Diwali 2022 : गणेशोत्सवानंतर आता सगळ्यांनाच दिवाळीची (Diwali 2022) चाहूल लागली आहे. दिवाळी हा आनंदाचा, उत्साहाचा आणि भरभराटीचा सण आहे. हिंदू धर्मियांचा दिवाळी हा मुख्य सण आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजण या सणाची अत्यंत आतुरतेने वाट पाहतात. कारण या निमित्ताने मित्र-मंडळी, नातेवाईक घरी येतात. घरात गोडोधोडाचे पदार्थ तयार केले जातात. तसेच सगळीकडे विद्युत रोषणाई केली जाते. सगळंच वातावरण अगदी प्रसन्न वाटतं. त्यामुळेच अगदी सगळ्यांचाच दिवाळी हा आवडता सण आहे.
ऑक्टोबर महिना सुरु व्हायला अवघे काही दिवस बाकी आहेत. याच ऑक्टोबर महिन्यात विविध सण साजरे केले जातात. जसे की, नवरात्र, दसरा मात्र या सर्वात मुख्य आकर्षण असते ते मात्र दिवाळीचं. यंदाच्या दिवाळीत तुम्हालाही तुमच्या सुट्ट्यांचं प्लॅनिंग करायचं असेल, कुठे फिरायला जायचं असेल तर या ठिकाणी आम्ही तुम्हाला दिवाळी कधी आहे आणि कोणत्या दिवशी कोणता सण साजरा केला जाणार आहे या संदर्भात माहिती देणार आहोत.
काही लोकांची अशी श्रद्धा आहे की चौदा वर्षांचा वनवास संपवून राम जेव्हा सीतेसह अयोध्येला परत आले ते याच दिवसांत. त्यावेळी अयोध्येत मंगलपर्व मानलं गेलं होतं. आणि त्यानंतर दिवाळी साजरी करण्याची प्रथा सुरु झाली.
खरंतर, वसुबारसपासून म्हणजेच 21 ऑक्टोबरपासून या सणाची सुरुवात होते. मात्र, काही भागांमध्ये 24 ऑक्टोबरपासून म्हणजेच लक्ष्मीपूजनपासून सुरु होते. कोरोना काळानंतर यावर्षी सगळेच उत्साह निर्बंधमुक्त साजरे केले जात आहेत. त्यामुळे यंदाची दिवाळीही खास असणार आहे यात शंका नाही.
दिवाळीचा शुभमुहूर्त :
यावर्षी अमावस्या 24 आणि 25 ऑक्टोबर अशा दोन दिवसांमध्ये विभागून आली आहे. अमावस्या 25 ऑक्टोबरला प्रदोष काळापूर्वीच संपणार आहे. दरम्यान, लक्ष्मीपूजनासाठी 24 तारखेला सायंकाळी 6 वाजून 8 मिनिटांपासून रात्री 8 वाजून 38 मिनिटांपर्यंतचा शुभ काळ असणार आहे. त्याचवेळी घरातील लक्ष्मीची पूजा करणे शुभ असणार आहे.
यंदाच्या दिवाळीचे महत्त्वाचे दिवस :
- वसुबारस : अश्विन द्वादशी - 21 ऑक्टोबर 2022
- धनत्रयोदशी : अश्विन गुरुद्वादशी - 22 ऑक्टोबर 2022
- नरक चतुर्दशी : लक्ष्मीपूजन : अश्विन अमावास्या प्रारंभ - 24 ऑक्टोबर 2022
- बलिप्रतिपदा/पाडवा/ भाऊबीज : कार्तिक शुद्ध प्रतिपदा - 26 ऑक्टोबर 2022