Dr OP Kapoor : डॉक्टरांचे डॉक्टर ओपी कपूर यांचं निधन झालं आहे. मुंबईमध्ये वृद्धापकाळानं त्यांनी अंतिम श्वास घेतला. ते मृत्यूसमयी 90 वर्षांचे होते. मुंबईसह देशभरात त्यांची ओळख डॉक्टरांचे डॉक्टर अशी होती. ते सुप्रसिद्ध डॉ. शशी कपूर आणि डॉ. शम्मी कपूर यांचे वडील होते. ओपी कपूर हे बॉलिवूडमधील प्रसिद्ध कपूर परिवाराचे फॅमिली डॉक्टर होते. त्यांच्यावर आज दुपारी दादरच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्च्यात पत्नी पुतळीदेवी, मुलं डॉ शशी आणि शम्मी यांच्यासह नातवंडं असा परिवार आहे. 


डॉ. ओपी कपूर हे ऋषि कपूर आणि त्यांच्या दोन्ही भावांसह संपूर्ण कपूर परिवाराच्या संबंध कारकिर्दीचे साक्षीदार राहिलेले आहेत. राज कपूर यांच्याशीही डॉ. ओ पी कपूर यांचा स्नेह होता. ऋषि कपूर यांच्याशी तब्बल 55 वर्षांचा त्यांच्या निकटचा स्नेह होता. 



वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी तब्बल 65 वर्षे विनाशुल्क लेक्चर घेण्याच्या त्यांच्या उपक्रमाची नोंद लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही झाली होती.  डॉ. ओपी कपूर हे मातोश्री बिर्ला हॉलमध्ये ते डॉक्टरांसाठी मान्सून सीरिज घ्यायचे. सहा तासांचं हे मॅरेथॉन लेक्चर असायचे. ते विद्यार्थ्यांना पुस्तकं घेऊन कधी शिकवत नसायचे. त्यांचं लेक्चर हे आनंदी पद्धतीनं होणारं लेक्चर असायचं त्यामुळं या लेक्चर्सला हॉल पूर्ण भरु जायचे. विद्यार्थी डॉक्टरांचे आवडते होते. आपल्या देशाला गरज ही जनरल प्रॅक्टिशनरची जास्त आहे, मात्र आपल्याकडे स्पेशालिस्ट डॉक्टर होण्याकडे भर असतो, असं ते नेहमी म्हणायचे.


12 पुस्तकांचं लेखन


डॉ . कपूर यांनी भारतासह ब्रिटन आणि अमेरिकेतील डॉक्टरांचे लेक्चर्स घेतली. डॉ. कपूर यांनी 12 पुस्तकांचं लेखन केले आहे. डॉ. कपूर यांनी ग्रँट मेडिकल कॉलेज, जे. जे. हॉस्पिटल येथे आपली सेवा दिली आहे. त्याशिवाय जसलोक हॉस्पिटल आणि बॉम्बे हॉस्पिलटमध्येही त्यांनी कर्तव्य पार पाडले आहे. 1974 मध्ये ओपी कपूर यांना एडिगबर्गमधील रॉयल कॉलेजमध्ये फेलोशिप मिळाली होती. त्यानंतर पुढे अमेरिकेतील कॉलेजमध्ये फेलोशिपच्या माध्यमातून त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं. 


भारतासह जगभरात दिली लेक्चर्स 


 वैद्यकीय क्षेत्रात केलेल्या कार्यामुळे 1982 मध्ये डॉ. ओपी कपूर यांना वैद्यकीय क्षेत्रातील प्रतिष्ठीत अशा डॉक्टर बीसी रॉय राष्ट्रीय पुरस्कारानं राष्ट्रपतींच्या हस्ते गौरवण्यात आलं होतं. असोसिएशन ऑफ गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी आणि वॉर्नर गॅस्ट्रोएन्टेरोलॉजीमध्ये 1982 मध्ये डॉ. ओपी कपूर यांनी केलेले भाषणानं सर्वांचं लक्ष वेधलं होतं. ओपी कपूर यांनी भारतामध्ये जवळपास 100 शहरांमध्ये डॉक्टरांसाठी लेक्चर्स घेतलं आहे. त्याचप्रमाणे त्यांनी यूके आणि यूएसएमधील वैद्यकीय डॉक्टरांना संबोधित केले आहे.


आयुष्यभर त्यांनी डॉक्टरांना मोफत अध्यापन केले. त्यांची लेक्चर्स ही मॅरेथॉन असायची. वैद्यकीय क्षेत्रातील अवघड विषय सोप्या पद्धतीनं शिकवण्यात त्यांचा हतखंडा होता.  अगदी अलीकडच्या काळापर्यंत ते  मुंबईतील सर्व वैद्यकीय महाविद्यालयातील एमबीबीएस अंतिम वर्षाच्या 1200 विद्यार्थ्यांसाठी बिर्ला मातोश्री सभागृहात एकूण 6-6 तास लेक्चर्स घ्यायचे. ते ग्रँट मेडिकल कॉलेजमधून 1986 मध्ये हॉस्पिटलमधून 1986 साली 33 वर्षांहून अधिक काळ नोकरी केल्यानंतर निवृत्त झाले खरे पण नंतरही त्यांनी आपलं अध्यापनाचं काम सोडलं नाही.  


त्यांनी संपूर्ण भारतभर जनरल प्रॅक्टिशनर्ससाठी असंख्य रिफ्रेशर कोर्स आयोजित केले, जिथे ते स्वखर्चाने जायचे. त्यांनी काश्मीर ते केरळ आणि कच्छ ते ओरिसा असं भारतातील प्रत्येक शहरांमध्ये जाऊन लेक्चर्स दिली आहेत. 20 हजारांहून अधिक विद्यार्थी डॉक्टरांना त्यांनी भारतभर प्रशिक्षण दिलं आहे.