एक्स्प्लोर
Not Specified
मुंबई : जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष पदासाठी आज (21 मार्च) निवडणूक होत आहे. अनेक ठिकाणी भाजपला दूर ठेवण्यासाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात, अशी माहिती आहे.
केवळ सिंधुदुर्गात शिवसेना आणि भाजप युती होण्याची चिन्हं आहेत. तर उस्मानाबाद, कोल्हापूर, नाशिक, नांदेड, सांगली आणि बीड या जिल्ह्यात स्थानिक समीकरणं जुळत नसल्याने शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीत तीव्र मतभेद आहेत. त्यामुळे हे तीनही पक्ष या जिल्ह्यात एकत्र येण्याची शक्यता कमी आहे.
लाईव्ह अपडेट : (हे पेज रिफ्रेश होत राहिल)
सीपीएम शिवसेना-काँग्रेस सोबत जाण्याची शक्यता, सीपीएम युतीची बोलणी अंतिम टप्प्यात, अध्यक्षपदासाठी शिवसेनेच्या शीतल उदय सांगळे यांचे नाव आघाडीवर, एक अपक्ष राष्ट्रवादीच्या गोटात आल्याची माहिती, थोड्याच वेळात जिल्हा परिषद सत्ताकारण स्पष्ट होणार
महत्वाच्या लढती
मराठवाडा : औरंगाबादमध्ये 62 पैकी भाजपला 22, तर शिवसेनेला 18 जागा मिळाल्या आहेत. 16 जागांवर विजय मिळवलेल्या काँग्रेसला सोबत घेण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला आहे. त्यामुळे भाजप सत्तेपासून दूर राहणार आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना त्यांच्याच जिल्ह्यात म्हणजे जालन्यात मोठं आव्हान असणार आहे. कारण 22 जागांवर विजय मिळालेला असतानाही शिवसेनेने राष्ट्रवादीला सोबत घेतल्यास भाजपला सत्तेपासून दूर रहावं लागेल. शिवसेनेने 56 पैकी 14 तर, राष्ट्रवादीने 12 जागांवर विजय मिळवला आहे. बीडमध्ये राष्ट्रवादीत फूट पडण्याची शक्यता आहे. माजी मंत्री सुरेश धस यांनी विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनाच आव्हान दिल्याची माहिती आहे. त्यामुळे सुरेश धस गटाचे 7 सदस्य भाजपला पाठिंबा देण्याची शक्यता आहे. त्यामुळे ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांना स्थानिक पातळीवर सत्तेची गणितं जुळवण्याचं आव्हान असेल. पश्चिम महाराष्ट्र : सांगलीमध्ये अटीतटीची लढत होण्याची शक्यता आहे. कारण भाजपने 60 पैकी 25 जागांवर विजय मिळवला असला तरी मॅजिक फीगर गाठण्यासाठी आणखी सहा जागांची आवश्यकता आहे. त्यामुळे 17 जागांवर विजय मिळवलेल्या राष्ट्रवादीचं आव्हान भाजपसमोर असेल. मात्र सांगलीत राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील आणि काँग्रेस नेते पतंगराव कदम विरुद्ध सेनेचे आमदार अनिल बाबर यांच्यात वाद आहे. त्यामुळे इथे तीनही पक्ष एकत्र येण्याची शक्यता कमी आहे. कोल्हापुरात शिवसेनेने भाजपसोबत जाण्यास नकार दिल्याची माहिती आहे. 67 सदस्यसंख्या असलेल्या कोल्हापूर जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्यासाठी कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत नाही. त्यामुळे शिवसेना 10, काँग्रेस 14 आणि राष्ट्रवादी 11 जागा असं समीकरण जुळण्याची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्र : नाशिक जिल्हा परिषदेची एकूण सदस्यसंख्या 73 आहे. शिवसेनेने 26, तर भाजपने 14 जागांवर विजय मिळवला आहे. त्यामुळे 18 जागांवर विजय मिळवलेली राष्ट्रवादी किंगमेकरच्या भूमिकेत आहे. पंचायत समिती सभापतीपदासाठी जुळवलेली समीकरणं पाहता शिवसेना राष्ट्रवादीचा पाठिंबा घेण्याची शक्यता आहे. विदर्भ : विदर्भात अमरावतीमध्ये भाजपला सत्तेपासून दूर रहावं लागण्याची शक्यता आहे. 