या रोपांची लागवड केली.
जोतीराम यांनी लागवडीपूर्वी जमीन चांगली मशागत केली. आठ फुटांचं अंतर सोडून बेड तयार केले. त्यावर मल्चिंग पेपर अंथरला..आणि त्यावर वांग्यांच्या रोपांची लागवड केली. एकरी 2 हजार याप्रमाण त्यांना 9 एकरासाठी 18 हजार रोपं लागली. लागवडीनंतर रासायनिक खतांना फाटा देत सेंद्रीय खतांचा वापर सुरु केला. त्यामुळं त्यांना खतांसाठी केवळ 2300 रुपयांचा खर्च आला. सध्या या वांग्यांची काढणी सुरु आहे.
आठवड्यातून 3 वेळेस या वांग्यांची काढणी केली जाते. यासाठी ते मजुरांची मदत घेतात. तोडलेली वांगी शेडमध्ये आणली जातात. ती स्वच्छ करुन बॉक्समध्ये भरून वाशी मार्केटला पाठविली जातात.
*ज्योतीराम यांना 9 एकरातून आतापर्यंत 35 टन वांग्यांचं उत्पादन मिळालं आहे.
*ज्याला व्यापाऱ्यांनी 30 रुपये किलोचा दर दिला आहे.
*यातून 10 लाख रुपये त्यांना मिळालेत
*अजून दोन महिन्यात यातून 70 टन उत्पादनाची अपेक्षा ज्योतीराम यांना आहे.
*यातून त्यांना 20 लाख रुपये मिळतील
*रोपं, खतं, मजुरी आणि वाहतूक असा 6 ते 7 लाखांचा खर्च वजा
*त्यांना 22 ते 23 लाखांच्या निव्वळ नफ्याची अपेक्षा आहे.
मल्चिंग पेपर वापरल्यामुळं त्यांना कमी पाण्यात वांग्याचं उत्पादन घेता आलं. शिवाय मल्चिंग पेपरसाठी त्यांना एनएचएम अंतर्गत अनुदानही मिळालं.
बाजाराचा व्यवस्थित अभ्यास केला, शेतीत नियोजन करुन कष्ट पेरले तर शेतीतून कोणत्याही व्यवसायापेक्षा जास्त नफा होऊ शकतो यावर जोतीराम यांचा ठाम विश्वास. वांग्यातून मिळालेल्या भरघोस नफ्यामुळं त्यांचा हा विश्वास सार्थ ठरला आहे.
चंद्रशेखर खोले, एबीपी माझा, कोल्हापूर
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement