Sade Tin Muhurta : हिंदू वर्षातील साडेतीन मुहूर्त, ज्यांना हिंदू धर्मात अनन्य साधारण महत्व आहे. लग्न, वाहन खरेदी, उद्घाटन यांसारख्या शुभकार्यात बाधा येऊ नये यासाठी मुहूर्त काढण्याची परंपरा आहे. हिंदू वर्षांमध्ये असे काही दिवस आहेत जे अत्यंत शुभ मानले जातात आणि त्या दिवशी मुहूर्त काढण्याची आवश्यकता नसते. हिंदू संस्कृतीतील महत्वाचे असे साडे तीन मुहूर्त कोणते आहेत? जाणून घ्या याचे महत्व


साडेतीन मुहूर्तांचे महत्त्व काय?
गुढीपाडवा Gudi Padwa 2022 : नवीन हिंदू वर्षाची सुरुवात चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेपासून होते. याबरोबरच चैत्र नवरात्री आणि गुढीपाडवा हा सण या दिवशी साजरा केला जातो. गुढीपाडवा हा सण साडेतीन मुहूर्तापैकी एक मानला जातो. त्यामुळे नवीन उद्योगाचा, व्यवसायाचा आरंभ करण्यास हा उत्तम मुहूर्त समजला जातो. यामध्ये नूतन संवत्सराची सुरुवात, म्हणून चैत्र शुद्ध प्रतिपदेचा दिवस हा महत्त्वाचा शुभ मानला जातो.  गुढीपाडव्याला पछडी, उगादी आणि संवत्सरा पाडो असेही म्हणतात. हा सण कर्नाटक, गोवा, महाराष्ट्र, आंध्र प्रदेशात साजरा केला जातो. गुढीपाडव्याची तारीख, शुभ वेळ आणि धार्मिक महत्त्व जाणून घ्या. 


गुढीपाडव्याचा शुभ मुहूर्त (Gudi Padwa 2022 Muhurta) :


फाल्गुन अमावस्या 1 एप्रिल 2022 रोजी सकाळी 11 वाजून 53 मिनिटांनी संपलेल. तेव्हा अमावस्या संपल्यानंतर प्रतिपदा तिथीला सुरुवात होईल आणि दुसऱ्या दिवशी 2 एप्रिल 2022 च्या रात्री 11 वाजून 58 मिनिटांपर्यंत राहील. तिथीनुसार हा उत्सव 2 तारखेला साजरा केला जाईल. या दिवशी अमृत सिद्धी योग आणि सर्वार्थ सिद्धी योग तयार होत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार हे दोन्ही योग अत्यंत शुभ आणि फलदायी मानले जातात.
प्रतिपदा तिथी सुरू होते - 1 एप्रिल, शुक्रवार सकाळी 11:53 वाजता
प्रतिपदा समाप्ती - 2 एप्रिल, शनिवार रात्री 11.58 पर्यंत


