Important Days in October 2022 : विविध सणावारांचा ऑक्टोबर महिना अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. ऑक्टोबर महिन्यात दसरा, दिवाळी आणि नवरात्र हे सण प्रामुख्याने साजरे केले जातात. पण त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय आणि इतिहासातील सुद्धा काही महत्त्वाचे दिवस या महिन्यात आहेत. या महिन्यात प्रत्येक दिनाचं वेगळं महत्व नेमकं काय आहे? हे जाणून घेणार आहोत. चला जाणून घेऊयात ऑक्टोबर महिना दिनविशेष.
2 ऑक्टोबर - महात्मा गांधी जयंती, आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस.
2 ऑक्टोबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती जगभरात साजरी केली जाते. महात्मा गांधीचा जन्मदिवस हा आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस साजरा होतो. हाच दिवस संयुक्त राष्ट्राने यांनी जागतिक अहिंसा दिवस म्हणून घोषित केलेला आहे. या दिवशी देशात विविध कार्यक्रम राबविले जातात.
2 ऑक्टोबर - लालबहादूर शास्त्री जयंती
लालबहादूर शास्त्री हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील स्वातंत्र्यसैनिक आणि भारतीय प्रजासत्ताकाचे दुसरे पंतप्रधान होते. 9 जून 1964 रोजी यांनी त्यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतली. यांच्या कार्यकाळात 1965 सालचे दुसरे भारत-पाकिस्तान युद्ध घडले. सोव्हिएत संघाच्या मध्यस्थीने पाकिस्तानबरोबर युद्धबंदीचा ताश्कंद करार करण्यासाठी ताश्कंद (तत्कालीन सोव्हिएत संघात, वर्तमान उझबेकिस्तानात) येथे दौऱ्यावर असताना 11 जानेवारी, इ.स. 1966 रोजी त्यांचा आकस्मित मृत्यू झाला.
3 ऑक्टोबर - मिरण महाराज पुण्यतिथी -देवळी (वर्धा)
वर्धा जिल्ह्यातील देवळी येथे संत मिरण नाथ महाराज हे देवळी वासीयांचं ग्रामदैवत आहे. जन्माने मुस्लिम असलेल्या या मिरण महाराजांचं समाधी मंदिर वर्धा देवळी राजमार्गावर देवळी शहराच्या मागच्या बाजूला आहे. इ.स.1978 मध्ये समाधी घेतली, नंतर इथं त्यांचं भव्य मंदिर बांधण्यात आलं.. मीरनाथ महाराज हे पांडुरंगाचे मोठे भक्त होते. विश्वनाथ महाराज त्यांचे गुरु. मात्र मुस्लिम असल्याने मंदिरात त्यांना प्रवेश मिळाला नव्हता. अश्विन शुद्ध अष्टमीला त्यांची पुण्यतिथी असते. या उत्सवाला जिल्हाभरातील मोठ्या प्रमाणात भाविक या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी येतात.
5 ऑक्टोबर - जागतिक शिक्षक दिवस (World Teacher's Day) :
जागतिक शिक्षक दिन , आंतरराष्ट्रीय शिक्षक दिन म्हणूनही ओळखला जातो , हा दरवर्षी 5 ऑक्टोबर रोजी आयोजित केलेला आंतरराष्ट्रीय दिवस आहे. 1994 मध्ये स्थापित, हे 1966 च्या UNESCO / ILO च्या शिक्षकांच्या दर्जासंबंधीच्या शिफारसीवर स्वाक्षरी केल्याचे स्मरण करते. जागतिक शिक्षक दिनाचे उद्दिष्ट "जगातील शिक्षकांचे कौतुक करणे, त्यांचे मूल्यांकन करणे आणि सुधारणे" यावर लक्ष केंद्रित करणे आणि शिक्षक आणि अध्यापनाशी संबंधित समस्यांवर विचार करण्याची संधी प्रदान करणे आहे.
5 ऑक्टोबर - दसरा, विजयादशमी
आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील ही दशमी श्रवण नक्षत्राच्या योगावर ‘विजयादशमी’ साजरी होते. ह्या दशमीलाच ‘दसरा’ म्हणतात. दसरा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे. यामध्ये अक्षय्य तृतीया, गुढीपाडवा, दसरा आणि दिवाळी पाडवा असे साडेतीन मुहूर्त आहेत. कार्तिकचा पहिला दिवस हा गुढीपाडवा असतो.
