(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Kanguva Movie Review : सुपरस्टार सूर्याचा 'कंगुवा' पुरता फेल! भंपक कथेसमोर दमदार अभिनय निकामी; बॉबी देओलकडूनही निराशा
Kangua Movie Review : अभिनेता सूर्याचा कंगुवा रिलीज झाला असून चित्रपट थिएटरमध्ये पाहण्याआधी त्याचा रिव्ह्यू वाचा.
शिवा
अभिनेता सूर्या, बॉबी देओल, दिशा पटानी
चित्रपटगृह
Kanguva Movie Review : साऊथ सुपरस्टार अभिनेता सूर्याचा बहुप्रतिक्षित कंगुवा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. अभिनेता सूर्याचा हा पहिला पॅन इंडिया चित्रपट असून याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. या चित्रपटात बॉबी देओल आणि अभिनेत्री दिशा पटानी यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. या चित्रपटाबाबत बऱ्याच दिवसांपासून चर्चा सुरू आहे. चाहत्यांमध्ये अभिनेता सूर्याप्रमाणे बॉबी देओलचीही क्रेझ पाहायला मिळत आहे. 'ॲनिमल' चित्रपटातील बॉबी देओलच्या अबरार पात्रामुळे त्याला पुन्हा एकदा प्रसिद्धी मिळाल्यानंतर या चित्रपटाकडे सर्वांचे डोळे लागले होते. दरम्यान, बॉबी देओलने 'ॲनिमल' चित्रपटापूर्वी 'कंगुवा' चित्रपट साईन केला होता, हे अनेकांना माहित नसेल. अभिनेता सूर्या आणि बॉबी देओलच्या कंगुवा चित्रपटाचा रिव्ह्यू वाचा.
भंपक कथेसमोर दमदार अभिनय निकामी
चित्रपट फक्त आवडत्या स्टारसाठी पाहावा का? हा चित्रपट फक्त चाहत्यांसाठी आहे, असं किती दिवस म्हणणार, इतरांनी बघायला नको का? सुर्याचा चांगला अभिनयही कंगुवा चित्रपटाला वाचवू शकलेला नाही. अभिनेता किंवा अभिनेत्रीचे चाहते फक्त त्यांना मोठ्या पडद्यावर पाहता यावं, यासाठी चित्रपट पाहतात. चाहते वाईट चित्रपट पाहतात आणि चित्रपटातील त्रुटी दाखवणाऱ्यांवर टीकाही करतात. हा चित्रपटही तसाच आहे. हा चित्रपट फक्त सूर्याच्या चाहत्यांसाठी आहे. कंगुवामध्ये सूर्या बघायला मजा येईल, पण चित्रपट बघायला मजा येणार नाही.
कथा
कंगुवा चित्रपटाची कथा नीट मांडली गेली नाही, हीच या चित्रपटाची मोठी समस्या आहे. त्यामुळे सूर्याचा दमदार अभिनयही चित्रपटाच्या कथेसमोर फिका पडतो. कंगुवा चित्रपटाची कथा दोन वेगवेगळ्या टाइम झोनची आहे, पण याचं कनेक्शन फेव्हिकॉलसारखे (Fevicol) मजबूत नाही. कथेमध्ये दोन वेगवेगळे टाइम झोन एकमेकांसोबत कनेक्ट होत नाही आणि इथेच चित्रपटाची कथा कोलमजते. एका मुलाच्या मेंदूमध्ये गंभीर केमिकल लोचा होतो आणि तो गोव्यात येतो, यावेळी तो एका हत्येचा साक्षीदार होतो. हा खून कोणी केला, कंगुवा कोण, हा मुलगा कोण, ही चा चित्रपटाची कथा आहे.
कंगुवा चित्रपट कसा आहे?
चित्रपटाची कथा दमदार नाही. चित्रपटाच्या सुरुवातीला नेमकं काय सुरु आहे, हे कळतच नाही. त्यानंतर हळूहळू तुम्हाला चित्रपट समजायला लागलाय, असं वाटतं पण, त्यानंतर कथा तुम्हाला पुन्हा गोंधळून टाकते. त्यातच चित्रपटातील गाण्यांमुळे तुमचा राग अजून टोकाला जातो. चित्रपटात काही चांगले सीन्स पाहायला मिळतात, पण फक्त काही सीन्स बघायला आपण थिएटरमध्ये जायचं का हा प्रश्न आहे. एकूणच, तुम्ही संपूर्ण चित्रपट मोठ्या धैर्याने पाहू शकता किंवा मग फक्त सूर्याला पाहायलं म्हणून पाहू शकता.
अभिनय
अभिनेता सूर्याने नेहमीप्रमाणे त्याचं अभिनय कौशल्य दाखवलं आहे, त्याचं काम चांगलं आहे. कंगुवाची भूमिका सूर्याने चांगली साकारली आहे, पण आधुनिक पात्राची भूमिका तितकी सरस नाही. बॉबी देओलची भूमिका खास छाप पाडू शकलेली नाही, तर दिशा पटानीची दिशा भरकटल्याचं पाहायला मिळत आहे.
दिग्दर्शन
कंगुवा चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन शिवा यांनी केलं आहे आणि हा चित्रपट इतक्या वाईटप्रकारे दाखवण्यास त्यांच्याशिवाय इतर कोणीही जबाबदार नाही. सूर्यासारख्या अभिनेत्याला घेऊन चित्रपट बनवताना कथा आणि स्क्रिन ट्रीटमेंट दमदार असायला हवी.
एकंदरीत, फक्त सूर्याच्या चाहत्यांनी हा चित्रपट पाहावा आणि तोही त्यांच्या जबाबदारीवर.