Gudi Padwa 2022 : हिंदू कॅलेंडरप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला गुढीपाडवा हा सण साजरा केला जातो. गुढीपाडवा (Gudi Padwa 2022) हा हिंदू धर्मातील साडेतीन मुहूर्तापैकी एक असतो. हा दिवस नवीन कार्याचा शुभारंभ करण्यासाठी तसेच सोने-चांदी विकत घेण्यासाठी शुभ मानला जातो. चंद्र सौर दिनदर्शिकेनुसार गुढीपाडवा हा नवीन वर्षाची सुरुवात मानला जातो. यावर्षी गुढीपाडवा 2 एप्रिल 2022 रोजी साजरा केला जाणार आहे.


गुढी उभारण्याची धार्मिक पद्धत : 


वर्षप्रतिपदेच्या दिवशी विघ्नहर्त्या गणपतीचे, देवादिकांचे स्मरण, पूजन करतात. गुरू, वडीलधाऱ्यांना वंदन करावे, अशीही रूढी आहे. त्यानंतर संवत्सर फल श्रवण करावे,असा संकेत रूढ आहे. संवत्सर फल म्हणजे काय? तर त्या पाडव्यापासून जे संवत्सर म्हणजे वर्ष सुरू होत असते, त्या वर्षाच्या पहिल्या दिवशी आणि नंतरच्या काही विशिष्ट दिवशी असणारी स्थिती- जसे वार, चंद्र, नक्षत्र सूर्याचे विविध नक्षत्रप्रवेश इत्यादी संदर्भांवरून हे संवत्सर फल दिलेले असते. संवत्सर फलात देशकालाचाही निर्देश असतो, म्हणजे देशाच्या कोणत्या भागात सुखसमृद्धी असेल ते संवत्सर फलात त्रोटकपणे सांगितलेले असते.


दारी उभारा विजयाची गुढी :


गुढीपाडव्याच्या दिवशी गुढी ही विजयाचं प्रतिक म्हणून उभी केली जाते. या दिवशी घराच्या प्रवेशद्वारावर उंच बांबूच्या साहाय्याने गुढी उभारतात. बांबूला किंवा काठीला रेशमी वस्त्र, कडूनिंबाचा डहाळा, फुलांचा हार आणि साखरेची गाढी बांधून त्यावर तांब्या /धातूचे भांडे बसवले जाते, गुढीचा बांबू पाटावर उभा केला जातो, तयार केलेली गुढी दारात,उंच गच्चीवर लावतात. गुढीला गंध, फुले, अक्षता वाहतात आणि निरांजन लावून उदबत्ती दाखवतात. दुपारी गोडाचा नैवेद्य दाखवून संध्याकाळी पुन्हा हळद-कुंकू फुले वाहून गुढी उतरवली जाते.


गुढी उभारण्यामागच्या गोष्टी :


प्रभू रामचंद्रांनी चौदा वर्ष वनवास भोगून लंकाधिपती रावण आणि राक्षसांचा पराभव करून या दिवशीच अयोध्येत प्रवेश केला. म्हणून गावागावामध्ये लोकांनी घरासमोर गुढ्या उभ्या केल्या होत्या अशी गोष्ट सांगितली जाते.


तर,दुसरीही एक गोष्ट अशी आहे, शालिवाहन नावाच्या कुंभाराच्या मुलाने शकांचा पराभव करण्यासाठी सहा हजार मातीच्या सैनिकांचे पुतळे तयार केले आणि त्यात प्राण निर्माण करून त्यांच्या साह्याने याच दिवशी शकांचा पराभव केला.


याशिवाय, पार्वती आणि शंकराचे लग्न पाडव्याच्या दिवशी ठरले. पाडव्यापासून तयारीला सुरुवात होऊन तृतीयेला लग्न झाले. पाडव्याच्या दिवशी पार्वतीच्या शक्तिरूपाची पूजा करतात. यालाच चैत्र नवरात्र म्हणतात. लग्नानंतर नवमीला योगिनींची अधिपती म्हणून पार्वतीचा अभिषेक करण्यात आला. काश्मिरी मुलींना पार्वतीचे रूप असे श्रीकृष्णाने म्हटले आहे. पार्वती लग्न झाले की माहेरवाशिणी म्हणून महिनाभर माहेरी राहते. तेव्हा तिच्या कौतुकासाठी चैत्रगौरीचे हळदीकुंकू केले जाते. अक्षयतृतीया या दिवशी ती सासरी जाते. संदर्भ- शक्रोत्सवाचे उल्लेख संस्कृत रघुवंशात आणि भासांचे ‘मध्यमव्यायोग‘, शूद्रकाचे ‘मृच्छकटिकम्‌‘ या नाटकांमध्ये आले आहेत. अशा काही गुढीपाडव्याच्या प्रचलित आख्यायिका आहेत. 


महाभारतातील गुढीपाडव्याचा उल्लेख :


महाभारताच्या आदिपर्वात उपरिचर राजाने इंद्राने त्याला दिलेली कळकाची काठी इंद्राच्या आदरार्थ जमिनीत रोवली आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे नववर्ष प्रारंभीच्या दिवशी तिची पूजा केली. या परंपरेचा आदर म्हणून अन्य राजेही काठीला शेल्यासारखे वस्र लावून, ती शृंगारून, पुष्पमाला बांधून तिची पूजा करतात. महाभारतातल्या आदिपर्वात हा उत्सव वर्ष प्रतिपदेस करण्यास सुचवले आहे तर खिलपर्वातून आणि इतर संस्कृत ग्रंथांतून हा उत्सव साजरा करण्याच्या तिथी वेगवेगळ्या दिलेल्या दिसतात. ब्रह्मदेवाने याच दिवशी विश्व निर्मिले, असे मानले जाते.


आरोग्यदृष्ट्या सणाचे महत्त्व :


चैत्र शुद्ध प्रतिपदेला प्रातःकाळी ओवा, मीठ, हिंग, मिरी आणि साखर कडुनिंबाच्या पानांबरोबर वाटून खातात. पचनक्रिया सुधारणे, पित्तनाश करणे, त्वचा रोग बरे करणे, धान्यातील कीड थांबवणे हे आणि असे अनेक औषधी गुण ह्या कडुनिंबाच्या अंगी आहेत असे आयुर्वेदात मानले जाते. शरीराला थंडावा देणाऱ्या कडूनिंबाची पाने अंघोळीच्या पाण्यात घालणे, ती वाटून खाणे हे आरोग्याच्या दृष्टीने हितकारक समजले जाते.


गुढीपाडव्याला होते नवीन वर्षाची सुरुवात :


गुढीपाडवा हा चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवश साजरा केला जातो. गुढीपाडवा महाराष्ट्रासह देशात विविध ठिकाणी साजरा केला जातो. देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी अनेक नावांनी, सांस्कृतिक श्रद्धा आणि उत्सवाच्या रुपात हा दिवस साजरा केला जातो. महाराष्ट्रात या दिवशी सूर्योदयानंतर घरासमोर गुढी उभारून तिची पूजा केली जाते. दक्षिण भारतातील मूळ रहिवासी गुढीपाडव्याचा सण उगादी म्हणून साजरा करतात. ह्या दिवसापासूनच शालिवाहन शके दिनदर्शिकेप्रमाणे हिंदू नवीन वर्षाची सुरुवात होते. 


महत्वाच्या बातम्या : 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha