Guilty Minds Review: 'गिल्टी माईंड' कोर्टरुम ड्रामा, वैयक्तिक नातेसंबंध अन् वास्तविकता...
Guilty Minds Review : कोर्टाची खरी बाजू, त्यातल्या ऑफ द रेकॉर्ड गोष्टी, फिक्सिंग, मॅनेजमेंट या सगळ्याचं वास्तविक चित्रण म्हणजे 'गिल्टी माईंड'.
Shefali Bhushan
Shriya Pilgaonkar, Varun Mitra, Karishma Tanna, Sugandha Garg, Namrata Sheth
Guilty Minds Review : राज्यात सुरू असलेलं राजकारण, सत्तासंघर्ष, सत्तापालट आणि चर्चा यातून थोडा वेळ काढून कोर्टचकचेऱ्या आणि तपासयंत्रणा यावरील वेबसीरीज बघितली. सात ते आठ वेगवेगळे खटले, कोर्ट रुम ड्रामा मात्र कुठेच ऑर्डर ऑर्डर नाही, भंपकपणा नाही, वकीलांच्या शायऱ्या नाही आहे ते फक्त कायद्याची प्रक्रिया आणि वास्तविकता....
अॅमॅझॉन प्राईमच्या 'गिल्टी माईंड' या वेब सीरीजबद्दल मी बोलते आहे. 'गिल्टी माईंड' बघताना दोन वेगळ्या जगाची कहाणी बघितल्यासारखं वाटतं. एकीकडे कोर्ट रुम ड्राम्याचं वास्तववादी चित्रण आहे तर दुसरीकडे त्याच कोर्टात खटले लढत असलेल्या वकीलांच्या वैयक्तिक नातेसंबंधाची कहाणी आहे.
वेब सीरीजचं नावच 'गिल्टी माईंड' असल्याने पुर्वीच थोडे तर्क-वितर्क लागतात. मात्र ते दहावा भाग बघेपर्यंत सगळे तर्क खोटे ठरतात. प्रत्येक माणूस आपल्या आयुष्यात एक मोठं गिल्ट घेऊन फिरत असतो. कोणाला न सांगता नव्या आणि वेगळ्या पद्धतीने ते कसं लपवता येईल याचा प्रयत्न करतो. आपण किती पाण्यात आहोत हे सगळ्यांना माहित असतं. मात्र जगाच्या नियमानुसार मी किती ग्रेट आणि तत्वनिष्ठ आहे, हे दाखवणं जास्त महत्वाचं वाटतं. अशीच गोष्ट या सीरीजची आहे.
दोन पात्रांभोवती ही कथा फिरते. कशफ आणि दिपक. दोघेही कॉलेज मित्र आणि वकील असतात. प्रत्येक खटले एकमेकांच्या विरोधात लढतात. कशफ म्हणजेच श्रिया पिळगावकर आणि दिपक म्हणजे विरुण मित्रा. कशफ ही नामांकित जजची मुलगी आणि प्रत्येक खटल्यात इमोशनल होणारी तर दिपक हा एका मोठ्या फर्मचा हुशार, महत्वकांक्षी वकील असतो. संपुर्ण सिरीजमध्ये सहा ते सात खटल्यांचा उल्लेख आहे. खटल्यांचे विषयदेखील तितकेच संवेदनशील आणि आताच्या पीढीसाठी महत्वाचे आहे.𝒄𝒐𝒏𝒔𝒆𝒏𝒕, 𝒈𝒂𝒎𝒊𝒏𝒈 𝒂𝒅𝒅𝒊𝒄𝒕𝒊𝒐𝒏, 𝒔𝒆𝒙 𝒅𝒆𝒕𝒆𝒓𝒎𝒊𝒏𝒂𝒕𝒊𝒐𝒏 आणि 𝒔𝒆𝒍𝒇-𝒅𝒓𝒊𝒗𝒊𝒏𝒈 𝒄𝒂𝒓𝒔 या विषयांवरील खटले हे या सिरीजचं यश आहे.
प्रत्येक पात्र ग्रे-झोनमध्ये बघायला मिळतात. कशफच्या बाजूने तिची विश्वासू जोडीदार वंदनाची भूमिका वेगळा संदेश देते. ती समलैंगिक असते. मात्र प्रत्येक खटल्याचा बारकाईने अभ्यास आणि चौकशीसाठी कायम तत्पर असते. या समलैंगिक नात्याला मात्र कोणत्याही बाबतीत बॉलीवूडसारखं मेलोड्रामॅटीक न बनवता कम्पॅनियन बनवणं हे कौतुकास्पद आहे. साधं, सरळ, सोपं मात्र तेवढंच प्रत्येक गोष्टीचा वेगळा विचार करायला भाग पाडणारी ही सिरीज आहे. वकिल आणि पत्रकार कधीच चांगले मित्र बनू शकत नाही, हे यावरुन नक्की कळतं.
यातील प्रत्येक पात्रानं आपल्या भूमिकेच्या सहजतेवर बारकाईने काम केलं आहे. प्रत्येक भागात नवा खटला असला तरीदेखील दहाव्या भागापर्यंत प्रत्येकाला खिळवून ठेवणारी सीरीज आहे. प्रत्येक पात्र एकत्र काम करताना स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करण्याच्या शर्यतीत दिसतो. सगळी मंडळी पेशाने वकिल मात्र त्यांचा अभ्यास, समजून घेण्याची पद्धत, त्याची मांडणी करण्याच्या शैलीमुळे सगळांच्या काळ्या कोटात वेगळ्या रंगाच्या छटा दिसून येतात. कोर्टाची खरी बाजू, त्यातल्या ऑफ द रेकॉर्ड गोष्टी, फिक्सिंग, मॅनेजमेंट या सगळ्याचं वास्तविक चित्रण म्हणजे 'गिल्टी माईंड'.