दिनांक- 2 एप्रिल 2022, शनिवार



दसरा Dussehra 2022 : रामाने अहंकारी रावणावर विजय मिळवला होता. म्हणून दसऱ्याला विजयादशमी देखील म्हणतात.  या दिवशी भगवान रामाने अहंकारी रावणाचा वध केला. अश्विन शुक्ल दशमी म्हणजेच दसरा हा हिंदू धर्मातील खूप महत्वाचा सण मानला जातो. दसरा हा सण पराक्रमाचा, पौरुषाचा सण आहे. या सणात चार्तुवर्ण एकत्र आलेले दिसतात. त्यामुळे ह्या दिवशी सरस्वतीपूजन आणि शस्त्रपूजन केले जाते. दसरा म्हणजेच विजयादशमी. विजयादशमी म्हणजेच आश्विन शुद्ध दशमी. हा दिवस भारतीय संस्कृतीत महत्त्वाचा मानला जातो. याच दिवसाला आपण दसरा सण म्हणून साजरा करतो. देवीच्या घटांची स्थापना आश्विन शुद्ध प्रतिपदेला केल्यानंतर, देवीचे नवरात्र साजरे होते आणि दहाव्या दिवशी विजयादशमी साजरी केली जाते.साडेतीन मुहूर्तातील एक मुहूर्त मानला गेलेल्या विजया दशमीला शुभ कार्य करतात. नवी वाहने, वस्तू तसेच कपड्यांची खरेदी, सोन्याची खरेदी देखील या दिवशी केली जाते.या दिवशी घरोघरी पूजाअर्चना करून शस्त्रांची, लक्ष्मीची आणि घरातील वाहनांची मनोभावे पूजा केली जाते. झेंडूचे फुले आणि आंब्याच्या पानांची तोरणे लावली जातात. झेंडूच्या फुलांनी देवघर तसेच देवींना हार लावल्या जातो. व संध्याकाळी एकमेकांना आपट्याची पाने देऊन त्यांच्या कुटुंबाला भरभरून शुभेच्छा दिल्या जातात. तसेच ‘सोनं घ्या’ आणि ‘सोन्यासारखे राहा’ असे म्हटले जाते.



-दिनांक- 5 ऑक्टोबर 2022, 


अक्षय्य तृतीया (akshaya tritiya) : अक्षय्य तृतीया 2022 साडेतीन शुभमुहूर्तांपैकी एक असणारा असा हा दिवस. हिंदू पंचांगामध्ये या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्वं आहे.अक्षय म्हणजे जे जिचा क्षय होत नाही, जी सतत राहते ती अक्षय्य तृतीया. ही तृतीया जर बुधवारी आली आणि त्याच दिवशी रोहिणी नक्षत्र असेल, तर ही अक्षय्य तृतीया लाभदायी मानली जाते. अक्षय्य तृतीया हा दिवस साडेतीन मुहूर्तापैकी एक असल्यामुळे ह्या दिवशी सोन्याची खरेदी केली जाते.  वैशाख महिन्यात येणारी शूक्ल पक्षाची तृतीय तिथी या दिवशी साजरी केली जाते. अनेक शुभकार्यांसाठी या दिवसाला प्राधान्य देण्यात येतं. या दिवशी सर्वत्र मंगलमय वातावरणाची अनुभूती होते. विवाह, धार्मिक कार्य, नवं वाहन, घर, दागिने खरेदी यांसारखी शुभकामं या दिवशी केली जातात. विष्णू आणि लक्ष्मी देवीची या दिवशी पूजा केली जाते. विष्णुचाच अवतार असणाऱ्या भगवान परशुराम यांचा प्रकट दिनही याच दिवशी असल्याचं मानण्यात येतं. 


अक्षय्य म्हणजे कधीही न नष्ट होणारे, न संपणारे. अक्षय्य तृतीयेच्या या दिवशी दान करण्यालाही अतिशय महत्त्वं आहे. या दिवशी दान केल्यामुळं कधीही न नष्ट होणारं, न संपणारं पुण्य प्राप्त होतं. शिवाय पितरांचे आशीर्वादही मिळतात. 
शुभकार्यांसोबतच या दिवशी सोनं खरेदीलाही अनेकजण प्राधान्य देताना दिसतात. सहसा या दिवशी सराफा बाजारात चांगलीच गर्दी पाहायला मिळते. पण, यंदाच्या वर्षी मात्र कोरोनाचं संकट असल्यामुळे याचे थेट परिणाम सोनं खरेदी आणि सराफा व्यवसायावरही होणार आहेत. असं असतानाही कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचं पालन करत यंदाच्या अक्षय्य तृतीयेला आरोग्याला प्राधान्य देण्यात येत आहे. किंबहुना अनेक यंत्रणांकडून तसं आवाहन करत अक्षय्य तृतीयेच्या शुभेच्छा देण्यात येतात. 
दिनांक-  3 मे 2022