5 ऑक्टोबर - साईबाबा पुण्यतिथी उत्सव (शिर्डी)
साईबाबांचा 104 वा पुण्यतिथी उत्सवाला शिर्डीत प्रारंभ झाला आहे. विजयादशमीच्या दिवशीच साईबाबा समाधीस्त झाले होते. साई संस्थानच्या वतीने चार दिवस हा पुण्यतिथी उत्सव दरवर्षी साजरा केला जातो. यावर्षीही उत्सवाच्या मुख्य दिवशी म्हणजे उद्या साई भक्तांसाठी समाधी मंदिर दर्शनासाठी रात्रभर खुले राहणार आहे. हजारो भाविक साईसमाधीच्या दर्शनासाठी शिर्डीत दाखल होत आहेत. विजयादशमीच्या दिवशी 1918 साली शिर्डीच्या साईबाबांचे देहावसान झाले होते. 1919 पासून आजपर्यंत विजयादशमीच्या दिवशी साईबाबांची पुण्यतिथी साजरा केली जाते. तीन दिवस हा उत्सव साजरा करण्याची परंपरा आहे, मात्र यावर्षी तिसऱ्या दिवशी एकादशी आल्याने चार दिवस उत्सव साजरा केला जाणार आहे.
7 ऑक्टोबर : जागतिक कापूस दिन (World Cotton Day) :
कापसाचे नैसर्गिक गुणधर्म, उत्पादन, परिवर्तन, व्यापार आणि खप यापासून लोकांना मिळणाऱ्या फायद्यांचे महत्व साजरे करण्याच्या उद्देशाने 'जागतिक कापूस दिवस' साजरा करण्यात येतो. जागतिक कापूस दिवसाची सुरुवात जागतिक व्यापार संघटनेमार्फत 2019 सालापासून झाली. त्यानुसार दरवर्षी 7 ऑक्टोबर रोजी जागतिक कापूस दिवस साजरा करण्यात येतो.
8 ऑक्टोबर : भारतीय हवाई दल दिन (Indian Air Force Day) :
भारतीय हवाई दल हे भारतीय सशस्त्र दलांचा एक भाग आहे जे देशासाठी हवाई युद्ध, हवाई सुरक्षा आणि हवाई पाळत ठेवण्याचे महत्त्वाचे कार्य करते. भारतीय हवाई दलाची स्थापना 8 ऑक्टोबर 1932 रोजी झाली. स्वातंत्र्यापूर्वी हे हवाई दल रॉयल इंडियन एअर फोर्स म्हणून ओळखले जात होते. स्वातंत्र्यानंतर (1950 मध्ये पूर्ण प्रजासत्ताक घोषित करण्यात आले), त्यातून "रॉयल" हा शब्द फक्त "भारतीय हवाई दल" असा करण्यात आला.
9 ऑक्टोबर - कोजागिरी पौर्णिमा
अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथीला शरद पौर्णिमा म्हणजेच कोजागिरी पौर्णिमा म्हणतात. रविवार, 09 ऑक्टोबर रोजी पहाटे 03:41 वाजता सुरू होत आहे. ही तारीख दुसऱ्या दिवशी सोमवार, 10 ऑक्टोबर रोजी सकाळी 02:24 वाजता समाप्त होईल.
पण, हिंदू मान्यतेनुसार या पौर्णिमेच्या दिवशी साक्षात लक्ष्मीदेवी चंद्रमंडळातून येऊन पृथ्वीवर उतरते. आणि मध्यरात्री (संस्कृतमध्ये) 'को जागर्ति' (म्हणजे 'कोण जागत आहे') असे म्हणत मनुष्याचे प्रयत्न पहात पृथ्वीतलावर संचार करीत असते अशी धारणा आहे. कोजागिरीत चंद्र पाहून दूध पिण्याची विशेष परंपरा भारतात आहे.
9 ऑक्टोबर - ईद-ए-मिलाद
इस्लाम धर्मात पैगंबर हजरत मोहम्मद यांच्या जन्मदिवसाला मोठं महत्व आहे. पैगंबर हजरत मोहम्मद यांचा जन्मदिन ‘ईद मिलाद उन-नबी’ म्हणून साजरा करण्यात येतो. ईद मिलाद उन-नबीच्या दिवशी घरं आणि धार्मिक ठिकाणं आकर्षक रोषणाईनं सजवल्या जातात, प्रार्थना केली जाते. ठिकठिकाणी मिरवणुका काढल्या जातात. या दिवशी हजरत मोहम्मद यांच्या पवित्र वचनांचं, कुराणाचं पठण केलं जातं.
