Vasubaras Diwali 2022 : विविध सणांचा, आनंदाचा, उत्साहाचा, मांगल्याचा दिवाळी (Diwali 2022) सण अवघ्या 15 दिवसांवर येऊन ठेपला आहे. या निमित्ताने बाजारातसुद्धा सणाची लगबग पाहायला मिळतेय. दिवाळीचे पहिले पाच दिवस खूप महत्वाचे असतात. या दिवसांचे देखील वेगळं असं धार्मिक महत्त्व आहे. हेच या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. सुरुवात वसुबारस या सणाच्या निमित्ताने  करूयात.


हिंदू मान्यतेनुसार दिवाळीच्या सुरुवातीला येणारा वसुबारस (Vasubaras) हा सण आश्विन महिन्यातल्या वद्य द्वादशी या दिवशी साजरा केला जातो. वसुबारसला 'गोवत्स द्वादशी' असे देखील म्हणतात. यामध्ये जनावरांची पूजा केली जाते. यावर्षीची दिवाळीची सुरुवात खरंतर 21 ऑक्टोबर वसुबारसने होते. गाय आणि तिचे वासरु हे निर्व्याज प्रेमाचे प्रतीक मानले जातात. गाय वासरावर जे प्रेम करते ते केवळ अनुपमेय असे असते, तसेच वत्साचे गायीवरचे प्रेम हे अनन्यसाधारण असते. म्हणून देव-भक्त, आई-मूल, गुरु-शिष्य यामधील प्रेमसंबंधालाही आपली संतमंडळी नेहमी गाय-वासराच्या प्रेमाची उपमा देतात.


काय आहे वसुबारसची प्रथा?


या दिवशी घरातील गोधनाची पूजा केली जाते. समुद्रमंथनाच्या वेळेस पाच कामधेनू उत्पन्न झाल्या होत्या त्यापैकी नंदा नामक धेनूस उद्देशून हे व्रत केले जाते. या दिवशी अनेक जन्मांच्या कामना पूर्ण व्हाव्यात याकरिता वासरासहित गायीची पूजा केली जाते. ह्या दिवसापासून घरासमोर रांगोळी काढण्यास सुरुवात करतात. काही स्त्रियांचा या दिवशी उपवास असतो. घरातील गाय वासरू यांना अंघोळ घातली जाते. अंगाला हळद लावली जाते, त्यांच्या अंगावर नवी वस्त्रे घातली जातात. ह्या दिवशी हिंदू परंपरेनुसार, गहू, मूग खात नाहीत. स्त्रिया बाजरीची भाकरी आणि गवारीच्या शेंगाची भाजी खाऊन उपवास सोडतात. भरपूर कृषी उत्पादन व्हावे, आपल्या मुला-बाळांना चांगले आरोग्य मिळावे आणि सुख लाभावे म्हणून वसुबारसची पूजा केली जाते. या दिवशी संध्याकाळी घरातील तुळशीपुढे आणि दारात, परिसरात दिवाळी सणाच्या प्रारंभानिमित्त पणत्या लावून रोषणाई करण्याची पद्धत आहे.


महत्वाच्या बातम्या :