59 सदस्यसंख्या असलेल्या अमरावती जिल्हा परिषदेत भाजपने 14, काँग्रेसने 26, तर राष्ट्रवादीने 5 जागांवर विजय मिळवला आहे. त्यामुळे स्थानिक पक्ष किंगमेकरच्या भूमिकेत असतील. विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये भाजपचं वर्चस्व आहे. पंचायत समिती सभापती निवडणुकांमध्येही भाजपने जास्त पंचायत समित्यांवर सभापती निवडून आणला. त्यामुळे वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, बुलडाणा आणि गडचिरोली याठिकाणी सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपला स्थानिक पातळीवर सत्तेची गणितं जुळवण्याचं आव्हान असेल. यवतमाळ जिल्हा परिषदेत शिवसेना, भाजप आणि काँग्रेस, राष्ट्रवादी अशी लढत रंगण्याची शक्यता आहे. कारण 60 सदस्यसंख्या असलेल्या या जिल्हा परिषदेत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत नाही. शिवसेना 20, भाजप 16, काँग्रेस 13 आणि राष्ट्रवादी 11 असं पक्षीय बलाबल असल्याने कोणत्या पक्षाला सत्ता स्थापन करण्यात यश येतं, ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे. कोकण : सिंधुदुर्गमध्ये भाजप-शिवसेना युती होणार असल्याची माहिती आहे. मात्र इथे काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. त्यामुळे सत्तेची गणितं कशी जुळवली जातात, ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे. 50 सदस्यसंख्या असलेल्या या जिल्हा परिषदेत 27 जागांसह काँग्रेस सर्वात मोठा पक्ष आहे. मात्र शिवसेना 16 आणि भाजप 6 मिळून 22 एवढी सदस्यसंख्या होते. रत्नागिरीमध्ये शिवसेनेला स्पष्ट बहुमत आहे. शिवसेनेने 39 जागांवर विजय मिळवला आहे, तर राष्ट्रवादीने 16 जागांवर विजय मिळवला आहे. कोणत्या जिल्ह्यात शिवसेनेचे काँग्रेस-राष्ट्रवादीशी मतभेद?- नांदेडमध्ये शिवसेना आमदार प्रताप चिखलीकर विरुद्ध अशोक चव्हाण असा वाद उफाळून आला आहे. त्यामुळे काँग्रेसशी युती करण्यास चिखलीकरांचा नकार.
- कोल्हापूरमध्ये शिवसेनेचे आमदार चंद्रदीप नरके विरुद्ध स्थानिक काँग्रेस नेते आणि माजी आमदार पी एन पाटील यांच्यात टोकाचे वाद.
- उस्मानाबादमध्ये शिवसेना खासदार रवी गायकवाड विरुद्ध राष्ट्रवादी वाद, शिवसेना संपर्क प्रमुख तानाजी सावंत आणि खासदार रवी गायकवाड यांच्यात तीव्र मतभेद. या मतभेदामुळे युतीसाठी नकार.
- नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेससोबत जाणार की भाजपसोबत हे कोडं आहे. त्यामुळे शिवसेनेचे नेते आणि राज्यमंत्री दादा भुसे यांच्या निर्णयाकडे लक्ष आहे. भाजपचे नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन विरुद्ध दादा भुसे वाद आहे. त्यामुळे भाजपला रोखण्यासाठी शिवसेना कोणाची मदत घेणार हे पाहणं औत्सुक्याचं आहे.
- मात्र सिंधुदुर्गात शिवसेना आणि भाजप एकत्र. यामुळे सेनेत अंतर्गत वाद.
- बीडमध्ये राष्ट्रवादीत दुफळी आहे. पंकजा मुंडे यांची उद्धव ठाकरेंकडे युतीसाठी आग्रही मागणी. जुन्या नात्यांचा दाखला दिल्याची सूत्रांची माहिती. यापूर्वीही लोकसभा पोटनिवडणुकीत प्रितम मुंडेविरोधात शिवसेनेने उमेदवार दिला नव्हता. त्यामुळे बीडमध्ये भावनिक राजकारण पाहायला मिळतंय.
- बीडमध्ये नव्याने शिवसेनेत आलेले माजी आमदार बदामराव पंडित यांचा धनंजय मुंडे यांच्यासोबत जाण्यास तीव्र विरोध.
- तर सांगलीत राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील आणि काँग्रेस नेते पतंगराव कदम विरुद्ध सेनेचे आमदार अनिल बाबर यांच्यात वाद आहे. त्यामुळे इथेही तीनही पक्ष एकत्र येण्याची शक्यता कमी आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
मुंबई
व्यापार-उद्योग
राजकारण
Advertisement