9 ऑक्टोबर - महर्षी वाल्मिकी जयंती
महर्षी वाल्मिकी ऋषी यांना संस्कृत भाषेचे पहिले कवी मानले जाते. हिंदू पंचंगानुसार त्यांची जयंती आश्विन महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी साजरी केली जाते. वाल्मिकी रामायणाचे रचनाकार म्हणून प्रख्यात असलेले ऋषी होते. ते आदिकवि म्हणून प्रसिद्ध आहेत. रामायण एक महाकाव्य आहे जे श्रीराम यांच्या जीवनातुन आपणास जीवनातील सत्य, कर्तव्य, साह्स यांचा परिचय देते आणि आदर्श जीवन जगण्यास मार्गदर्शन करते. त्यांनी संस्कृत भाषेत रामायणाची रचना केली. त्यांनी लिहिलेले रामायण हे संस्कृत भाषेतील सर्वप्रथम महाकाव्य मानले जाते. म्हणून वाल्मिकी यांना आद्यकवी असे सुद्धा संबोधले जाते.
10 ऑक्टोबर : जागतिक मानसिक आरोग्य दिन (World Mental Health Day) :
आजच्या धावपळीच्या युगात सर्वांनाच मानसिक तणावाला सामोरे जावे लागते. त्यातील खूप कमी व्यक्ती मानसिक तणावातून बाहेर पडतात. मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष केल्याने मानसिक तणाव, डिप्रेशन, एंजायटीपासून हिस्टीरिया, डिमेंशिया, फोबिया सारख्या मानसिक आरोग्याच्या समस्या उद्भवतात. जगाला मानसिक आरोग्याचे महत्त्व समजण्यासाठी, तसेच जनजागृती करण्यासाठी 10 ऑक्टोबरला 'जागतिक मानसिक आरोग्य दिन' (World Mental Health Day) साजरा केला जातो. त्यामुळे लोकांमध्ये मानसिक आरोग्यासंबंधी जनजागृती होण्यास मदत होते.
11 ऑक्टोबर : आंतरराष्ट्रीय बालिका दिवस (International Girl Child Day) :
आंतरराष्ट्रीय बालिका दिवस दरवर्षी 11 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्यामागचा मुख्य उद्देश म्हणजे महिलांसमोरील आव्हाने आणि त्यांच्या हक्कांचे संरक्षण याबद्दल जागरूकता निर्माण करणे. समाजातील लिंग-भेद, स्त्रीभ्रृण हत्या, बालविवाह, हिंसाचार यांसारख्या प्रकारांना आळा घालण्यासाठी हा दिवस महत्त्वाचा आहे.
11 ऑक्टोबर : अमिताभ बच्चन वाढदिवस (Amitabh Bachchan Birthday) :
अमिताभ बच्चन हे एक भारतीय चित्रपट अभिनेते, चित्रपट निर्माते, दूरदर्शन सूत्रसंचालक आहेत. भारतीय चित्रपटांच्या इतिहासातील सर्वात प्रभावशाली अभिनेत्यांपैकी एक म्हणून त्यांची ओळख आहे. 1970-80 च्या दरम्यान, ते भारतीय चित्रपटातील सर्वात प्रभावी अभिनेते होते. अमिताभ यांचा जन्म 1942 मध्ये अलाहाबाद येथे हिंदी कवी हरिवंशराय बच्चन आणि त्यांच्या पत्नी, सामाजिक कार्यकर्त्या तेजी बच्चन यांच्या घरी झाला. 1969 मध्ये भुवन शोम या चित्रपटात आवाज निवेदक म्हणून त्यांची फिल्मी कारकीर्द सुरू झाली. त्यांनी 1970च्या दशकाच्या सुरुवातीला जंजीर, दीवार आणि शोले यांसारख्या चित्रपटांसाठी लोकप्रियता मिळवली. हिंदी चित्रपटांमधील भूमिकांसाठी त्यांना भारताचा "अँग्री यंग मॅन" म्हणून संबोधण्यात येते.
