Shehzada Movie Review : अॅक्शन अन् रोमान्सचा मसाला असलेला कार्तिकचा 'शहजादा'
Shehzada : अॅक्शन, रोमान्स आणि भावना या सर्व गोष्टींची सांगड घालण्याचा प्रयत्न 'शहजादा' सिनेमात कार्तिकने केला आहे.
रोहित धवन
कार्तिक आर्यन, कृती सेनन, परेश रावल, रोनित रॉय, राजपाल यादव
Shehzada Movie Review : बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनचा (Kartik Aaryan) 'शहजादा' (Shahzada) हा सिनेमा खऱ्या अर्थाने परिपूर्ण आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. सुपरस्टार, रोमान्स, संगीत, गाणी अशा एका सिनेमाला यशस्वी होण्यात ज्या गोष्टी लागतात त्या सर्व 'शहजादा' या सिनेमात आहेत. हा सिनेमा भावनाप्रधान असला तरी विनोदाचा टचदेखील आहे. त्यामुळे कार्तिकचा हा सिनेमा एक मसालापट आहे.
'शहजादा' या सिनेमाचं कथानक काय? (Shehzada Movie Story)
'शहजादा' या सिनेमाचं कथानक 80-90 च्या दशकातील असल्याचं सिनेमा पाहताना जाणवतं. परेश रावल आणि रोनित रॉय जिंदाल ग्रुप या कंपनीमध्ये क्लार्कचं काम करत असतात. दरम्यान, रोनित थेट या ग्रुपच्या मालकाच्या मुलीशी लग्न करतो आणि त्या कंपनीचा मालक बनतो. परेश रावल यांना मात्र ही गोष्ट खटकते. दरम्यान, दोघांच्याही पत्नी डिलिव्हरीसाठी एकाच रुग्णालयात दाखल होतात. परेश रावलची इच्छा असते की, त्याचा मुलगा श्रीमंत घरात लहानाचा मोठा व्हावा. त्यामुळे रुग्णालयातच तो मुलांची अदलाबदली करतो.
कार्तिक आर्यनचा जन्म श्रीमंत घराण्यात झाला असला तरी तो परेश रावलच्या घरी लहानाचा मोठा होतो. आर्थिक परिस्थिती हालाखिची असूनही परेश रावल कार्तिकला शिकवतात. तो कायद्याचं शिक्षण घेतो. दरम्यान, कार्तिकच्या आयुष्यात क्रिती सेननची एन्ट्री होते. पहिल्याच भेटीत ते एकमेकांच्या प्रेमात पडतात. कार्तिक आर्यन आणि कृती दुसऱ्यांदा स्क्रीन शेअर करत आहेत.
परेश रावलचा लेक मात्र परदेशातून शिक्षण घेतो. पण फक्त शिक्षणाच्या जोरावर व्यवसाय सांभाळण्यात तो कमी पडतो. दरम्यान, खलनायकाची एन्ट्री होते आणि सिनेमात नवा ट्विस्ट येतो. या सिनेमात सनी हिंदुजाने खलनायकाची भूमिका साकारली आहे. व्यावसायादरम्यान सनी आणि रोनितचं मारामारीपर्यंत मोठं भांडण होतं. यासगळ्या प्रकारातून कार्तिक रोनितला वाचवतो. दरम्यान रोनितला रुग्णालयात दाखल केल्यानंतर परेश रावल रोनितचे खरे वडील आहेत ही गोष्ट कार्तिकला समजते आणि सिनेमा रंजक वळणावर येऊन पोहोचतो. कार्तिक मात्र प्रामाणिकपणे काम करत असतो. त्यामुळे जिंदाल ग्रुपचे मालक कार्तिकला कंपनीत कामाला ठेवतात. आणि कार्तिक आपल्या कामान सर्वांचं मन जिंकतो. पण आता जिंदाल ग्रुपच्या मालकांना कार्तिक आर्यन नक्की कोणाचा मुलगा आहे, हे कळेल का? हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना सिनेमा पाहावा लागेल.
रोहित धवन 'देसी बॉइज, 'ढिशूम' सारख्या सिनेमांनंतर 'शहजादा' हा सिनेमा घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. 'शहजादा' हा मसालापट असला तरी मनोरंजनाचा अतिरेक होणार नाही याची काळजी दिग्दर्शकाने घेतली आहे. या बॉलिवूड सिनेमात दाक्षिणात्य सिनेमाची झलक देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. हा रोमॅंटिक सिनेमा असून या सिनेमाचं कथानक शेवटपर्यंत प्रेक्षकांना खिळवून ठेवणारं आहे.
'शहजादा'च्या पहिल्या भागापेक्षा दुसरा भाग खूपच मनोरंजक आहे. पहिला भाग कंटाळवाणा असला तरी दुसरा भागाने मात्र प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी दिली आहे. या सिनेमातील गाण्यांनादेखील साऊथचा टच आहे. सिनेमाची कथा, कलाकार, दिग्दर्शन या सर्व गोष्टी उजव्या असल्या तरी एडिटिंगमध्ये कुठेतरी हा सिनेमा कमी पडला आहे.
कार्तिक आर्यनचा नवा अंदाज 'शहजादा'मध्ये पाहायला मिळत आहे. अॅक्शन, रोमान्स आणि भावना या सर्व गोष्टींची सांगड घालण्याचा प्रयत्न कार्तिकने केला आहे. कार्तिकसह कृती सेननच्या अभिनयाचंदेखील कौतुक करावं तेवढं कमीच आहे. परेश रावल, मनीषा कोईराला आणि रोनित रॉय यांनी आपल्या भूमिकेत 100 टक्के दिले आहेत. तर राजपाल यादवच्या विनोदाचं टायमिंग अचूक आहे.