मुंबई : मराठी नववर्ष अर्थात गुढीपाडवा उद्या आहे. यंदा नववर्षाचं स्वागत मोठ्या उत्साहात, जल्लोषात केलं जाणार आहे. गुढीपाडव्याच्या निमित्ताने अनेक जण नवीन वस्तूंची खरेदी करतात. इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या किमती जरी 10 ते 12 टक्क्यांनी वाढल्या असल्या तरी ग्राहकांनी मात्र त्याची पर्वा न करता मोठ्या प्रमाणावर खरेदी करायचं ठरवलं आहे.


गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर अनेक नवीन वस्तू खरेदी केल्या जातात. खासकरुन इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करण्याकडे ग्राहकांचा ओढा असतो. यंदा महाराष्ट्र कोरोनाच्या निर्बंधांमधून मुक्त झाला आहे. त्यामुळे या दुकानांमध्ये ग्राहकांची संख्या सुद्धा वाढलेली पाहायला मिळत आहे. दुकानांमध्ये मोठ्या संख्येने ग्राहक खरेदीसाठी येत आहेत. 


New Financial Year : आजपासून ग्राहकांच्या खिशाला कात्री, TV, AC, मोबाईल महागणार, तर CNG वाहनधारकांना दिलासा


दरम्यान इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या किमती जरी 10 ते 12 टक्क्यांनी वाढल्या असल्या तरी ग्राहकांनी मात्र त्याची पर्वा न करता मोठ्या प्रमाणावर खरेदी करायचं ठरवलं आहे. त्यामुळे मागील दोन वर्षात या कोरोनाच्या निर्बंधांमुळे बाजारपेठेतील मरगळ यंदाच्या गुढीपाडव्याच्या निमित्ताने पूर्णपणे झटकली जात आहे. कोरोनाच्यापूर्वीच्या दिवसांप्रमाणे पुन्हा एकदा गुढीपाडव्याची खरेदी अगदी उत्साहात ग्राहकांकडून केली जात असल्याचं दुकानमालकांचं म्हणणं आहे


आयात शुल्कात बदल; टीव्ही, एसी, मोबाईल महागणार
आजपासून नवीन आर्थिक वर्ष 2022-23 सुरु झालं आहे. या नवीन आर्थिक वर्षामध्ये अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेल्या तरतुदींनुसार 1 एप्रिलपासून ग्राहकांवर महागाईचा बोजा अधिक वाढणार आहे. टीव्ही, फ्रीज, एसी यासह मोबाईल घेणं महागणार असून ग्राहकांच्या खिशाला कात्री लागणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पामध्ये आयात शुल्कामध्ये बदल केले होते. त्यामुळे 1 एप्रिलपासून लागू होणाऱ्या आयात शुल्कामुळे काही वस्तू महागणार आहेत.


सरकारने 1 एप्रिलपासून ॲल्युमिनियमवर 30 टक्के आयात शुल्क लावले आहे. याचा वापर टीव्ही, एसी आणि फ्रिजचे हार्डवेअर बनवण्यासाठी होतो. कच्च्या मालाचा पुरवठा महागल्यानं कंपन्या उत्पादनाचे दर वाढणार आणि त्याचा थेट फटका ग्राहकांना बसणार आहे. याशिवाय कॉम्प्रेसरमध्ये वापरण्यात येणाऱ्या पार्ट्सवर आयात शुल्क वाढवण्यात आले आहे. ज्यामुळं फ्रिज घेणे महागणार आहे. सरकारनं एलईडी बल्ब तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या साहित्यावर मूळ सीमा शुल्कासह 6 टक्के प्रतिपूर्ती शुल्क आकारण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. आजपासून हा नवा नियम लागू झाल्यानंतर एलईडी बल्ब महाग होतील.