11 ऑक्टोबर - नगाजी महाराज पुण्यतिथी - पार्डी (वर्धा)
वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यात येणाऱ्या पारडी येथे येत्या 12 ऑक्टोबर रोजी संत नगाजी महाराज यांची पुण्यतिथी परंपरेनुसार तृतीयेला साजरी करण्यात येणार आहे. गेल्या दोन वर्षांपासून कोरोना निर्बंधांमुळे पुण्यतिथी सोहळ्याचं आयोजन करता आलं नाही. मात्र, यावर्षी परंपरेनुसार भजन, कीर्तन करत आयोजन करण्यात येणार आहे. हिंगणघाट तालुक्यातील पारडी येथे नगाजी महाराज 300 वर्षांपूर्वी होऊन गेले. संत नगाजी महाराज देवस्थान पारडी येथे गेल्या जवळजवळ 210 वर्षांपासून पुण्यतिथी उत्सव उत्साहात साजरा करण्यात येतो.. पोथरा आणि वणा नदीच्या काठावर हे ठिकाण वसलेलं आहे.. हजारो भाविक या ठिकाणी पुण्यतिथी उत्सवाला दरवर्षी येतात.. विशेष म्हणजे महाप्रसाद कार्यक्रम मोठ्या प्रमाणात आयोजित केला जातो महाप्रसादात भाजी पोळी वरण,डाळभाजी भात, कढी, भजे आणि तांदळाची खीर अशा प्रकारचा थाळी भरून महाप्रसाद असतो. पुण्यतिथी उत्सव तृतीयेला साजरा केला जातो तेव्हा मोठा उत्साहात भजन कीर्तन आणि गोपाळकालाचं देखील आयोजन केलं जातं..
13 ऑक्टोबर - संकष्ट चतुर्थी (चंद्रोदय 08.16)
आश्विन महिन्याच्या कृष्ण पक्ष चतुर्थीला संकष्टी चतुर्थी साजरी करण्याची परंपरा आहे. या दिवशी गणेशाची आराधना केल्याने जीवनातील समस्यांपासून मुक्ती मिळते. या दिवशी गणपतीला त्याच्या आवडत्या वस्तू अर्पण केल्याने इच्छित फळ मिळते. यंदा संकष्टी चतुर्थी गुरुवारीर, 13 ऑक्टोबर रोजी साजरी होणार आहे. या वेळी चंद्रयोग 08.16 आहे.
13 ऑक्टोबर - करवा चौथ व्रत
कोजागिरी नंतरची चतुर्थी म्हणजेच करवा चौथ. आपल्या सौभाग्याचे रक्षण करण्यासाठी महिला दरवर्षी कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थीला करवा चौथचे (Karwa Chauth 2022) व्रत करतात. यावर्षी करवा चौथचे व्रत 13 ऑक्टोबर 2022 रोजी गुरुवारी केले जाणार आहे. असे मानले जाते की, या व्रताच्या प्रभावामुळे महिलांना अखंड सौभाग्याचे वरदान मिळते. करवा चौथला गणेशाची, शंकर-पार्वती, करवा माता याशिवाय चंद्राच्या पूजेला विशेष महत्त्व आहे. सुखी वैवाहिक जीवनासाठी, पतीच्या संरक्षणासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी महिला या दिवशी निर्जल उपवास करतात. आणि चंद्राकडे पाहून उपवास सोडतात.
14 ऑक्टोबर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी
संतांच्या विचारातील राष्ट्र निर्माणाची भावना, विश्वधर्माच्या प्रसाराचे कार्य आणि मानवतावादी प्रेरणेचा विचारप्रवाह आधुनिक काळामध्ये पुढे नेण्याचे कार्य विदर्भाच्या मातीत जन्मलेल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी केले. आपल्या प्रबोधन काळात त्यांनी देशात धार्मिक एकात्मता निर्माण करण्याचा आटोकाट प्रयत्न केला. तुकडोजी महाराजांनी राष्ट्रीय कार्यातच आपले जीवन समर्पित केले. विश्वधर्म, विश्वशांती परिषदेसाठी 1956 मध्ये ते जपानला गेले. त्यांच्या भजनाने अनेक पाश्चात्य व पौर्वात्य विद्वान मोहित झाले. 1966 मध्ये प्रयाग येथे विश्वहिंदू परिषदेचे ते अध्यक्ष होते.