बलिप्रतिपदा (Balipratipada) : दिवाळीची सुरुवात झाल्यानंतर लक्ष्मीपूजनाच्या दुसऱ्या दिवशी  कार्तिक शुद्ध प्रतिपदेला बलिप्रतिपदा हा दिवस दिवाळी पाडवा म्हणून साजरा केला जातो.  पौराणिक महत्त्व असलेल्या आणि कृषिप्रधान संस्कृतीचे प्रतिबिंब दाखवणाऱ्या साडेतीन मुहूर्तांपैकी एक असा हा दिवाळी पाडव्याचा सण शेतकरी राजा मोठ्या उत्साहाने साजरा करतो.  'इडा, पीडा टळो आणि बळीचे राज्य येवो', अशी प्रार्थना या दिवशी केली जाते.  
कोरोनाचा काळ असला तरी यंदा दिवाळीचा उत्साह पाहायला मिळत आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक म्हणून हा सण ओळखला जातो. या दिवशी  खरेदी करण्याची पद्धत आहे. या दिवशी सोने, गाड्या किंवा संपत्तीची खरेदी केली जाते. 


काय आहे कथा?
बलिप्रतिपदेच्या विषयी अशी कथा सांगितली जाते की,  पार्वतीने शंभू महादेवांना याच दिवशी द्युत खेळात हरवले म्हणून या दिवसाला द्युत प्रतिपदा असेही म्हटले जाते. असुरांचा राजा बळी हा भक्त प्रल्हादाचा नातू आणि विरोचनाचा पुत्र होता. राक्षसकुळात जन्म घेऊनही चारित्र्यवान, विनयशील, प्रजाहितदक्ष राजा म्हणून बळीराजाची ओळख होती‌. दानशूर म्हणूनही हा राजा विख्यात होता. पण, पुढे त्याने वाढत्या शक्तीच्या प्रभावाने देवांचाही पराभव केला. बळीराजाने एक यज्ञ केला. या यज्ञानंतर दान देण्याची प्रथा होती. भगवान विष्णूंनी वामनाचा अवतार धारण केला आणि बटूवेशात बळीराजा समोर उभे राहिले. या रुपात वामनाने तीन पावले भूमी मागितली.
 
बळीराजाने हे दान देण्याची तयारी दाखविली तेव्हा वामन अवतारी भगवान विष्णूंनी प्रचंड रूप धारण करीत स्वर्ग आणि पृथ्वी व्यापले. तिसरे पाऊल ठेवण्यास जागा शिल्लक न राहिल्याने वचनपूर्तीसाठी बळीराजाने मस्तक पुढे केले. तेव्हा बळीराजाच्या डोक्यावर पाऊल ठेवून वामनाने त्याला पाताळ लोकाचे राज्य बहाल केले. असं सांगितलं जातं की, बळीराजा गर्विष्ठ झाला तरीही सत्त्वशील, दानशूर या गुणांमुळे बळीराजाला पाताळ लोकाचे राज्य बहाल केले आणि वरदान दिले की, कार्तिक प्रतिपदेला लोक तुझ्या दानशूरतेची, क्षमाशीलतेची पूजा करतील. 'इडा, पीडा टळो आणि बळीचे राज्य येवो', अशी प्रार्थना या दिवशी केली जाते. 
 -दिनांक - 26 ऑक्टोबर 2022 


महत्वाच्या इतर बातम्या


Gudi Padwa 2022 : इलेक्ट्रॉनिक वस्तू 10 ते 12 टक्क्यांनी महागल्या, तरी खरेदीसाठी ग्राहकांचा ओढा


Gudi Padwa 2022: गुढीपाडव्याविषयीच्या 'या' नवीन गोष्टी तुम्हाला माहित असायलाच हव्यात


Gudi Padwa Wishes 2022 : गुढीपाडव्याला तुमच्या प्रियजनांना 'या' शुभेच्छा देऊन सणाचा आनंद द्विगुणित करा