21 ऑक्टोबर - वसुबारस
दिवाळीचा पहिला दिवस हा वसुबारस. वसुबारसला 'गोवत्स द्वादशी' असे देखील म्हणतात. यामध्ये जनावरांची पूजा केली जाते. यावर्षीची दिवाळीची सुरुवात खरंतर 21 ऑक्टोबर वसुबारसने होते. गाय आणि तिचे वासरु हे निर्व्याज प्रेमाचे प्रतीक मानले जाते. गाय वासरावर जे प्रेम करते ते केवळ अनुपमेय असे असते, तसेच वत्साचे गायीवरचे प्रेम हे अनन्यसाधारण असते. म्हणून देव-भक्त, आई-मूल, गुरु-शिष्य यामधील प्रेमसंबंधालाही आपली संतमंडळी नेहमी गाय-वासराच्या प्रेमाची उपमा देतात.
23 ऑक्टोबर - धनत्रयोदशी
आश्विन महिन्यातील कृष्ण त्रयोदशी म्हणजे धनत्रयोदशी. धनत्रयोदशीमध्ये धनाजी पूजा होते आणि धन्वंतरी ऋषी जे आयुर्वेदाचे जनक आहेत. जे आयुर्वेदाचे डॉक्टर आहेत. ते या दिवशी धन्वंतरी ऋषींची पूजा करतात. बाकी व्यापारी आणि इतर लोक हे धनाची पूजा करतात. या दिवशी सोनं खरेदी करणं शुभ मानले जाते. धनत्रयोदशी या शब्दाचा अपभ्रंश ‘धनतेरस’ असा आहे. हिंदू धर्मात हा शुभ दिवस मानला जातो.
24 ऑक्टोबर - नरक चतुर्दशी
नरकासुराचा वध भगवान श्रीकृष्णांनी नरकासुराला ही तिथी ‘नरकचतुर्दशी’ म्हणून ओळखली जाईल, असे सांगितले. ह्या दिवशी संध्याकाळी समईच्या चार वाती प्रज्वलित करुन पूर्वाभिमुख होऊन ती तेवती समयी दानात देण्याची प्रथा काही मंडळी आजही पाळतात. तसेच, कोकणात अंघोळ केल्यानंतर 'कारेटं' अंगठयाने फोडण्याची प्रथा आजही पाळली जाते. नरकासुराच्या वधाचे ते प्रतीक आहे असे मानतात. यावर्षी नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन हे एकाच दिवशी आले आहेत. खरंतर लक्ष्मीपूजन हे दुसऱ्या दिवशी येते.
24 ऑक्टोबर : जागतिक पोलिओ दिन (World Polio Day) :
जागतिक पोलिओ दिवस दरवर्षी 24 ऑक्टोबर रोजी जगभरात साजरा केला जातो. पोलिओ आजाराबाबत जनजागृती करण्यासाठी हा दिवस निवडण्यात आला.
24 ऑक्टोबर : लक्ष्मीपूजन
दिवाळी लक्ष्मीपूजन ही भारतीय संस्कृतीतील महत्वाची पूजा मानली जाते. आश्विन महिन्यातील अमावास्येला संध्याकाळी ही पूजा दरवर्षी प्रथेप्रमाणे केली जाते. दिवाळीमध्ये लक्ष्मी पूजनाला अधिक महत्त्व दिले जाते. या दिवशी अंगाला उटणे लावून आंघोळ करतात. हिंदू धर्मातील प्रमुख सणांपैकी हा एक सण आहे. या दिवशी लक्ष्मीची यथासांग पूजा करून, घरासमोर सुशोभित रांगोळी काढून, दारी झेंडूच्या माळा लावून, फराळाचा, लाह्या, बत्तास्यांचा नैवेद्य दाखवून अश्विन महिन्यातील अमावास्येला लक्ष्मीपूजन केले जाते.
25 ऑक्टोबर : सूर्यग्रहण
25 ऑक्टोबर रोजी भारतातून पाहता येणारं पहिलं सूर्यग्रहण आहे. त्यामुळे या ग्रहणाचा सुतक काळ अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, वर्षाच्या दुसऱ्या सूर्यग्रहणाच्या वेळी सूर्य देव तूळ राशीमध्ये विराजमान होईल.
25 ऑक्टोबर : बलिप्रतिपदा, दिवाळी पाडवा
दिवाळीत येणारी तिथी कार्तिक शुद्ध प्रतिपदा हा दीपावलीचा तिसरा दिवस असतो. हिंदू धर्मीयांचा हा एक मोठा सण आहे. या दिवसाला दिवाळी पाडवा असे म्हणतात. साडेतीन मुहूर्तांपैकी हा अर्धा मुहूर्त आहे. ह्या दिवशी सर्वांनी पहाटे अभ्यंगस्नान करावे. नवीन वस्त्रे परिधान करावीत अशी पूर्वापार चालत आलेली परंपरा आहे. ह्या दिवशी पत्नीने पतीला ओवाळण्याची भेटवस्तू ‘ओवाळणी’म्हणून देण्याची प्रथा आजही घराघरांत पाळली जाते.
बलिप्रतिपदेतला बळिराजा हा शेतकरी राजा होता. त्याला तीन पावले जमिन दान स्वरूपात मागून विष्णूच्या वामन अवताराने मारले. हा राजा जनतेची काळजी घेत होता म्हणून त्याचं राज्य अजूनही यावं यासाठी ग्रामीण भागात अजूनही स्त्रिया भावाला ओवाळताना म्हणतात "इडा पीडा टळो, बळीचे राज्य येवो" अशी म्हण रूढ आहे.
हा सण मुळात कृषी संस्कृतीतून आलेला आहे. शेतकऱ्यांच्या जीवनात या दिवसाचं खूप महत्त्व आहे. बलिप्रतिपदेच्या दिवशी बळीची पूजा करायची प्रथा आहे. त्यासाठी जमिनीवर पंचरंगी रांगोळीने बळी आणि त्याची पत्नी विंध्यावली यांची चित्रे काढून त्यांची पूजा केली जाते. पुढीलप्रमाणे बळीची प्रार्थना केली जाते.
25 ऑक्टोबर - भाऊबीज
भाऊबीज हा सण कार्तिक शुद्ध द्वितीया (यमद्वितीया) या दिवशी असतो. हा दिवळीतला चौथा आणि शेवटचा दिवस असतो. या सणाला हिंदीत भाईदूज असं म्हणतात. बहीण-भावाचे नातेसंबंध अधिक दृढ करणारा हा दिवस असतो. या दिवशी भाऊ बहिणीच्या घरी जातो. बहीण भावाला ओवाळते आणि दोघे एकमेकांना भेटवस्तू देतात.
31 ऑक्टोबर - सरदार पटेल जयंती
सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्म 31 ऑक्टोबर 1875 रोजी झाला. वल्लभभाई पटेल हे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाचे पहिले गृहमंत्री आणि उपपंतप्रधान झाले. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी पाकिस्तानातून आलेल्या आणि पंजाब आणि दिल्ली येथे राहणार्या निर्वासितांच्या मदतीसाठी खूप काम केले. सरदार पटेल हे मुक्त व्यापार आणि खासगी मालकी हक्कांचे समर्थक होते. भारताची एकता आणि अखंडता यांसाठी त्यांनी मोलाचे योगदान दिले. राष्ट्र उभारणीत त्यांचे योगदान महत्त्वाचे असल्यामुळं त्यांचा जन्मदिवस भारत सरकारने राष्ट्रीय एकता दिन म्हणून घोषित केला आहे. सरदार पटेल हे भारताचे ‘लोहपुरुष’ म्हणून ओळखले जातात.
31 ऑक्टोबर : एकता दिन (Unity Day) :
देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती 31 ऑक्टोबर रोजी असून, हा दिवस ‘राष्ट्रीय एकता दिवस’ म्हणून साजरा करण्याचे भारत सरकारने ठरविले. सरदार पटेल यांनी स्वातंत्र्य चळवळीत तसेच देशाची राष्ट्रीय एकात्मता साधण्यासाठी दिलेल्या योगदानाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी राष्ट्रीय एकता दिवस पाळला जातो. सरदार पटेल हे भारताचे ‘लोहपुरुष’ म्हणून ओळखले जातात.
31 ऑक्टोबर : इंदिरा गांधी पुण्यतिथी
माजी पंतप्रधान आणि 'आयर्न लेडी' म्हणून ओळख असलेल्या इंदिरा गांधी यांची 31 ऑक्टोबर रोजी पुण्यतिथी असते. इंदिरा गांधी यांनी 1966 ते 1977 या काळात सलग तीन वेळा देशाची सूत्रे हाती घेतली आणि त्यानंतर 1980 मध्ये पुन्हा या पदावर पोहोचल्या आणि पदावर असताना 31 ऑक्टोबर 1984 रोजी याच दिवशी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची त्यांच्या निवासस्थानी अंगरक्षकांनी हत्या केली होती.
महत्वाच्या बातम्या :